आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी घात कधी आघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी नेहमीप्रमाणे सकाळी नानाच्या चहाच्या टपरीवर बसले होते. चहासोबत मोबाइल पाहणं सुरू होतं. इतक्यात समोरून खुशी आली. “हाय, दिशा! कशी आहेस?” तिचं हे असं नाजूक आवाजातलं बोलणं, वागण्यातली लकब, माझ्या नेहमीच ओढीची राहिलेली आहे. खूपच गोड दिसते ती. त्यात तिनं यंदा यशवंतराव मुक्त विद्यापीठात अॅडमिशन घेतलीय. ती एक चांगली मेंदी आणि रांगोळी आर्टिस्टसुद्धा आहे. मी बऱ्याच वेळा तिला नुसतीच पाहात असते.
 
 
 इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरू होत्या. मध्येच तिने माझा फोन घेतला आणि गॅलरी चाळायला सुरुवात केली. मधल्या एका फोटोला झूम करत म्हणाली, “ही तीच आहे ना गं, जी बंगालमध्ये कॉलेजची प्रिन्सिपल झालीय? मी जाम खुश झालते ही बातमी ऐकून; आणि तुला माहिती आहे का- हिला बघूनच मी परत शिकण्याचा निर्णय घेतला होता! मला खूप अभिमान वाटतो, ही आपल्यातली कुणी तरी शिक्षण क्षेत्रात प्राचार्य म्हणून काम पाहतेय”...
 
आणि माझ्या तोंडून पटकन निघालं, “पाहात आहे नाही, पाहात होती!”...तशी खुशी दचकली. म्हणाली, “का गं? काय झालं तिला?” मी उत्तरले, “तिला काही झालं नाही. तिला प्राचार्यपदाचा राजीनामा द्यावा लागला.”...तशी खुशी एखादा मानसिक आघात व्हावा, तशी स्तब्ध झाली. जणू काही तिलाच राजीनामा द्यावा लागलाय, अशी! राजीनामा द्यायचे कारण सहकारी, विद्यार्थी यांचे सहकार्य नाही मिळाले, हे मी जेव्हा तिला सांगितले तेव्हा ती रडायलाच लागली. मग अचानक उठली आणि निघून गेली. मी मात्र बसून होते तिथेच...
 
बदलाच्या प्रवाहात अल्पसंख्याक समुदायाच्या आदर्श ठरलेल्या व्यक्तींचे होणारे हे खच्चीकरण आणि विचारपरिवर्तन त्या समुदायास कितपत घातक ठरेल, याचा विचार त्या समुदायासोबतच बहुसंख्य असलेल्या आणि परिवर्तनाचा आग्रह धरणाऱ्या समुदायाने का करू नये?
 
हे थांबवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न कुठे कमी पडताहेत? ट्रान्सजेन्डर वा हिजडा समाजात, याची बरीचशी उदाहरणं बघायला मिळतील. बहुलिंगी समाजामधून पुढे आलेले आदर्श व्यक्तिमत्त्व कालांतराने असुरक्षिततेच्या भावनेने किंवा सामाजिक दडपणात येऊन पारंपरिक शोषण व्यवस्थेला पूरक वागतात किंवा बदलाच्या प्रक्रियेतून काढता पाय घेतात. जे हे करत नाहीत, त्यांनाही बदलाची प्रक्रिया पुढच्या पिढीला हस्तांतरित करता येत नाही, किंवा ती जाणूनबुजून केली जात नाही; ज्याचे समुदायालाच नुकसान भोगावे लागते.
 
हिजडा समुदायाच्या विचारांवर अशी गळचेपीची वेळ का यावी, याचा विचार करताना असं वाटतं की, आपल्याकडे कितीही बदलाचा आव आणला, तरीही स्त्री आणि स्त्रीसमान व्यक्तींना दुय्यम स्थान देण्याची मानसिकता खूप खोलवर दुष्प्रभाव टाकते. स्त्री ही पुनरुत्पादन आणि कुटुंब व्यवस्थेच्या उपयुक्ततेचे साधन मानली जाते, तरी तिला संघर्षाला सामोरे जावे लागते.
 
जिथे महिलांच्याच वाट्याला हे येतं; तिथे पुनरुत्पादन न करणाऱ्या आणि सामाजिक ‘असण्याची’ व्याख्या पूर्ण न करू शकणाऱ्या समुदायावर पितृसत्तेचा तो दुष्प्रभाव खूप नकारात्मक पद्धतीने होतो. वेगळी वाट निवडून प्रवाहात येऊ पाहणाऱ्या पावलांना अडवण्याचे सगळे निर्दयी पर्याय वापरले जातात.
 
त्यातूनही साधत नसेल, तर बंड करणाऱ्याला मान, सन्मान, खुर्ची देऊन बसवलं जातं आणि मग त्या प्रवाह बदलायला निघालेल्या आदर्श व्यक्तीचा बराचसा कल हा खुर्ची आणि सन्मान टिकवून ठेवण्यातच जातो. त्यातून सजग अनुयायी निराश होऊन खचतात, तर अंध अनुयायी भक्त होतात.
 
