आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipti Raut Article On Husband wife Relations And Their Child

आई-वडिलांच्या लग्नात मुलं बिझी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या काळात, पती-पत्नीची नाती निकालात निघताना पहिला घाव बसतो, तो मुलांच्या संवेदनशील मनांवर. चूक किंवा बरोबर याची परिमाणं परिस्थितीनुरूप, व्यक्तीनुरूप बदलत जाणारी. आणि त्यात भरडली जाणारी मुलं. सारेच गोंधळलेले. काय टिकवायचं आणि काय सोडायचं, काय बदलायचं आणि काय घडवायचं, याची पदोपदी परीक्षा घेणारा हा काळ. अशा वेळी मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करणारी ही कुटुंबं म्हणूनच खास ठरतात...

मूल हे कुटुंबातील केंद्रबिंदू मानले जाते. पण, कुटुंबातील प्रौढांचे भवितव्य हा कळीचा मुद्दा बनतो, तेव्हा अर्थातच मुलाचं स्थान दुसऱ्या क्रमांकावर जाते. एखाद्या कुटुंबाचे एक चाक अकस्मात गळले, तर मोठ्यांचा विचार प्राधान्याने केला जातो. विशेषत: अशा वेळी स्त्रियांच्या भवितव्याचा प्रश्न प्रबळ बनतो, आणि मुलांबाबतच्या तडजोडी या सामाजिक संकेत बनतात. पतीचे अकस्मात अपघाती निधन झाल्याने एकटी पडलेली पत्नी किंवा अचानक उद‌्भवलेल्या आजारपणात पत्नी दगावल्याने एकटा पडलेला पती आणि पदरात लहान मुले, अशी परिस्थिती असते, तेव्हा लहान मुलांचे पालकत्व आजी-आजोबांनी स्वीकारायचे आणि एकल पालकांचा पुनर्विवाह करून द्यायचा, ही वर्षानुवर्षं चालत आलेली जनरीत. पण बदलत्या काळातील बदलत्या कुटुंबांमध्ये हा बदल प्रकर्षाने जाणवत आहे. कुटुंबाला हादरवून टाकणाऱ्या अशा प्रकारच्या आपत्तीनंतरही मूल हेच कुटुंबाचा आणि आपल्याही जगण्याचा केंद्रबिंदू मानणारी आणि त्या अनुषंगाने नवीन कुटुंबांची रुजवात घडवणारी काही उदाहरणे तुरळक असली, तरी खूप आशादायी ठरताहेत.

ती, रविवारची सकाळ होती. प्रशांत आणि भावना कांदेपोहे तयार करून माझी वाट पाहात होते. एेश्वर्या, अपूर्वा आणि मल्हार तिघांचा मस्ती करत अभ्यास सुरू होता. एकमेकांमध्ये समरस झालेले, एकमेकांच्या जगण्याचा भाग बनलेले आणि एकमेकांसाठीच जगणारे, हे सारे तीन वर्षांपूर्वी दोन टोकाच्या कुटुंबांचे भाग होते, यावर कुणाचा सांगूनही विश्वास बसणार नाही, एवढी समरसता. कारण अर्थातच, प्रशांत आणि भावना दोघांनीही आयुष्याच्या एका कठीण वळणावर उभं असताना ‘मूल’ हा केंद्रबिंदू ठेवून घेतलेले निर्णय.

पतीचं अपघातात निधन झालं, तेव्हा भावना अवघी २४ वर्षांची होती. पदरात दोन चिमुकल्या - एेश्वर्या आणि अपूर्वा. समोर आ वासून उभं आयुष्य. फक्त तिचंच नाही, तर तिघींचं. परंपरेनुसार एकच मार्ग समोर होता, मुलींनी आजी-आजोबांकडे राहावं. भावनाने दुसरं लग्न करावं. भावनाला स्थळंही यायला लागली. पण मी लग्न करेन तर मुलींसह, या अटीवर ती ठाम राहिली. भावनानं याबाबत तडजोड केली नाही. मुलींच्या शिक्षणासह स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं. नर्सिंगचा कोर्स घेतला आणि जिल्हा परिषदेत कंत्राटी पद्धतीने परिचारिका म्हणून नोकरी मिळवली. यात एक-दोन नव्हे, तब्बल आठ वर्षं सरली आणि दुसऱ्या लग्नाचा विचार मागे पडला...

