आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंमत ठेवली, साथ मिळाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांच्या आत्महत्या... सर्वाधिक राजकारण झालेला हा विषय. पण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पश्चात त्यांच्या बिघडलेल्या शेतीचा मांडव सावरणाऱ्या, त्यांच्या पत्नी मात्र बेदखलच राहात आहेत. मैदान सोडून गेलेल्याचे भांडवल होते, पण पदर खोचून मैदानात लढणाऱ्या तिला मात्र एकाकी सोडले जाते. अशाच एका लढणाऱ्या शेतकरणीचा झगडा ‘शेतीमाय’च्या सदरात गेल्या वर्षी याच वेळी प्रकाशित करण्यात आला होता. गेल्या वर्षी कोलमडून पडलेल्या त्यांच्या बागेत यंदा क्विंटलभर द्राक्षे लगडली आहेत. यासाठी त्यांना मदतीचा हात देणाऱ्या ‘बायफ मित्रा’च्या मैत्रीच्या साथीविषयी ताराबाईंच्या शब्दात...

आम्हाला ते सोडून गेले, पण मी लेकरांना वाऱ्यावर सोडून कुठे जाणार...? आपण हिंमत हरायची नाही... हा एकमेव विचार, तेव्हा माझ्या मनात होता. मुलांना बजावलं, आपले वडील आहेत, असेच समजून काम करायचे. आधी आमची एकच द्राक्षाची बाग होती. यांना मोह झाला, दुसरी बाग करण्याचा. त्यात गारपिटी, अवकाळी आणि पाण्याची टंचाई या तीन वर्षांच्या तीन संकटांनी साऱ्यांचाच जीव घेतला. पाच लाखांचं कर्ज दहा लाखांवर गेलं. टीव्हीवर कर्जाच्या पुनर्गठनाची जाहिरात ऐकली आणि आम्हाला वाटले, त्यातून दिलासा मिळेल. प्रत्यक्षात पुनर्गठनाच्या नावाखाली बँकेने त्यांची थकबाकी कापून घेतली आणि आमच्या पदरी लाखभर रुपयेही पडले नाहीत.

डोक्यावरचा बारा लाखांच्या कर्जाचा बोजा जसाच्या तसा. तो भार सहन न झाल्याने, त्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली. पण मी त्या मार्गावर जाऊ शकत नव्हते. पाचवीतला प्रशांत आणि बारावीतला प्रवीण ही दोन मुलं मला डोळ्यासमोर दिसत होती. त्यांच्यासाठी मला जगायला हवंच होतं. समोरचं वावर दिसत होतं, पण आधार काहीच नव्हता. त्यांनाही आणि मलाही. नेमक्या याच वेळी विनायकदादा पाटील आणि त्यांची ‘बायफ मित्रा’ची टीम मदतीला आली, आणि बागेला तसेच मलाही आधार मिळाला.

आत्महत्यांचे मूळ कारण शेतीच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेत समजले जाते, म्हणून ‘बायफ मित्रा’ने त्यावरच कामाला सुरुवात केली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांची शेती सावरण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. एक एकरावर फळबाग करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. पेरू, शेवगा, डाळिंब यापैकी कशाची बाग करायची, याची निवड शेतकऱ्याने करणे अभिप्रेत होते. माझ्या बागेत द्राक्षांची रोपं डवरली होती, पण पैशाअभावी अँगल्स आणि तारांची खरेदी करणे मला शक्य नव्हते. 

अँगल्स आणि तारांशिवाय बाग करणे अशक्य. मी दादांना विनंती केली, मला नवीन फळबाग करण्याऐवजी द्राक्षाचा मांडव करण्यासाठीच ‘बायफ मित्रा’ने मदत करावी. त्यांनाही ती कल्पना पसंत पडली. ‘बायफ मित्रा’च्या मदतीने मंडप उभा राहिला. बायफ तेवढ्यावरच थांबले नाही. बागेची काळजी कशी घ्यावी, कोणत्या वेळी काय निगराणी करावी, कोणत्या वातावरणात काय फवारणी असावी, तिची मात्रा किती द्यावी, पाणी किती द्यावे, कसे द्यावे, अशा प्रत्येक लहानसहान बाबींमध्ये संस्थेने मदत केली. म्हणूनच आज आम्ही एवढे उत्पादन घेऊ शकलो. संस्थेच्या कृषी तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन आणि त्याचे आम्ही केलेले काटेकोर पालन हेच आजच्या बागेचे यश आहे. आज अव्वल दर्जाची निर्यातक्षम १०० क्विंटल द्राक्षे आम्ही घेऊ शकलो, ते केवळ आणि केवळ याच सूत्राच्या आधारावर.

प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधत गेले. ‘बायफ’ने दिलेल्या लोखंडाच्या तारा संपल्या, तेव्हा नायलॉनच्या दोऱ्या बांधल्या. कागद खरेदी करायला पैसे नव्हते, कागदवाल्याला बागेत बोलावून माल दाखवला. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती, पण मी कधीच हिंमत हरली नाही. आजही परिस्थिती पूर्णपणे साथ देत नाही, द्राक्षाचे भाव निम्म्याने कोसळले, नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांची अडवणूक सुरू आहे, स्थानिक दराने द्राक्षे विकावी लागत आहेत. व्यापारी चेक देणार, मात्र मजुरांना रोखीने पैसे द्यावे लागत आहेत. औषधवाल्याची उधारी आहे, मागची देणी बाकी आहेत. पण ‘बायफ’ मित्रासारखा माझ्यासोबत आहे, त्यामुळे या खड्ड्यातून बाहेर पडण्याची ताकद मला मिळाली आहे. खड्डा खूप मोठा आहे, पण खचून न जाता आपण त्यातून बाहेर पडू शकतो, याची साक्ष पतीने हतबल होऊन सोडून दिलेल्या बागेत मी पिकवलेली १०० क्विंटल द्राक्षे देत आहेत. कर्जमाफी हा उपाय नाही, हे माहीत आहे; पण सरकारने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांवरील कर्ज तरी माफ करावं, अशी विनंती आहे.

शब्दांकन: दीप्ती राऊत
- diptiraut@gmail.com

संपर्क :  ताराबाई पडोळ, सोनोवाडी, ता. निफाड, जि. नाशिक
 
पुढील स्लाइडवर वाचा महिलांचे शेती व्यवस्थापन अधिक चोख....
बातम्या आणखी आहेत...