आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढायचं ठरवलं पण जिंकण्यासाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टरबुजाचं बियाणं बनावट निघालं. दुधाचे भाव कोसळले. लाखो रुपये गुंतवलेले द्राक्षाचे कंटेनर काही सरकारी अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे परत आले. कर्जाचा डोंगर कोट्यवधींच्या घरात गेला. पण मी ठरवलं, हरायचं नाही, लढायचं; तेही जिंकण्यासाठीच! कारण शेती करायची, याच उद्देशाने मी कृषी महाविद्यालयातून अॅग्रीकल्चर इंजिनिअरींगची उच्च पदवी चांगल्या गुणांनी मिळविली होती. आता मी शेती करण्यात हरलो तर इतर शेतकऱ्यांना मी कसं सामोरं जाणार, या एकमेव विचाराने जिद्दीने काम केले. कर्जाचा गुंता वाढवणाऱ्या आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे शोधली. म्हणूनच आज फक्त माझ्याच नाही, तर माझ्यासोबत आलेल्या अडीच हजार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकलो.

शेती हा जुगार असल्याचे बोलले जाते. पण हा फक्त शेतकऱ्यासाठीचा जुगार नाही तर बँका, शासन अशा संपूर्ण यंत्रणेसाठीच जुगार बनला आहे. कारण, बेभरवशाचे हवामान, भावातील तीव्र चढउतार आणि सरकारची बदलती धोरणे याला दोष देत तुकड्यातुकड्यांत आपण या प्रश्नांचा विचार करत राहिल्याने तुकड्यातुकड्यांत मिळणारी उत्तरेही तोकडी पडत आहेत. त्यापेक्षा क्लस्टर पद्धतीने शेतकरी ते ग्राहक असा समग्र विचार केला, तरच प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तरे शोधू शकतो, हा माझा शेतकरी म्हणून आणि ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी’ म्हणून सामूहिक स्तरावरचा अनुभव आहे. 

तत्पूर्वी, ‘एमटेक’ झाल्यानंतर इतरांप्रमाणे मीसुद्धा शिकलेल्या, पाहिलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांनी शेतीला सुरुवात केली. फळबाग लावली, भाजीपाला पिकवला. पण एका वर्षी टरबुजाचं बी बनावट निघालं. पीक आलं नाही. ५० हजारांचं पहिलं कर्ज झालं. महिन्याला दोन हजारांचा हप्ता बसला. त्यातून बाहेर पडण्यासाठी काही जणांना सोबत घेऊन डेअरी सुरू केली. पण दुधाचे भाव सात-आठ रुपये लिटरवर आले. डेअरी बंद पडली. कर्जाचा डोंगर वाढतच गेला. पण ठरवलं, हार मानायची नाही. एवढे प्रश्न आहेत, मग त्यांची उत्तरेही असतील. माझ्या मते, उत्तर नाही असा कोणता प्रश्नच नसतो.

एक कागद घेतला. त्याच्या एका बाजूला सर्व प्रश्न, अडचणी मांडल्या. समोरच्या बाजूला ते सोडविण्याचे एकेक पर्याय लिहीत गेलो. अपयशामुळे निराश होणारे सारे मन, सारी विचारशक्ती कागदाच्या त्या दुसऱ्या बाजूला लिहिलेल्या पर्यायांवर केंद्रित केली. उत्पन्न वाढीच्या पर्यायांवर लक्ष केंद्रित केलं. डेअरी व्यवसायामुळे शेण तयार होतं. त्यापासून गांडूळ खत बनवलं. ते तीन रुपये किलोच्या भावानं विकलं. दर्जेदार द्राक्ष उत्पादनाकडे सारी शक्ती लावली. बँकांशी बोललो, कर्जफेडीची मुदत सहा महिन्यांनी वाढवून घेतली. मार्केटिंगची पद्धत बदलली. बंद पडलेल्या डेअरीचं पॅकिंग हाऊस बनवलं. पिकवलेली द्राक्ष निर्यातदाराला विकण्यापेक्षा स्वत:च निर्यात केली. पहिल्या वर्षी आजूबाजूच्या शेतकऱ्यांसह तीन कंटेनर द्राक्ष बाहेर पाठविली. त्यात यश आलं. स्वत:साठी सहा महिने दिले होते, त्याएवजी दोन वर्षे लागली, पण त्या गुंत्यातून बाहेर पडलो. सततच्या गटांगळ्या खाणाऱ्या बाजारभावाच्या भरवशावर शेतीमाल सोडून देणे, ही पहिली चूक असल्याचे जाणवले. द्राक्ष निर्यातीत जम बसला, तेव्हा सामूहिक ताकदीचा प्रत्यय आला. त्यानंतर अचानक २०११मध्ये क्लोरमेक्वाट क्लोराईटचा प्रश्न उद्भवला. शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना, निव्वळ सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे युरोपात पाठवलेले द्राक्षांचे कंटेनर माघारी आले. कर्जाचा आकडा लाखांवरून साडेसहा कोटींपर्यंत पोहोचला. चारही बाजूंनी कोंडी झाली. अनेक निर्यातदारांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले. पण सहकारी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले. थोडी मुदत वाढवून घेतली. घरची थोडी जमीन विकली, पण त्यांचेही पैसे देऊन टाकले.