तिकडे प्रशांतचं आयुष्यही अचानक वेगळ्याच वळणावर येऊन थबकलं होतं. रंगपंचमीला बायकोला ताप भरतो काय आणि उपचारांची पराकाष्टा करूनही पाचव्या दिवशी ती साऱ्यांचा निरोप निघून जाते काय, सारं काही समजून घेण्याआधीच संपलेलं. हादरलेला प्रशांत आणि लहानगा मल्हार. प्रशांतच मल्हारची आई बनला आणि बापही. चार वर्षं सरली. एकटेपणा दोघांनाही जाणवत होता. नात्यातील स्थळं सांगून येत होती. पण मल्हार हेच प्रशांतचं विश्व बनल्यानं त्यानं कसलाच विचार केला नव्हता. प्रशांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कामाला. मित्राकडून भावनाबद्दल कळलं. दोघे भेटले. विचार जुळले. मुळात मुलं हे दोघांच्याही जगण्याचे सामायिक धागे असल्याचं लक्षात आलं.

दोघांनी लग्न करायचं ठरवलं, पण आपापल्या मुलांची संमती असेल तरच. त्यानंतरचा खूप मोठा टप्पा, मुलांसोबत बोलण्याचा, कधी स्वतंत्रपणे, कधी संयुक्तपणे. त्यांची मनं जाणून घेण्याचा. कधी भावना आणि मल्हार भेटत होते, कधी एेश्वर्या-अपूर्वा आणि प्रशांत. कधी प्रशांत तिन्ही मुलांना सहलीला घेऊन जात होता, कधी भावना तिन्ही मुलांना जत्रेसाठी नेत होती. भावना सांगते, तिघंही किशोरवयात होती. अशा वळणावर सर्वांनी मिळून नवीन कुटुंब उभं करणं, सगळ्यांसाठीच कठीण होतं. पण मुलं हाच साऱ्या प्रक्रियेचा गाभा बनवल्यानं, तो मुश्कील टप्पा साऱ्यांनी पार पाडला.

नवीन जागा भाड्यानं घेतली, सगळ्यांचं सामान तिथे शिफ्ट केलं. मुलं शाळेत असताना प्रशांत आणि भावनानं पालकांच्या साक्षीनं लग्न केलं आणि मुलं परतल्यावर सगळ्यांनी मिळून घर लावलं. प्रशांत म्हणतो, आईवडलांच्या लग्नाचा अल्बम बघताना मुलं नेहमी एक विनोद करतात, त्या वेळी आपण कसे बिझी होतो वगैरे... पण आमच्या बाबतीत खरंच आहे. आमचं घर मुलांनी उभारलं आणि आमचं कुटुंब मुलांनी तयार केलंय. दोन शेवाळे, एक जाधव आणि दोन केळकर अशा पाच वेगवेगळ्या आडनावांचं असं हे अनोखं कुटुंब. फक्त आडनावांनी स्वतंत्र असलेलं, पण मनांनी एकरूप झालेलं. तीन मुलं आणि दोन पालकांचं!

