आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती सावरली...घर सावरलं !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मी माझ्या मुलांना एवढंच सांगते, आपले वडील गेलेत ते लोकांसाठी. आपल्यासाठी ते आहेतच. ते असताना जे शक्य झालं नाही, ते आपण त्यांच्या माघारी करून दाखवायचं.’ ताराबाई पडोळ सांगत होत्या. सांगताना डोळ्यातले अश्रू निग्रहानं मागे सारत होत्या. त्याच्या जागी फक्त जिद्द आणि हिंमतच दिसत होती. दुसरीकडे हातानं द्राक्षाच्या वेलीवरची त्यांची खुडणी सुरू होती. वेलीच्या खुंटांना नवीन पालवी फुटू लागली होती आणि ताराबाईंच्या कष्टालाही. आठ महिन्यांपूर्वी त्यांचे पती बबन पडोळ यांनी गळफास लावून आत्महत्या केली. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या सोनेवाडी गावची ही घटना.

दीड एकराचा त्यांचा द्राक्षाचा बाग. गेली दोन वर्षं सलग गारपिटीचा फटका बसला. आठ लाखांचं कर्ज १२ लाखांवर गेलं. पुनर्गठन केलं, तरी हातात अवघे पावणेदोन लाख आले. औषधवाल्यांची उधारीसुद्धा त्यातून फिटली नाही. बबनराव गेले, पण ताराबाईंनी हिंमत हरली नाही. पदरात दोन मुलं- एक पाचवीतला प्रशांत आणि बारावीला बसलेला प्रवीण. डोळ्यांचा पदर कंबरेला खोचला आणि नेटानं बाग सावरू लागल्या. आज त्यांच्या डोक्यावर १२ लाखांचं कर्ज आहे. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी, मोडलेला बाग सावरण्यासाठी त्यांच्यात बारा हत्तींचं बळ आलंय... ‘विनायकदादा वडलांसारखे धावून आले. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच मी माझा बाग पुन्हा उभा करू शकले.’ ताराबाई सांगत होत्या. ‘बायफ मित्रा’ या संस्थेकडून त्यांच्या बागेच्या अँगल्सचं काम करवून देण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यातल्या ८३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विधवा पत्नींना ‘बायफ’नं हा मदतीचा हात पुढे केला आहे.

‘शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न हा शेतीचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याचं उत्तर शेतीतच शोधलं पाहिजे.’ विनायकदादा पाटील सांगतात. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या महिलांना मदत देण्यासाठीच्या एका कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. एक साडी, पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, तीन किलो साखर. ती मदत बघून दादांना वाटलं, काहीतरी चुकतंय. त्यांनी माहिती घेतली. दुखणं एक आणि औषध भलतंच. जिल्हा प्रशासनाने मदत मंजूर केलेल्या ८५ आत्महत्याग्रस्त कुटुंबांची यादी मिळवली. त्यातील ३० कुटुंबांना गावोगावी, त्यांच्या शेतावरच्या बांधांवर जाऊन दादा भेटले. त्यांच्या लक्षात आलं, ती कुटुंब, विशेषत: आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा बायका, परिस्थितीशी झगडताहेत. मोडलेला संसार सावरताहेत, आणि बुडालेली शेतीही. सरकारी मदतीच्या एक लाखांपैकी त्यांच्या हातात अवघे ३० हजार पडलेत. उरलेले ७० हजार पाच वर्षांनंतर मिळणार आहेत. त्या ३० हजारात तिनं शिजवायचं काय आणि पिकवायचं काय, ही भ्रांत. विनायकदादा ‘बायफ मित्रा’ या संस्थेचे विश्वस्त. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून या महिलांच्या शेतीसुधारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

बायफ मित्राच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातल्या ८३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना त्यांच्या शेतावर फळबाग विकसित करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी दादा त्या कुटुंबांच्या शेतावर जाऊन त्यांच्याशी चर्चा करीत आहेत, पाहणी करीत आहेत, माहिती घेत आहेत. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांची जिद्द सर्वांनाच अचंबित करणारी आहे. ताराबाईंनी दादांना सांगितलं, नवीन फळबाग कशाला, माझी द्राक्ष बाग सावरायलाच मदत करा. संस्थेच्या मदतीने तिला अँगल्स, तारा पुरवण्यात आल्या. ताराबाईंनी कोसळलेला बाग पुन्हा उभा केला आणि कोसळलेला संसारही! तळवाड्याच्या सुनीता साळवे म्हणाल्या, आमच्या शेतात बोअर आहे आणि बोअरला पाणीही. पण साठवण्याची सोय नाही. दादांनी नाशिकमधील एका उद्योजकांच्या मदतीने तिला पाण्याची टाकी मिळवून दिली. तिसरी महिला म्हणाली, आमच्याकडे पाणी नाही, पण अँपल बोर येतं. बायफ मित्रा तिला अँपल बोरची फळबाग करण्यासाठी मदत करणार आहे.

