आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जावर उतारा शेतीचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला शेतीची काहीच माहिती नव्हती, की पार्श्वभूमी नव्हती. परंतु, जेव्हा अडचणीचे दिवस आहेत, तेव्हा आपण शेती करू शकतो, असा आत्मविश्वास मात्र होता. वाटेकऱ्यांकडून शेती सोडवून घेण्यासाठी तब्बल १५ लाखांचे कर्ज झाले होते. बरीचशी जमीन जर्जर झाली होती. बहुतांश भाग पडीक होता. फारसा अनुभव गाठीशी नव्हता. ही बाई काय शेती करणार, म्हणून गावातले लोक हसत होते. उसाचा उतारा, हरभऱ्याच्या सरी, काहीच माहीत नव्हतं. पण गेल्या नऊ वर्षांत हळूहळू सारे शिकत गेले. कर्ज कमी करीत गेले आणि भांडवल साठवत गेले. आज आमच्याच नाही, तर इतर गावातील शेतकरीही आमची शेती मोठ्या उत्सुकतेने पाहण्यासाठी येतात. उत्पादन खर्च कसा कमी केला आणि उत्पादन कसे वाढवले, याची माहिती घेतात, तेव्हा खूप बरे वाटते.

सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातलं आष्टा हे माझं गाव. नऊ वर्षांपूर्वी १६ एकर शेती आमच्या ताब्यात आली. तोपर्यंत चुलत सासरे शेती बघत होते. बघत होते म्हणजे वाट्याने दिलेली होती. पण वाटेकरी फारसे लक्ष देत नव्हते. रान पडीक झाले होते. ते सोडवून घेण्यासाठीच लाखोंचे कर्ज झालेले. रान हिरवं करण्यासाठी अधिक कर्ज काढणं शक्यच नव्हतं. मी विचार केला, दुसऱ्यांना लावायला देण्यापेक्षा आपणच करून बघू आणि शेतात पाऊल टाकलं. सुरुवात करावी लागली, ती पडीक झालेले रान स्वच्छ करण्यापासून. खूप तण वाढले होते. दुर्वांच्या मुळ्या निघता निघत नव्हत्या. जो जे सांगील, ते ते सारे प्रयोग करून पाहिले. शेवटी बायका कामाला लावून तण साफ केले, आणि शेतीला सुरुवात केली.

सगळे जण ऊस आणि सोयाबीन लावत होते, त्यामुळे मी पण त्याचीच सुरुवात केली. दीड एकरावर ऊस लावला. पण एकरी अवघा ४० टन उतारा पडला. पण त्यातून खचून न जाता मी मिळेल तेथून माहिती मिळवू लागले. वर्तमानपत्रात येणारी कात्रणे वाचू लागले. कृषी तज्ज्ञांचे संपर्क मिळवून त्यांना भेटू लागले. त्यांच्याकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतीत बदल करत गेले आणि त्याचा परिणाम दिसू लागला.

नाशिकच्या गहू संशोधन केंद्रातील कृषी शास्त्रज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांचा गव्हावरील लेख वर्तमानपत्रात वाचनात आला. त्यांना संपर्क केला असता त्यांनी बियाणे बदलण्याच्या सूचना केल्या. खतांच्या वापराबद्दलच्या काही पद्धतीत बदल सुचविला. त्याने गव्हाचे सरासरी उत्पादन वाढले. कृषी केंद्रातून महिती घेऊ लागले. राहुरी विद्यापीठाच्या डीग्रजच्या शेती शाळेस उपस्थित राहू लागले. ऊस आणि सोयाबीन स्वतंत्रपणे करण्यापेक्षा उसात सोयाबीन हे आंतरपीक घेऊ लागले. शिवाय उसाच्या वरंब्यावर भुईमूगही टाकू लागले. जूनअखेरीस उसाची लागवड होईपर्यंत, दोन महिन्यांत भुईमुगाचे उत्पादन हातात येऊ लागले. शिवाय भुईमुगाच्या वेली उसाच्या बुडक्यांमध्येच टाकायला सुरुवात केली. त्यावर माती पसरून हिरवं खतही मिळू लागलं. यातून नत्राची बचत होऊ लागली आणि उत्पादनही वाढले. मिळणाऱ्या प्रत्येक माहितीतून हे एकेक प्रयोग करत गेले, आणि शेतीचे एकूण सरासरी उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढवत गेले.

