आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्टाचाराचा पिंजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिष्टाचार हे माणसाला माणूस म्हणून मान-सन्मान देणारे असावे, माणसाच्या हक्क-अधिकारांचा, स्वातंत्र्याचा आदर करणारे असावे. पण आपल्या समाजात शिष्टाचाराच्या नावाखाली दुसऱ्यावर जगणं लादलं जातं. आयुष्यभर पिंजऱ्यात राहावं, अशी अपेक्षा केली जाते...

शेजारचे काका वाट्टेल ते बोलत असतात, मात्र त्यांच्या वयाचा मान ठेवत त्यांना शक्यतो आम्ही सारेच उलट उत्तरं द्यायचं टाळतो. तशी मी आणि माझा समुदाय त्यांना फारसे गांभीर्याने घेत नाही. परवा, गल्लीतल्या एका कार्यक्रमात काका बोलायला उभे राहिले. आमची बोली, कपडे, वागणूक यावर बोलू लागले. सारं बोलून झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं, मग लगेच पलटले आणि मला तसं म्हणायचं नव्हतं, असं म्हणून माफीही मागितली. पण लोकं माफी नाही, तर बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवतील, हे त्यांनाही माहिती होतं. त्या माफीला फारसं महत्त्व नाही. राहिला प्रश्न वस्त्रांचा, तर आम्ही निवडलेली वस्त्रे, ही दबावापोटी नाही तर आवडीपोटी घालतो. आणि त्यांचं वाक्य होतं, तुम्ही स्त्री किंवा पुरूष नाही आहात म्हणून स्त्रियांंची वस्त्रं परिधान करू नये. कुणी काय घालावं आणि काय घालू नये. हे ठरवण्याचा अधिकार कोण कोणाला देतं? व का देतं? ते सारवासारवी करत म्हणाले, साडी ही स्त्री दास्याचं प्रतीक आहे, म्हणून मी तसं म्हणालो.

प्रश्न स्त्रीच्या गुलामीचा आहे तर, हा सल्ला तृतीयपंथींना का? महिलांनाच या विषयी सजग करण्याचे काम हाती का घेऊ नये? त्यांची ही वाक्यं त्यांच्या नेणिवेतील तृतीयपंथींविषयीच्या मानसिकतेबद्दल प्रश्न उभे करत होती. आपण सामाजिक शिष्टाचाराच्या नावावर एखाद्याच्या खासगी जगण्यावर प्रश्न उभे करतो आणि त्यांना सामाजिक स्वरूप देऊन स्वतः त्यातून मोकळे होऊ पाहतो, त्यालाच कदाचित शिष्टाचार म्हणत असावेत, असं मला या क्षणी वाटून गेलं. हे सगळं सांगायचं कारण, या लादलेल्या शिष्टाचाराची अनुभूती माझ्या समुदायालाही पदोपदी येत असते. आमचं जगणं, व्यक्त होणं त्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून काही लोक आम्हाला कोंडू पाहतात. आमच्या माणूस म्हणून असलेल्या संवैधानिक अधिकारांना हिसकावू पाहतात. आमच्या प्रतिकाराच्या सीमा तपासू पहातात... कारण त्यांना कसंही करून आम्हाला त्यांच्या तथाकथित शिष्टाचारात बसवायचं असतं. जेव्हा काही गोष्टी पटतात, पण पटवून घ्यायच्या नसतात, तेव्हा समांतर प्रश्न किंवा मूळ मुद्यांसारखे भासणारे पण मूळ मुद्याशी सबंध नसणारे प्रश्न उपस्थित केले जातात. कारण, त्या प्रश्नांनी तुमच्या मूळ गाभ्याला दुखावलं असतं आणि त्याच वेळेला तुम्ही उघड विरोध केला, की उघडे पडण्याची भीती वाटत असते. प्रामुख्याने ही घुसमट पुरोगामित्वाच्या बुरख्याआड लपलेल्या कट्टर पुरूषी मानसिकतेला होते. हाताच्या बोटांवरून शरीराच्या सगळ्या अवयवांच्या कल्पना करून काल्पनिक बलात्कार करणारी ढोरं एकमेकांना शिष्टाचाराचे धडे देतात. अंग झाकण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकीच्या आवराणातल्या बेड्या घालून आदेश काढले जातात, आणि वरून व्यक्ती स्वातंत्र्याचा आव आणला जातो. चांगले आणि वाईट हा भेदच मूळात शिष्टाचारातून येतो. मग हे शिष्टाचार तयार करायची जबाबदारी कुणाची? कोण तयार करतंय आणि कोण अनुसरण करतंय? हा अभ्यास व्हायला हवा. स्त्री स्वातंत्र्यावर (स्त्री स्वातंत्र्य म्हणजे बायकांनाच लागू होत नाही, ते स्त्रैण स्वातंत्र आहे) बोलले की गोळा का उठावा...?