‘एखाद्याला मासा दिलात तर त्याची आजची भूक भागेल, पण त्यांना मासेमारी शिकवली तर उद्याच्या भुकेची ते स्वत:च व्यवस्था करू शकतील. बायफ मित्राच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना, त्यातल्या विधवा महिला शेतकऱ्यांना मदत करताना आमची हीच भूमिका आहे.’ विनायकदादा सांगत होते. ‘बायफ’ मित्राच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातल्या ८३ महिलांना ही मदत पुरवली जाणार आहे. एक एकर बागेवर फळबाग उभी करण्यासाठी संस्था दोन वर्षं या महिलांना मदत करणार. त्यासाठी शेवगा, पेरू, सीताफळ, लिंबू, डाळिंब या फळातून त्यांनी त्याच्या वातावरणानुसार पिकाची निवड करायची. बायफ मित्रा त्यांना ती बाग उभी करण्यासाठी दोन वर्षं मदत करणार. ती रोपं, त्यासाठीची खतं, तांत्रिक, आर्थिक मदत आणि दोन वर्षं संस्थेच्या कृषीतज्ज्ञांचे मार्गदर्शन असे या मदतीचे स्वरूप असणार आहे. दोन वर्षांत या फळबागा फुलवण्यासाठी प्रत्येकी एक लाखांचा खर्च येणार आहे. पुढे दहा-बारा वर्षं ही कुटुंबं त्या बागांवर उभी राहू शकणार आहेत. त्यामुळे समाजातल्या दानशूरांनी यासाठी पुढे येण्याचं आवाहन विनायकदादांनी केलंय.

शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या नावानं खर्च होणारे कोट्यवधी रुपये. त्यातून ना प्रश्न सुटताना दिसताहेत, ना उत्तरं मिळताना. ‘कुठूनही पैशाची मदत मिळाली की पहिल्यांदा घेणेकऱ्यांचे तगादे लागतात.’ ताराबाई सांगत होत्या. त्यांच्या पतीचं १२ लाखांचं बँकेचं कर्ज बाकी आहे. शिवाय उधारी, उसनवारी. नवऱ्यानं गहाण ठेवलेलं ताराबाईंचं सहा तोळे सोनं तर गेलंच; पण नातलगांचं गहाण ठेवलेलं सोनं त्यांना सोडवून आणून परत करावं लागणार आहे. नवऱ्यानं फेडलं नाही; ही बाई काय फेडणार, म्हणून कुणाकडून उधारही मिळत नाहीए. मुलांच्या शाळेची फी द्यायचीए आणि बागेतल्या खुडणीची मजुरी. सारी संकटं एकाच वेळी. ‘आता मला कळतंय, रात्र रात्र झोप लागत नाही, असं हे का म्हणायचे.’ ताराबाईं सांगतात. पण त्यांनी पतीसारखी हिंमत हरली नाही, उलट मुलांकडे पाहून सारी हिंमत एकवटली आहे. त्या एकट्याच नाहीत. राज्यभर अशा शेकडो विधवा शेतकरी महिला आहेत. अर्धा डाव टाकून पती या जगातून निघून गेलेला. डोक्यावर कर्जाचं ओझं. घेणेकऱ्यांचे तगादे, मुलांची शिक्षणं, तुटपुंजी सरकारी मदत, आजच्या खाण्याचे हाल आणि उद्याच्या जगण्याचे प्रश्न. पण त्या साऱ्या आता सरसावल्या आहेत. शेतीच्या प्रश्नावर शेतीतूनच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताहेत. बायफ मित्रा सारख्या संस्था त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आल्या आहेत. आता गरज आहे समाजानं त्यांचे हात बळकट करण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी देण्याची. महात्मा फुले म्हणाले, एक बाई शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं. तोच नियम इथेही सिद्ध होतोय. एका बाईनं शेती सावरली तर अख्खं घर सावरतं.
संपर्कासाठी : बायफ मित्रा -
विनायक पाटील - ९८२२०५९५४०

दीप्ती राऊत
diptiraut@gmail.com
बातम्या आणखी आहेत...