जात, धर्म, वर्ग या गोष्टींचा परिणामही तितकाच जाणवतो. मूळ व्यवस्थेच्या विरोधात असलेले आदर्शसुद्धा कुठेतरी मूळ त्या त्या जात, धर्म, वर्ग व्यवस्थेत वाढलेले असतात; म्हणून त्यांच्या लढ्यावरही त्या व्यवस्थांचा परिणाम जाणवतो. संघर्षात यश मिळाल्यानंतर मुक्ततेचं स्वप्न पाहणारे हेच आदर्श नकळत ते ज्या संस्कारात वाढलेत, त्याचेच वाहक बनतात; ज्यामुळे समुदायातील त्यांच्या इतर अनुयायांना संभ्रम निर्माण होतात.
 
बदल मोठ्या प्रमाणात होतोय, हे जरी खरं असलं, तरी नेमकेच सावरू पाहणारा समाज छोट्या-छोट्या आघातांनीही ढासळतो. त्या समाजाचे मानसिक खच्चीकरण होत जाते. त्यासाठी त्या समुदायाइतकेच उर्वरित समाजानेही समोर येणे गरजेचे आहे. त्यांच्या या खडतर प्रवासात त्यांच्या असण्याला स्वीकारून त्यांना परिवर्तनाच्या प्रवासाला सामाजिक, आर्थिक, मानसिक, अशा सगळ्या अंगानी मदत करण्याची गरज आहे.
 
नाहीतर हा समाज प्रवाहात येऊनही ते ज्या व्यवस्थेत घडलेत, त्याच व्यवस्थेचा वाहक बनेल; ज्यातून त्यांच्या असण्याच्या पारंपरिक व्याख्येला फक्त आधुनिक स्वरूप मिळेल. पण मूळ मात्र तेच राहील. त्यातून त्या समाजाला नव्याने आधुनिक गुलामगिरीत ढकलले जाईल.

या समाजातील ‘ती’ निवडणूक लढवायला उभी राहिल्यास, निवडणूक अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, धमकी, पैसा, कायदा यांचा वापर होतो, आणि शेवटी पराजयच पदरी पडतो.
 
निवडून आल्यावर ‘ती’ तिचे ध्येय विसरते. कारण बराच काळ राजकारण सांभाळण्यात जाऊ लागतो; त्यात बदलाचे स्वप्न स्वप्नच राहते! हिजडा समाजाला माणूस म्हणून मान्यता मिळावी, म्हणून ती लढत राहते. दैवीकरणाच्या चौकटी झुगारून देणारी ‘ती’ परत दैवीकरणातच रमते, हे तिला कळतच नाही. ती बंड करते, शिक्षण- नोकरी मिळवते! सुरक्षित होऊन समाधानी होते. मात्र ती परत त्यांच्या प्रश्नावर बोलणे तर दूरच; ‘मी त्या समुदायाची आहे’, हे सांगणेही टाळते!
 
अशी बरीच उदाहरण देता येतील. पण प्रवाह चुकतोय, हे वेळीच लक्षात आले किंवा ते समाजाने लक्षात आणून दिले तर त्या आदर्शामागे चालणाऱ्या सामान्य अनुयायांची वाट भरकटणार नाही.
कोंबडी पुढे चालली.

मागे मागे पिल्लं निघाली- माय नेईल तिकडं!
“माय आपण कुठे चाललोयत गं?”,
असा एकाबी पिल्लानं प्रश्न विचारला नाही.
काही पिलांचा कोंबडीवर विश्वास.
काहींना पोट भरण्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं.
काही प्रश्न विचारायला घाबरायचे.
काहींवर ती ओरडायची.
तिला प्रश्न विचारलेलं आवडत नसे.
रोज माती उकरून किडे, धान्ये खायचं आणि पोट भरायचं!
मग तिला “आव-आव” म्हणून 
कोणीतरी रोज दाणे टाकू लागलं.
कोंबडीने विचार केला नाही, मागचा-पुढचा.
आणि ती पिलांना घेऊन रोज तिथं जात होती.
पिलांना घेऊन पोट भाजत होती.
आता त्या “आव-आव”वर तिचा विश्वास बसला होता.
मग ती आवाजाच्या जवळ जवळ गेली.
आणि एके दिवशी त्या ‘आवा’च्या हाताने 
तिच्या गळ्यावर सुरी फिरली!
मोकळ्या पिलांच्या नशिबी
परत खुराड्याची काळरात्र उरली.
ती प्रत्येक वेळी वाट पाहतायत वाट दाखवणाऱ्या कोंबडीची
आणि प्रत्येक वेळचा शेवट खुराड्यातच असतो...
काल ते एक पिल्लू सगळ्यांच्या उरफाट जात होतं
तेव्हा जरा माझ्या जिवात जीव आला....
 
- स्त्री ही पुनरुत्पादन आणि कुटुंब व्यवस्थेच्या उपयुक्ततेचे साधन मानली जाते, तरी तिला संघर्षाला सामोरे जावे लागते. जिथे महिलांच्याच वाट्याला हे येतं; तिथे पुनरुत्पादन न करणाऱ्या आणि सामाजिक ‘असण्याची’ व्याख्या पूर्ण न करू शकणाऱ्या समुदायावर पितृसत्तेचा तो दुष्प्रभाव खूप नकारात्मक पद्धतीने होत आहे...
disha.kene07@gmail.com
बातम्या आणखी आहेत...