या साऱ्यात शेतकऱ्यांची संघटित ताकद, सहकाराचं तत्त्व आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेलं शास्त्रशुद्ध व्यवस्थापन ही त्रिसूत्री मला गवसली. परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन २०१४मध्ये ‘सह्याद्री फार्मर्स अॅण्ड प्रोड्युसर्स कंपनी’ स्थापन केली. पिकांच्या नियोजनापासून उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढणे यावर सर्वांनी मिळून काम सुरू केलं. पण एका शेतकऱ्याने पॅकिंग किंवा कुलिंग युनिट सुरू करणे म्हणजे तीन महिन्यांचा मोसम संपला की, नऊ महिने ते पडून राहात असे. म्हणून मग ‘सह्याद्री’ने सामूहिकपणे पॅकिंग, कुलिंग, प्रोसेसिंग ही युनिट उभी केली. परिणामी, पहिल्या दोन वर्षांत आमच्या शेतकरी कंपनीचा कारभार २१० कोटींवर पोहोचला. नाशिक जिल्ह्यातल्या तीन तालुक्यांतले अडीच हजार शेतकरी प्रत्यक्ष तर १० हजार शेतकरी अप्रत्यक्षपणे या सामूहिक साधनेचा भाग बनले आहेत. बाहेर ७० रुपये किलोचा भाव सुरू असताना, आमच्या शेतकऱ्यांना द्राक्षाचा ८५ पर्यंत भाव मिळाला. सध्या टोमॅटोचे भाव एक रुपये किलोवर घसरले आहेत. आम्ही तीन रुपये किलो देऊ शकतोय. कारण, ‘सह्याद्री’ने टोमॅटोची पेस्ट बनविण्याच्या तंत्रापासून बाजारपेठेपर्यंतची यंत्रणा आधीच उभी केली आहे. आजच्या घडीला आम्ही नाशिक जिल्ह्यातील १०४१ द्राक्ष उत्पादकांची ९०४ कंटेनर द्राक्ष जगभरात निर्यात करतो. कोकणातील आंबा आणि जळगावच्या केळ्यांना रसायनमुक्त पिकविण्याची, नाशिकच्या भाजीपाल्याला सहा महिने ताजे ठेवण्याची व्यवस्था करू शकतो.
 
आता अशा पन्नास पिकांच्या उपकंपन्या आम्ही तयार केल्या आहेत. सहकारी तत्त्व हे आमच्या कामाचं बीज आहे. कोणत्या पिकाची निवड करायची, कशा पद्धतीने लागवड करायची, मशागत कशी करायची, काढणी कधी व कशी करायची, या साऱ्याचे मार्गदर्शन ‘सह्याद्री’ची टीम करत आहे. ‘सह्याद्री’चे सभासद असलेल्या वडगावमधल्या शेतकऱ्याच्या कोणत्या शेतातील कोणते पीक कोणत्या अवस्थेत आहे, त्यासाठी कोणती खते, औषधे वापरण्यात आली आहेत, त्या पिकासाठी जगाच्या पाठीवरच्या कोणत्या देशातील कोणत्या ग्राहकाची मागणी आहे, हे सारे दिंडोरीत बसवलेल्या कॉम्प्युटरच्या एका क्लिकवर कळू शकते. युरोपातील ग्राहकाला वडगावचा शेतकरी जोडला जाणं, हे आमच्या सामूहिक ताकदीचं यश आहे. कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत त्याची शेती फायदेशीर व्हावी. या आमच्या क्लस्टरच्या प्रयोगाचे हे यश आहे. सहकाराचा मंत्र, व्यावसायिक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्र या त्रिसूत्रीचा हा विजय आहे.
- विलास विष्णू शिंदे
शब्दांकन
: दीप्ती राऊत
diptiraut@gmail.com
बातम्या आणखी आहेत...