एके ठिकाणी वाचले, सोयाबीनचे पीक जमिनीची ताकद ओढून घेते. त्यामुळे दोन वेळा उसात सोयाबीन लावून मी तो अनुभव प्रत्यक्षात घेतला. त्यासाठी एकाच वेळी दोन एकरावर उसात सोयाबीन आणि दोन एकरावर उसात भुईमूग असे दोन नमुना प्लॉट तयार करून त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. सोयाबीन लावलेल्या उसापेक्षा भुईमूग लावलेला ऊस लवकर झाला. शिवाय त्याच्या कांड्याही जास्त होत्या. हे झाले उदाहरणाखातर. असे अनेक प्रयोग केले. त्यातूनच एकरी ५० टनाचा उसाचा उतारा, सध्या मी ९० टनावर पोहोचवला आहे. उसात सोयाबीन लावले, तेव्हा एकरी १२ पोती उत्पादन झाले. भुईमूग आणि सोयाबीन लावले, तेव्हा हे प्रमाण १६ पोत्यांवर गेले.

असाच माझा दुसरा प्रयोग यशस्वी झाला, तो ज्वारी आणि हरभरा या मिश्र पिकांचा. वरंब्यावर ज्वारी लावली आणि खळीत हरभरा. हरभऱ्यातील किटक ज्वारीवरील पक्षी खातात. हरभऱ्याचे नत्र ज्वारीला मिळते. दोन्ही पिके परस्परपूरक झाली आणि दोन्हीचे उत्पादन वाढले.

पिकाचे नियोजन हे यशस्वी शेतीचे महत्त्वाचे गमक आहे. फक्त पिकांचेच नाही तर पिकांच्या लागवडीचेही. ऊस लागवड करण्यापूर्वी मी पूर्व हंगामी मे अखेरीस हळद घ्यायला सुरुवात केली. हळदीवर तांबेरासारखे रोग येत होते. त्यासाठी मक्याचे आंतर पीक घेतले. त्यातून तिहेरी फायदे होऊ लागले. रोगाचा अटकाव झाला, स्वीट कॉर्नची कणसे विकू लागले आणि पातं वैरण म्हणून जाऊ लागली.
पूर्वी हातात भांडवल नव्हते, तेव्हा येईल त्या भावाला माल विकावा लागत होता. आता हातात भांडवल खेळू लागल्यावर पडत्या भावाला माल विकत नाही. यंदाही ६० पोती सोयाबीन मी घरात ठेवली आहेत. भाव वाढले की, विकेन. चांगल्या मशागतीमुळे माझ्या सोयाबीनची प्रतही चांगली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रापेक्षा घरगुती ग्राहके जास्त येतात. 

सोयाबीनबद्दलही बरेच प्रयोग केले. सुरुवातीस औषध दुकानदार सांगे, तशी औषधे वापरत होते. त्यातून उत्पादन कमी आणि उत्पादन खर्चच जास्त होत होता. कृषी सल्लागारांच्या संपर्कात आल्यावर माझ्या लक्षात आले. मेडिकलमधून परस्पर औषधे आणणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे आणणे, यातीलच हा फरक होता. दुकानदारांनी व्यापार वाढावा, नफा वाढावा, कमिशन मिळविणे यासाठी दुकान उघडलेले असते. त्या उद्देशाने शेतकऱ्यांच्या माथी औषधे, खते मारतात. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्याएेवजी नुकसानच होते. हे लक्षात आल्यावर मी स्वत: अभ्यास करून माहिती घेऊ लागले. पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणते खत कोणत्या मात्रेने द्यायचे, याच्या नोंदी ठेवल्या, त्याचे नियोजन केले आणि ते शास्त्रशुद्ध रीतीने पाळले.

या साऱ्यात पती, सासरे आणि मुले यांचा मला खूप आधार झाला. घरी परतायला रात्री उशीर झाला, तरी त्यांनी कुरबुर केली नाही. साथ दिली. म्हणूनच शेतीचे हे आव्हान मी खंबीरपणे पेलू शकले. अजून खूप काही करायचे आहे. सध्याची ही शेती पाटाच्या पाण्यावर आहे. हवामान आपल्या हातात नाही. पाण्यावर सारे नियोजन बिघडून जाते. त्यामुळे पहिल्यांदा ती पाण्यासाठी स्वावलंबी करायची आहे. तेव्हाच ठिबकद्वारे पाण्याची बचतही करू शकेन. इतरही अनेक प्रयोग बाकी आहेत. पण एक समाधान आहे. बरंचसं कर्ज फेड पूर्ण झाली. सुरुवातीस नावे ठेवणारे लोक आता उत्पादनातील प्रगती समजून घेण्यासाठी येत आहेत.

जमिनीचे नियोजन
३ एकर- ऊस जुनी लागवड, भुईमूग
४ एकर- सोयाबीन
५ एकर- ऊस नवीन लागवड
१ एकर- हळद-आंतरपीक-
स्वीट कॉर्न
२ एकर- हरभरा - आंतरपीक - ज्वारी
एकूण जमीन  - १६ एकर
    
-  दीप्ती राऊत
  diptiraut@gmail.com
बातम्या आणखी आहेत...