आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न सोडवण्याचा उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्रियांची बेदखल कामे, विशेषत: पाणी टंचाईच्या, दुष्काळाच्या काळातील; त्यात पडणारी हालाखीची भर, हंडाभर पाण्यासाठी महिलांची होणारी मैलामैलाची पायपीट, मानेच्या मणक्यांचे आजार, कंबरदुखी, पाठदुखी...

या साऱ्याबद्दल बरंच बोललं जातं. लिहिलं जातं. पण शेवटी मुद्दा असतो तो अंमलबजावणीचा, कृतीचा. त्या दिशेने मात्र फारसं काही होताना दिसत नाही.

स्त्री-पुरुष समानतेच्या विषयावर तरुणांचे एक शिबिर सुरू होते. प्रशिक्षक आनंद पवार त्यांच्या कॉलेजच्या दिवसातील एक अनुभव सांगत होते... ‘सुट्ट्यांमध्ये मी गावाकडे आलो होतो. काहीच करायला नव्हतं म्हणून घरातल्या खाटेवर लोळत पडलो होतो. खाटेवरून अंगणातली पाण्याची टाकी दिसत होती. माझी आत्या त्या टाकीतून घागर घागर पाणी भरून नेऊन आतल्या पिंपात टाकत होती. सहज मी मोजलं, एका तासात तिच्या चाळीस खेपा झाल्या. पाण्याची टाकी ते पिंप अवघं आठ-नऊ फुटाचं अंतर; पण एवढ्या वर्षांत कुणालाही वाटलं नाही, दहा फुटाची नळी आणावी आणि घरातल्या बायकांचे हे श्रम कमी करावेत... तो क्षण माझ्यासाठी निर्णायक ठरला. बायकांच्या कामाचं मोल मला समजलं...’

स्त्रियांची बेदखल कामे, विशेषत: पाणी टंचाईच्या, दुष्काळाच्या काळातील; त्यात पडणारी हालाखीची भर, हंडाभर पाण्यासाठी महिलांची होणारी मैलामैलाची पायपीट, मानेच्या मणक्यांचे आजार, कंबरदुखी, पाठदुखी... या साऱ्याबद्दल बरंच बोललं जातं. लिहिलं जातं. पण शेवटी मुद्दा असतो तो अंमलबजावणीचा, कृतीचा. त्या दिशेने मात्र फारसं काही होताना दिसत नाही. प्राध्यापक वर्षा मरवाळीकर यांनाही हीच बाब खटकत होती. त्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून काम करतात.

‘गेल्या पाच वर्षांपासून आमच्या भागात दुष्काळ. घागरभर पाण्यासाठी महिलांचे होणारे हाल मी बघत होते. एका घागरीत १५ लिटर पाणी बसतं. १५ लिटर पाण्याच्या घागरी डोक्यावर, कंबरेवर वाहून बायकांच्या शरीराचे सापळे झालेले. प्रत्येकीला काही ना काही दुखणं जडलेलं. दुष्काळाच्या उपाययोजनेच्या मोठमोठ्या चर्चा सुरू होत्या. उपाययोजना केल्या जात होत्या. पण खेड्यातल्या या बायकांचा हा प्रश्न कुणाच्याही गावी नव्हता. पाणी भरण्याच्या या श्रमाने मी अस्वस्थ होते. यावर उपाय काय, याचा विचार करत होते. त्याच वेळी या वॉटर व्हीलबद्दल मला माहिती मिळाली’, प्रा. मरवाळीकर सांगत होत्या. त्यांनी त्याची माहिती काढली. कॅनडातील तंत्रज्ञानावर आधारित हे वॉटर व्हील राजस्थान-गुजरातमधील एक संस्था वापरत असल्याचे त्यांना कळले. त्यांच्याशी संपर्क साधला आणि पाच युनिट्स ट्रायलसाठी मागविली.