अर्चना-आतिषची कहाणीही अशीच काहीशी. जान्हवी तीन वर्षांची असताना, अर्चनाच्या पतीनं अपघाती निधन झालं. अशा वेळी मुलीनं माहेरी जायचं, ही अलिखित आणि अबोल नियम. पण जान्हवीसाठी अर्चनानं ठरवलं नाशिकमध्येच राहायचं. अवघी तीन वर्षांची जान्हवी पदरात, हातात नोकरी नाही, घराच्या कर्जाचे हप्ते थकलेले, इशुरन्स कंपन्यांसोबतचा संघर्ष हा सारा लढा, तिनं एकटीनं दिला. मिळेल ती कामं केली. स्थळं येत होती, पण मुलीसकट स्वीकारण्यास कुणीच तयार नव्हतं आणि मुलीशिवाय लग्नाचा विचारही ती करूच शकत नव्हती. जान्हवीच तिचं विश्व बनलं होतं आणि स्वप्नही! आतिष मिश्रा कामाच्या निमित्ताने तिला भेटले. भेटत राहिले. ते अविवाहित, पण त्या वेळी लग्नाचा विचार ना त्यांच्या मनात आला, ना अर्चनाच्या. जान्हवीवर मात्र त्यांचं फार प्रेम. अर्चना सांगते, फक्त जान्हवीच नाही, तर एकूणच मुलं हा आतिषचा वीकपॉईंट. मुलांवर मूल बनून प्रेम करणारा हा माणूस. त्यांचं ते मुलात मूल बनून जाणं, अर्चनाच्या भावानं पाहिलं आणि अर्चनासोबतच्या लग्नाचा प्रस्ताव आतिषसमोर मांडला. आज जान्हवी दोघांच्याही भावविश्वाचा अविभाज्य भाग बनलीय.

सामान्य मुलांबाबत बदलती परिस्थिती संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने हाताळणे केवढे कठीण होत आहे, त्यापेक्षा कित्येत पटीने जास्त आव्हानात्मक आहे, ती विशेष मुलांसोबतची परिस्थिती हाताळणे. नाशिकचा ‘घरकुल’ परिवार याचंच एक उदाहरण. शारीरिक वय ३०-३५, पण मानसिक वय नऊ वर्षं असणाऱ्या तब्बल ५० मुलींचं हे घरकुल गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत गुण्यागोविंदानं नांदतंय. त्याला कारणही असंच झालं. या मुलींचा पहिला सांभाळ त्यांच्यासाठीच्या विशेष शाळा आणि संस्था करतात, पण त्यात त्यांच्या पालकांचाही महत्त्वाचा वाटा असतो. वाढत्या वयासोबत या मुलींच्या जबाबदाऱ्या वाढत जातात आणि त्यांच्या पालकांचे वय मात्र खंगत जाते. अशाच परिस्थितीत एक पालक मागे लागले म्हणून विद्या फडकेंनी श्रुती वाडेकर या एका मुलीला घेऊन ‘घरकुला’ची स्थापना केली. आज दहा वर्षांनी त्यांच्या या घरकुलात ५० मुली आहेत. एरवी कुटुंबाने नाकारलेल्या, भावंडांनी धुडकारलेल्या आणि मायेला, मैत्रीलाही पारख्या झालेल्या या मुलींना घरकुलात त्यांच्या बहिणी मिळाल्यात, मावशा मिळाल्यात, काका मिळालेत आणि विद्याताईंसारखी आईही.

पालकांनंतर मतिमंद मुलींना त्यांच्या भावा-भावजयांनी सांभाळणं, हे खरं तर तिघांसाठीही अत्यंत कठीण. त्यापेक्षा ‘घरकुला’त या मुली आनंदाने राहतात, घराप्रमाणेच त्यांच्या जबाबदाऱ्या पार पडतात. एकत्र खेळतात, भांडतात, कामं करतात, खातात, पितात. खऱ्या अर्थाने, घर म्हणून एकत्र राहतात. महिन्यानं येणाऱ्या नातलगांना आनंदाने भेटतात आणि दोन-चार दिवस घरी सुट्टीवरही जातात. पण लगेचच त्यांना घरकुलाची ओढ लागते, एवढं घरकुल त्यांचं घर बनलंय. नाशिकमधील डॉक्टर, वकील, संस्था, उद्योजक या साऱ्यांच्या सहकार्यामुळे आणि सरकारी मदतीशिवाय घरकुल उभं राहिलंय, हे विद्याताई आवर्जून नोंदवतात. ते सारे जण या घरकुलाची एक्स्टेंडेड फॅमिली आहेत- काका, आत्या, मामा, आजी आणि भरपूर मावशा...
diptiraut@gmail.com