पुरूषी विचारांचे वाहक रस्त्यावर उघडपणे शौचास बसतात, लघवी करतात, कपडे बदलतात, बाईची मर्जी नसताना भर रस्त्यात प्रणयही करतात, पण तेव्हा ते पुरूष असतात आणि ती गोष्ट त्यांची मूलभूत गरज असते म्हणून बाकीच्यांनी नजरा इतरत्र वळवाव्यात,अशी त्यांची अपेक्षा असते. दुसऱ्या गटातील व्यक्तिस्वातंत्र्याच्या वेळेस मात्र हे आंधळे भोई सदाचाराच्या पालख्यांमध्ये हुकूम बसवून आणणार आणि शिष्टाचाराचे ढोल वाजवणार. पिढीजात स्त्रैण गुलामीचा पिंजरा उघडा पडून बाई, जर माणूस झाली, मानवी हक्क मागू लागली तर यांच्या पुरुषी अंहकाराचे हनन होणार... या विचारानेच यांची मानसिक तडफड होते. कारण, यांना सभ्यतेपेक्षा पुरुषी सत्तास्थानांची काळजी जास्त असते, पण ते उघड मान्य करायलाही जमत नाही म्हणून...

कुणी काय झाकायचं, काय उघडं ठेवायचं, कुणासोबत बसायचं, उठायचं, झोपायचं, काय घालायचं, कसं वागायचं, कसं व्यक्त व्हायचं, हे व्यक्तिगत मत असायला हवं, पण हे वैयक्तिक मत एका विशिष्ट गटावर संस्कार आणि संस्कृतीच्या नावावर लादलं जातं, तेव्हा त्यामागचा हेतू माणूसपण मारून त्याला दास बनवणं हाच असतो. त्यालाच शिष्टाचार म्हणून मिरवलं जातं.
शिष्टाचार, संस्कार, संस्कृती, तत्त्व, वैचारिकता या काळ, जागा, प्रसंगपरत्वे बदलत असते. जे आपल्या शिष्टाचारात बसते, ते इतरांच्या नाही, मग माझ्या व्याखेत बसत नाही, म्हणून तो संस्कार वैचारिक दिवाळखोरीत गणला जातो. तसं पहायला गेलं, तर नग्नता हा मूळ नैसर्गिक आणि वैश्विक आणि मानवी समानता आणणारा गुणधर्म, पण त्याला समजण्याचा, पचवण्याचा, मान्य करण्याचा अधिकार आपले शिष्टाचार आपल्याला देत नाहीत. कारण, आम्हाला शोषक आणि शोषित म्हणून जगण्याची सवय झाली आहे. आम्ही एकमेकांना एकमेकांशी बरोबरीने वागवायला तयार नाही आहोत. आम्हाला आमची पुरुषी  सत्तास्थानं गमवायची नाहीत, म्हणूनच मग आम्ही समोरच्याला पिंजऱ्यात बसवतो, पिंजऱ्यातलंच जगणं जगायला भाग पाडतो आणि त्याला नाव देतो- शिष्टाचार!
 
- दिशा
disha.kene07@gmail.com
बातम्या आणखी आहेत...