आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आणि मी विषय बदलला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशिष्ट प्रतिमांच्या चौकटीत अडकलेल्या तृतीयपंथी समुदायाला आधुनिक जगाशी मिळतेजुळते पर्याय उपलब्ध करून देणे ही आजची गरज आहे, मात्र तसे न होता, शासन पातळीवर या समुदायाला भिकेला लावण्याचेच काम सुरू आहे...

तिचा फोन आला, तेव्हा मी प्रवासात होते. नंबर सेव्ह नव्हता. मी अंदाज घेत ‘हॅलो’ बोलले, ती समोरून घाबरल्या आवाजात म्हणाली, ‘पाव पडती गुरू’ मी ‘जियो... कोण...?’ ‘गुरू मै बंगलोर से बात कर्री... माझ्या मैत्रिणीने तुमचा नंबर दिला होता...’ मी, ‘अच्छा काय काम होतं?’ ‘मी पंधरा वर्षांपासून सेक्सवर्क करते, पण आता इथे माहोल चांगला राहिला नाही. शाळा नाही शिकले. दुसरं काही जमत नाही, पोलिस मारतात, गुंड लुबाडतात, गिऱ्हाइकावर पण भरोसा करता येईना. तुम्ही काही तरी करा...’ मला मिनिटभर काही सुचलं नाही, पण सावरत तिच्याकडे थोडा वेळ मागितला.

दमून-भागून घरी आले. घरी दिल्लीहून मैत्रीण आली होती, पाहताच मी खुश झाले. ‘काय गं कशी आहेस? कसं काय अचानक...?’ ‘अगं सरकारी लोकांची मीटिंग झाली म्हणे, ‘हिजड्याला भीक द्यायची नाही म्हणून. सगळ्यांच्या पोटावर पाय पडलाय, कुठं जावं काही कळंना बघ, तुझं चांगलं आहे, लिहिता-वाचता तरी येतंय. आमच्या सारख्यांनी कुठं जायचं? भीक मागण्यात आयुष्य गेलं, आता अर्ध्या निम्म्या वयात काय करणार? मी परत ती काय करणार, याचा विचार करत विषय बदलला.

ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. सीडीफोर काऊंट (शरीरातल्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण)कमी झालाय, आता काहीच काम होत नाही. आपल्यासारखं जगणं कुणाला नको म्हणून, कधी कुणालाच चेला केलं नाही. आता एकटी राहते. काम होत नाही, भीकही मागता येत नाही. जमापुंजी औषधोपचारात संपलीये, घरच्यांनी केव्हाच अंग काढलंय. शासकीय पेन्शन महिना ६०० फक्त, त्यात गुजारा होत नाही. प्रश्न तोच... काय करू, मला काही सुचत नाही... आणि मी परत विषय बदलते...

तिला समुदायात यायचं नाही आणि पुरुषासारखं जगायचंही नाही. नोकरीच्या जागी साडी घालून महिलेसारखं काम करावं वाटतंय, पण हातचं काम जाईल, घरच्यांनी समजावून पाहिलं, तेही ऐकत नाहीत. ते मुलीसोबत लग्न करण्याचा आग्रह धरताहेत. ‘माझं मन मानत नाही; पण घरच्यांना सोडून कुठे जाऊ? आणि अजून किती दिवस असं घुसमटत जगू? काहीच कळंना’ असं ती म्हणते आणि... मी परत शांत. स्वतःची  समजूत काढत विषय बदलते...

तिने खूप जिकिरीने समुदाय सोडला. मस्त समाजमान्य बाईसारखी कामावर जाते. पण सहकारी त्रास देतात, अचकट-विचकट विनोद करतात. कुणी तर घरापर्यंत पाठलाग करतात, उशीर झाला की, पोलिस संशयाने बघतात. तिला याचा कंटाळा आलाय, परत समुदायात जावं की काय, असा ती विचार करतेय, पण आता समुदाय परत घेईल का? या चिंतेने झुरताना मी तिला पाहत असते आणि विषय बदलते.