‘त्यावर आम्ही प्रयोग केले. निरीक्षणे नोंदविली. उंचसखल, खडबडीत, वेगवेगळ्या पृष्ठभागाच्या रस्त्यांवर ती वापरून पाहिली. त्याचे परिणाम एकदम यशस्वी होते. एका ड्रममध्ये ४५ लिटर पाणी बसत होते. म्हणजे बाईच्या तीन खेपांची वेळ आणि श्रम दोन्ही वाचते. शिवाय पूश आणि पूल हे तंत्र असल्याने डोक्यावरच्या वजनाने, कंबरेवरच्या वजनाने तिच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम शून्य आहेत.’ त्या सांगतात. पहिली ट्रायल यशस्वी झाल्यावर त्यांनी शासनाशी संपर्क साधला. बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २० वॉटर व्हिल्स खरेदी करून देण्यासाठी मंजुरी दिली. तुळजापूरमधील दहा बचत गटांसाठी प्रत्येकी दोन दोन व्हिल्स दिली आहेत. गटातील महिला आळीपाळीने ती व्हिल्स वापरून पाणी भरतात. ‘सुरुवातीला लोक हसायचे. म्हणायचे, हे काय येड्यागत. पण त्याचा फायदा आता सगळ्यांनाच दिसू लागलाय. आता लोक चौकशी करतात, हे कुठं मिळतं सांगा.’ सालगऱ्याच्या अर्चना कोळी सांगतात. त्यांच्या जय किसान कृषी महिला गटाला दोन वॉटर व्हिल मिळाली आहेत. ‘आमच्या गावात यंदाच नाही, गेल्या पाच वर्षांपासून पाण्याचा प्रश्न आहे. तीन किलोमीटर दूरून बायांना पाणी आणावं लागतं. घागरी आणून आणून बायांचे खुळखुळे झाले. आता आम्ही वॉटर व्हील वापरू लागल्यापासून दुखणी कमी झालीत. वेळ वाचतो आणि मेहनतही. शिवाय घागर उचलताना, ठेवताना त्यात हात जातो, मात्र या व्हिलमधील पाणी स्वच्छच राहते.’ अर्चना ताई सांगतात.

विजया डांगेंचाही अनुभव तसाच आहे. ‘आमची वस्ती डोंगरावर आहे. त्यामुळे हे व्हील चालेल का, याची शंका होती. पण प्रत्यक्ष वापरायला लागलो तेव्हा काहीच अडचणी आल्या नाहीत. उलट आधी सायकलवरून, डोक्यावरून पाणी चढवून आणायचो, तेव्हा खूप त्रास व्हायचा.’ विजयाताई सांगतात. ‘पण आमची संपूर्ण वस्ती आहे चारशे लोकांची. आमच्याकडे वॉटर व्हिल आहेत फक्त दोन. ती पुरत नाहीत.’ जास्त व्हिल्स द्यावीत किंवा त्यासाठी अनुदान दिले तर आम्ही खरेदीही करू, अशी आता लोकांची तयारी आहे. त्यामुळे आता पुन्हा निर्णयाचा चेंडू सरकारच्या कोर्टात आहे. पिण्याचे पाणी साठवण्यासाठी आणि तेच रोलींग होत असल्याने यासाठी अत्यंत उच्च दर्जाचे प्लास्टिक वापरण्यात आले आहे. त्यामुळे एका वॉटर व्हिलची किंमत अडीच हजार पडते. थोडी सवलत मिळाली तर बाराशे-पंधराशे रुपयांपर्यंतची किंमत परवडू शकते, असे लोकांचे म्हणणे आहे. आता, पाणी ओढून ओढावून घेतलेल्या दुखण्यांवर हजार रुपयांचे औषध करायचे, की अडीच हजारांचे वॉटर व्हील आणायचे, हा विचार सर्वांनीच करण्याची ही वेळ आहे. महागडे मोबाइल, गाड्या त्वरित आणल्या जातात. गावातल्या दारूदुकानवाल्याची दिवसाची कमाई यापेक्षा जास्त असेल. पण घरातल्या बाईच्या सुखसोयीसाठी काही आणायचे म्हटले की, हे सारे हिशेब केले जातात.

चौदाव्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी आता थेट ग्रामपंचायतींना मिळणार आहे. त्यातील १० टक्के निधी हा महिला व बालविकासासाठीच खर्च करणे अत्यावश्यक आहे. यासाठी महिलांच्या खास ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. तेव्हा ग्रामपंचायतींच्या पातळीवरही या वॉटर व्हिलची खरेदी होऊ शकते. पण गावातील महिलांनी एक होऊन त्याची मागणी केली आणि गावकऱ्यांनी त्याची दखल घेतली तर. जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण निधी, आमदार-खासदार निधी, देणग्या, सप्ताहासाठीची वर्गणी. उद्योग क्षेत्रातील सीएसआरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी नुकताच स्थापन केलेला सामाजिक परिवर्तन निधी. पर्याय अनेक आहेत. करायचं ठरवलं तर मार्ग भरपूर आहेत. एका वॉटर व्हिलसाठी अडीच हजार. दहांसाठी अडीच लाख. प्रश्न सोडवण्याचा उपाय सापडला आहे. तो अमलात आणणं आता प्रत्येकाच्या हातात आहे. बाईच्या श्रमाचं मोल जाणणारं मन तेवढं गरजेचं आहे.
(diptiraut@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...