आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटपौर्णिमेच्या निमित्तानं...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणापासून आजतागायत वटपौणिमा खूप वेगवेगळी रूपं घेऊन माझ्या समोर उभी ठाकली. वटपौर्णिमा म्हटलं की, माझ्या समोर पहिलं चित्र उभं राहतं ते आमच्या गावातल्या चौलच्या चौकीवरच्या वडाचं. गल्लीतल्या सगळ्या बायका नटून सजून, घोळक्यानं वडावर पूजेसाठी जायच्या. त्यात नवीन नवऱ्यांची नवी नवलाई. पहिल्या वटपौर्णिमेला माहेरी आलेल्या ताई-माई-अक्का आणि त्यांच्या आयामावशा, सगळ्यांचाच उत्साह धो धो कोसळणाऱ्या पावसाप्रमाणं वाहायचा. अशा पावसात अंगावरची नवीन साडी, नाकातली नथ आणि हातातलं पूजेचं ताट सावरत सगळ्या जणींची तारांबळ उडायची. ‘आधी नाही आला तरी वटपौर्णिमेला पाऊस पडतोच मुसळधार...’ आईचे अनुभवी बोल प्रत्येक वटपौर्णिमेला ठरलेले. शाळा मागे सरली आणि मुंबईच्या कॉलेजची दारं उघडली. साता जन्मी हाच पती मिळो, म्हणून बायकांनीच का उपवास करायचा? या स्त्रीवादी प्रश्नापासून वडाला दोऱ्या बांधून पतीचं दीर्घायुष्य चिंतण्यातल्या फोलपणाच्या तार्किक चर्चा कॉलेज कट्ट्यावर रंगू लागल्या. व्रतवैकल्याची पुराणकथा बुद्धीला पटत नव्हती, पण सत्यवानाला यमाच्या तावडीतून सोडवून आणणाऱ्या सावित्रीचं अप्रूप मनाच्या कोपऱ्यात निर्माण झालं होतं. दगावलेली व्यक्ती जिवंत होणं अशक्य; पण नेमकं असं काय केलं असेल सावित्रीनं, हा प्रश्न प्रत्येक वटपौर्णिमेला पडत होता.

कॉलेज संपलं आणि करिअर सुरू झालं. मग तर काय, सावित्रीची वेगवेगळी रूपं भोवताली दिसू लागली. कोण करतं हल्ली उपासतापास, माझा नाही विश्वास, असं म्हणणाऱ्या काही जणी, मला खूप हौस आहे हो पण वेळ नाही ना, म्हणत वडाच्या फांद्या घरी आणून प्रतीकात्मक पूजा करणाऱ्या काही जणी, वडाचं झाडं हे ऑक्सिजननिर्मितीत अग्रेसर कसं असतं इत्यादीचे शास्त्रीय दाखले देत आपल्या संस्कृतीचं समर्थन करणाऱ्या काही जणी. आम्ही आमच्या सोसायटीत वृक्षारोपण करून वटपौर्णिमा कशी साजरी केली, याचं वर्णन करत आधुनिक बाज आणणाऱ्या काही जणी... अशा एक ना अनेक छटा.

पण या साऱ्यात वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्या मनात निर्माण झालेली सावित्रीबद्दलची उत्सुकता अनुत्तरित राहात होती. मग मंगळागौर, श्रावणातली शिवामूठ, हरितालिका, ऋषिपंचमी, नागपंचमी, पिठोरी या प्रत्येक सणांना ती उफाळून येई. या साऱ्यातला एक समान धागा दिसत होता तो निसर्ग आणि बाईचं नातं. कधी पंचपत्रींच्या माध्यमातून, तर कधी थेट वृक्षांच्या सान्निध्यात स्त्रियांनी करण्याची व्रतं हे याचं वैशिष्ट्य. अगदी चैत्रगौरींच्या आंब्याची डाळ, कैरीचं पन्हं आणि कलिंगडापर्यंत. त्या त्या मोसमात उगवणाऱ्या वनस्पती, भाज्या, फळं स्त्रियांच्या आहारात यावीत, स्त्रियांना निसर्गासोबत राहण्याची संधी मिळावी, ही त्या त्या वेळेस सांगितली जाणारी कारणं थोडीबहुत पटायची. पण या व्रतांच्या पोथ्यांमधील कथा मात्र मन आणि बुद्धी दोन्ही अस्वस्थ करायचं. मोठ्या हिमतीनं नवऱ्याला यमाच्या तावडीतून सोडवून आणणारी सावित्री त्यात पुढे पुढे अधिकाधिक हतबल होताना दिसली. नागपंचमीची कथा घ्या किंवा ऋषिपंचमीची. कामाच्या गडबडीत अनवधनानं एकीकडून सापाच्या पिलांची हत्या झाली म्हणून नागपंचमीची पूजा. एकीनं मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करून विटाळ कालवण्याचं पाप केलं म्हणून ऋषिपंचमीचं व्रत या त्यामागच्या पोथीतल्या कथा बुद्धीला आणि मनालाही धक्का देत होत्या. विटाळ कालवल्यानं झालेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून स्त्रियांनी ऋषिपंचमीचं व्रत करावं, मग पिठोरीचं व्रत कशाचं प्रायश्चित्त म्हणून करावं, याचा शोध सुरू केला. त्याचं लॉजिकल उत्तर अर्थातच पोथ्यापुराणांमध्ये नव्हतं; पण वडाच्या झाडापासून रानातल्या तऱ्हेतऱ्हेच्या पत्रींपर्यंत निसर्गाची पूजा करणाऱ्या बाईला तिच्या शरीरातील निसर्गधर्माबद्दल न्यूनगंड देण्याचाच सारा घाट त्यामागे स्पष्ट होता. तो कमी की काय, म्हणून पुढे त्याला पाप-पुण्याच्या मोजपट्ट्या लावून तिच्यातील अपराधगंडही वाढवण्याचा सारा प्रकार दिसला. वटपौर्णिमेपासून मंगळागौरीपर्यंतची सारी व्रते चांगला नवरा मिळावा आणि मिळालेल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं, पुढल्या जन्मीच नाही तर जन्मोजन्मी तोच लाभावा, अशी नवराकेंद्री. त्यासाठी स्वत:च्या आरोग्याची हानी करणारी उपवासादी वैकल्य कशासाठी? हा प्रश्न डोकं पोखरत होता.

