आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हातात माल, पण ना उठाव ना भाव (दीप्ती राऊत)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटाबंदीच्या आक्रमक निर्णयाचे फलित भविष्यात मिळेलही, पण या घटकेला सर्वसामान्य शेतकऱ्यांची चहूबाजूंनी कोंडी झालेली आहे. अस्मानी संकटांना तोंड देणारा शेतकरी या निर्णयाने हबकून गेला आहे...
‘उन्हाळ्यात पाणी नव्हतं, तेव्हा पन्नास हजारांचं पाणी टँकरनं खरेदी करून बागा जगवल्या. पाच नोव्हेंबरला कलकत्त्याच्या व्यापाऱ्याशी सौदा झाला. चार लाखांना माल विकला. त्यानं सारा पैसा रोखीनं दिला. एक हजाराच्या आणि ५००च्याच जुन्या नोटा. पुढल्या महिन्यात घरातलं लग्न म्हणून घरातच पैसे ठेवले होते. आणि अचानक हा निर्णय झाला. आता जिल्हा बँकही पैसे घेत नाही की बदलून देत नाही,’ सटाण्यातले संदीप देवरे रडकुंडीला आले होते. गेल्या चार दिवसांपासून ते दररोज पहाटे उठून रानात जाण्याऐवजी बँकेसमोर नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहात होते.
इगतपुरी तालुक्यातल्या धारगावच्या राजू पुंजारीकडे नोटा बदलण्यासाठी गाडीभाडंही उधारीनं घ्यावं लागलं. नुकत्याच विकलेल्या भाताचे पुंजारींकडे पाच हजार होते, पण साऱ्या जुन्या नोटा. चालेल अशी नोट फक्त २० रुपयांची. बँक घोटीला, २० किलोमीटर अंतरावर. जीपचं भाडं २५ रुपये. जीपवाला गावातला ओळखीचा. त्याला विनवण्या करून राजू २० रुपयांत घोटीत पोहोचले. पण त्यांना नोटा बदलून मिळाल्याच नाहीत. शेवटी ते रिकाम्या हातानं २० किलोमीटर पायी वाट तुडवत घरी गेले. दुसऱ्या दिवशी गावातून ५० रुपये उधार घेतले आणि पुन्हा बँकेत गेले...
खरिपाचा माल हातात आलेला, आणि रब्बीची तयारी सुरू होती. नेमक्या मोक्याच्या वेळी देशात जाहीर झालेल्या नोटाबदलीमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पहाटे उठून रानाकडे वळणारे शेतकरी पहाटेपासून बँकांच्या बाहेर रांगा लावून उभे होते. बाजार समित्यांमधले व्यवहार ठप्प झाले होते. व्यापारी माल घेत नव्हते, घेतला तरी पैसे देत नव्हते. गावागावातल्या औषधांपासून किराणावाल्यापर्यंत उधारीची यादी या आठवड्यात वाढली. उसनपावतीनं विक्री आणि उधारीवरती खरेदी, हा प्रकार पहिल्या चार दिवसांत चालला, पण नंतर मात्र तोही ठप्प झाला.
नेवाशाच्या संदीप चेडेंचं म्हणणं थोडं वेगळं होतं. ‘आमचं शेतकऱ्यांचं सगळं जगणंच उधारीवर सुरू आहे. आज हा नोटांचा घोळ झाला. कधी पावसाचा होतो, कधी भावाचा. आता आम्हाला नेहमीच सवय झाली आहे, पीक कमी पिकणार, आणि प्रश्न जास्त पडणार याची,’ नेवाशाचे संदीप चेडे सांगत होते, ‘या निर्णयाचा शेतकऱ्याला मोठा फटका बसतो आहे, हे खरं आहे; पण बड्यांचा काळा पैसा बाहेर येतोय, याचं शेतकऱ्याला समाधान वाटतंय. त्यात बडे व्यापारीही आले आणि बडे नेतेही. माझा दोन लाखांचा माल गेल्या आठवड्यापासून अडकून पडला आहे. पैसे नाहीत म्हणून व्यापारी घेत नाहीत. कांदा आहे, फ्लॉवर आहे. माल सडायला लागला आहे. गेले आठवडाभर मार्केट बंद आहे. सरकारचा निर्णय चांगला आहे, पण पर्यायी व्यवस्था हवी होती. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यापाऱ्यांची, दलालांची कोंडी झाली, हे बरंच झालं ना...’ चेडे सांगत होते. फ्लॉवरच्या वावरात आता त्यांना गहू पेरायचाय, पण त्यासाठी हातात पैसा नाही.