बदलायचं सगळ्यांनाच आहे. पण ते कसं? हा मोठा प्रश्न आज समुदायापुढे उभा आहे. शासकीय सुविधा अत्यंत तोकड्या स्वरूपात आहेत. समाजाला बदल मात्र ताबडतोब हवेत. काही शतके भिकेचा इतिहास असलेला हा समुदाय. त्यातल्या चाली-परंपरा बदलाव्यात म्हणणं सोपं आहे, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलताना दिसत नाही. समुदायाच्या सक्षमीकरणासंबंधीच्या उपाययोजना तोकड्या आहेत. जिथे बहुसंख्याक स्त्री-पुरुष समुदायाच्या योजनांचे तीनतेरा झालेले दिसतात. तिथे या अल्पसंख्याक समुदायाचे काय? समाजमनात आजही समुदायाची मलीन प्रतिमा आहे, लोक आजही हिजडा समुदायाला घृणा, अस्पृश्यता, विकृती याच दृष्टिकोनातूनच पाहतात. खरं तर आजही घराघरांमध्ये अपंग, गतिमंद मुले सांभाळली जातात, पण कुणालाच लैंगिक अल्पसंख्याक समुदाय कुटुंबाचा हिस्सा म्हणून नको आहे. समस्या हीच आहे हे सांगणं सोपं आहे. पण ती का आहे, याचा विचार केल्याशिवाय निदान होणं शक्य नाही.

सद्य:स्थितीत समुदायात निरक्षरतेचे प्रमाण खूप आहे. जेव्हा बहुसंख्याक सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजात अजूनही भूक-बेरोजगारी-अस्पृश्यता आहे, तर बहुलिंगींच्या प्रश्नावर तर बोलायलाच नको. शासनाकडून समाजाचा दृष्टिकोन बदलण्याएेवजी त्यांच्या भिकेची साधने सुधारली जात आहेत. समाजमनात असलेल्या त्यांच्याविषयीच्या गैरसमजांना खतपाणी घालून त्यांना नव्या प्रकारची भीकच मिळण्याची सोय तेवढी केली जात आहे.

जिथे शालेय शिक्षणात लिंग आणि लैंगिकतेतील फरक मुलांना शिकवायला हवेत, ज्यातून लैंगिक समानता आणणारा समाज तयार होईल, जिथे पालकांना आपल्या मुलांची लाज वाटू नये, यासाठी काम करण्याची गरज आहे. जिथे बदलू पाहणाऱ्या समुदायाला शैक्षणिक अटी न लावता त्यांच्या कलाकौशल्यांच्या जोरावर मुबलक रोजगार मिळणे गरजेचे आहे. शिकू पाहणाऱ्यांना मोफत शिक्षणासोबत राहण्या-खाण्याची सोय होणे गरजेचे आहे. हे सारे न करता त्यांना धार्मिक चौकटीत बांधून आधुनिक पद्धतीने भिकेलाच लावण्याचे काम सुरू आहे. आम्ही यावर केव्हा विचार करणार आहोत? आता वेळ आली आहे, आपण नुसतं बदला म्हणण्यापेक्षा आपण मिळून बदलू असं म्हणण्याची. लैंगिक अल्पसंख्याक समुदायासोबत खंबीरपणे उभं राहण्याची. आपल्यापेक्षा वेगळ्या लैंगिकतेचा आदर आणि स्वीकार करण्याची. खरंतर कुटुंबानेच सगळ्यात पहिले आपल्या मुलांचा स्वीकार करून त्यांच्यावर घर सोडण्याची वेळ येऊ देऊ नये, ज्यांना घर सोडावे लागतेय हे बघितले पाहिजे. शासनाने अशा पद्धतीने समुदायातून किंवा परिवारातून समाजाच्या प्रवाहात येऊ पाहणाऱ्या व्यक्तींना मदत करणारी यंत्रणा उभारली  पाहिजे.

कारण, या लैंगिक अल्पसंख्याक समुदायाला स्वतःची ओळख, आधी घरच्यांना, मग समाजाला पटवून देण्यात, खूप खडतर प्रवास करावा लागतो, त्यात पोटाचे प्रश्न, निवासाचे प्रश्न. सन्मानाने जगण्याचे प्रश्न, पण यात समाज म्हणून  साथ असेल  तर आणि तरच बदल  घडेल.
 
- दिशा, disha.kene07@gmail.com
बातम्या आणखी आहेत...