चिकित्सेच्या याच वाटेवर अभ्यासक मंगला सामंत यांचे लिखाण वाचनात आले. ऋषिपंचमीपासून पिठोरीपर्यंतचे हे सारे सण मातृसत्ताक पद्धतीची प्रतीके कशी आहेत, याचे अत्यंत शास्त्रशुद्ध विवेचन त्यांनी केले आहे. ऋषिपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी हाताने पिकवलेल्या भाज्या, हाताने भरडलेले धान्य खाण्याच्या प्रथेमागची त्यांनी सांगितलेली कारणमीमांसा बुद्धीला पटू लागली. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात प्रजोत्पादन आणि मुलांचे संगोपन यासाठी गुहेत राहणाऱ्या स्त्रीने लावलेल्या शेतीच्या शोधाची बीजे त्यात होती. पुढे नागरी समाजात माणसाच्या जगण्याचे संदर्भ बदलत गेले पण प्रतीकं कायम राहिल्याचं सामंत लिहितात. वटपौर्णिमेपासून नागपंचमीपर्यंत आणि मंगळागौरींपासून हरितालिकांपर्यंतच्या प्रत्येक व्रतात त्याची प्रचिती येते. पण खंतावणारी बाब म्हणजे, ही प्रतीकं फक्त प्रतीकं राहिली, बाईचं निसर्गासोबतचं नातं दृढ करणारा निसर्ग पूजनाचा त्यामागचा वसा आणि विचार केव्हाच मागे पडला. उलट महिलांना दुय्यम लेखणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीचा गौरव त्यात घुसडला गेला. बायका शिकल्या. हुशार झाल्या. स्मार्ट फोन वापरू लागल्या. पण मनातला तोच गंड कुरवाळत या व्रतवैकल्यांमध्ये गुरफटत राहिल्या. बोटाच्या एका क्लिकवर चालणारं वडाच्या पूजेचं अॅप आतापर्यंत अनेकींच्या मोबाइलवर डाऊनलोड झालं असेल कदाचित.

या साऱ्यात ती सशक्त सक्षम सावित्री केव्हाच हरवून गेली.
आताशी आई म्हणते, हल्ली वटपौर्णिमेलाही पाऊस पडत नाही...
चौलचा चौकीवरचा तो भारदस्त वडही इतक्यात जमीनदोस्त झालाय.
बहीण सांगत होती, रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामपंचायतीनं पाडला.
सत्यवानाला जगवणारी सावित्री वडाला वाचवू शकली नाही.

वडाच्या पारावर पूजेसाठी जमलेल्या स्त्रियांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुताचा फेर धरला होता. सुंदरलाल बहुगुणांच्या चिपको आंदोलनात झाडं तोडू नका, म्हणून झाडांना मिठ्या मारून मरणाला सामोऱ्या गेलेल्या स्त्रिया आठवल्या. गावातल्या बायकांनी झाडांना मिठ्या मारून रोखलेली जंगलतोड चिपको आंदोलन म्हणून इतिहासात नोंदली गेली.

ठरवलं तर सगळ्यांनाच शक्य आहे. हीच वेळ आहे, मी ही पूजा नेमकी का करते? हा प्रश्न
स्वत:लाच विचारण्याची; आणि फक्त पूजेच्या दिवशीच झाडाची आठवण का बरं यावी? हा प्रश्न संपूर्ण समाजाला विचारण्याची!

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)