गेला आठवडाभर सर्व बाजार समित्यांमधले व्यवहार ठप्प झाले होते. जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी केल्यानं शेतकऱ्यांची तिथूनही अडवणूक झाली. बाजारसमित्या आणि जिल्हा बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेतल्या महत्त्वाच्या तिजोऱ्या. त्याच बंद झाल्यानं सारा गावगाडा कोलमडला. ‘आधीच भाज्यांचे भाव निम्म्यावर आले होते. जे पैसे मिळत होते, ते पण आता बंद झाले. व्यापारी म्हणतात, त्यांच्याकडेच पैसे नाहीत. माल दे आणि उधारपावती करून घे. हा घोळ मिटला की देतो पैसे. एवढे दिवस भाजीपाला घरात ठेवणं शक्य नाही. शेवटी, तो बोलला त्या भावात दिला सर्व माल. औषधवाल्याचा माल संपलाय. त्यानंही उधारी बंद केलीए,’ नामपूरचे पगार सांगत होते.
नवीन कांदा बाजारात आल्यावर कांद्याचे भाव सुधारत होते. चार आणि पाच रुपयांवर कोसळलेला भाव १५००-१७०० पर्यंत वर चढला होता आणि आता अचानक हा निर्णय आला. व्यापाऱ्याकडचा पैसा लगेच मिळत नाही, पण मजुरांचे आणि माल आणणाऱ्या ट्रॅक्टरचं भाडं कसं द्यायचं, हा सर्वांच्या पुढचा प्रश्न आहे. गावातल्या उधाऱ्या वाढल्या आहेत. ‘शहरात पावलागणिक बँका आहेत, बँकांच्या शाखा आहेत, पण ग्रामीण, आदिवासी भागात तितकं सोपं नाही. दूर कशाला, नशिक शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावरच्या घोटी, इगतपुरी, त्र्यंबक तालुक्यांमध्ये एकेकच राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. गावातला प्रत्येक आदिवासी, शेतकरी गेल्या चार दिवसांपासून त्या बँकांसमोरच मुक्काम ठोकून आहे. लोकांच्या घरात डॉक्टरकडे जाण्यासाठी पैसे नाहीत, की लिहून दिलेली औषधं आणण्यासाठी पैसे नाहीत. काहींच्या घरातल्या शंभराच्या नोटा संपल्यावर तालुक्याच्या गावी बँकेत जाण्यासाठीही पैसे उधार घ्यावे लागले,’ भगवान मधे सांगत होते. ‘नोटा बदलून आणतो, असं सांगून भोळ्या आदिवासी शेतकऱ्यांना फसवण्याचे प्रकारही खूप झाले.’
बड्यांचा काळा पैसा बाहेर निघणार, नेहमी लुबाडणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि दलालांना फटका बसणार, याचं समाधान शेतकरी व्यक्त करत होते. पण त्यासाठी त्यांनाही मोठी किंमत चुकवावी लागली होती. ‘आम्ही कुठे म्हणतो, आम्हाला कॅश द्या, व्यापाऱ्यांनी आम्हाला चेकनं पेमेंट करावं, आम्ही कर्जाचा हफ्ता चेकनं भरायला तयार आहोत. आज सगळ्यांची खाती काढली आहेत ना सरकारनं, त्या खात्यात जमा करा चेक,’ शिंपी टाकळीचे धनंजय बोरसे बोलत होते. पण शेतकऱ्यांवर नोटा बदलण्याची सक्ती करणारं सरकार व्यापाऱ्यांवर चेकनं पेमेंट करण्याची सक्ती करणार का, या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर कुणाजवळ नाही. शेतीमालाचे व्यापारी, अडते, दुकानदार या साऱ्यांचाच व्यवहार खुल्या पैशाचा. शेतीमालाच्या किमती पाडण्यासाठी त्यांना आणखी एक कारण मिळालं. हातात माल होता पण त्याला ना उठाव ना भाव, अशा कात्रीत शेतकरी पुन्हा एकदा सापडला.
diptiraut@gmail.com
बातम्या आणखी आहेत...