आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टपैलू दीपिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका आजच्या काळातील बोटावर मोजण्याइतक्या व्यक्तींपैकी एक आहे जी खऱ्या अर्थाने अष्टपैलू आहे, आणि रोज तिच्या वागण्याने आपल्याला काहीतरी महत्त्वाचे देऊन जाते, असं टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या या तरुण लेखिकेला ठामपणे वाटतं.

जेव्हा आपल्याला कुणी विचारतं की, तुमचा आदर्श कोण आहे किंवा तुम्हाला तुमच्या कामाची प्रेरणा कुणाकडून मिळते तेव्हा आपल्यासमोर खरा पेच तयार होतो. खरंतर आपला एक असा रोल मॉडेल नसतो. एकाच वेळी अनेक लोक आपल्याला चांगलं आणि काहीतरी वेगळं काम करण्याची प्रेरणा देत असतात. दीपिका पदुकोण ही त्या काही लोकांपैकी एक आहे जिच्याकडून आपण कळत नकळत अनेक गोष्टी शिकत आलो आहोत. दीपिका आजच्या काळातील बोटावर मोजण्याइतक्या व्यक्तींपैकी एक आहे जी खऱ्या अर्थाने अष्टपैलू आहे आणि रोज तिच्या वागण्याने आपल्याला काहीतरी महत्त्वाचे देऊन जाते. तिचे काही चित्रपट कितीही टुकार असले तरी त्यातील तिची भूमिका आणि तिने त्यावर घेतलेली मेहनत आपला अपेक्षाभंग करत नाही.

दीपिका उत्तम बॅडमिंटनपटू आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील एक सर्वोत्तम खेळाडू, जिला हा खेळ वारशाने मिळाला आहे. पण स्वत:तले गुण ओळखून तिने मॉडेलिंग आणि अभिनयाची करियर म्हणून निवड केली. जेव्हा तिला तिच्या एका भूमिकेसाठी मानाचा पुरस्कार मिळाला तेव्हा तिच्या भाषणात ती तिच्या वडिलांना म्हणाली होती की, “हे माझं तुमच्यासाठीच ग्रँड स्लॅम आहे.” दीपिकाने मॉडेलिंग आणि अभिनयाची करियर म्हणून निवड केली नसती तर तिच्याकडून काही ग्रँड स्लॅम्स आणि एखाद्या ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा करणे चुकीचे ठरले नसते. आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्या चांगल्या ओळखी असल्याशिवाय आपल्याला काम किंवा प्रसिद्धी मिळणार नाही या कल्पनेला दीपिकाने छेद दिला. वडील नावाजलेले खेळाडू असतानादेखील तिने केवळ आपल्या इच्छेपोटी आपला संबंध किंवा ओळखी नसलेल्या क्षेत्रात उडी मारायचे ठरवले आणि ती यशस्वी झाली. आज ती बॉलीवूडच्या नावाजलेल्या आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या नायिकांपैकी एक आहे ते केवळ तिच्या स्वत:च्या मेहनतीमुळे. कुणाचाही वरदहस्त नसतानाही तिने स्वत:चे अढळ स्थान तयार केले आहे.

दीपिकाने आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत आणि प्रत्येक भूमिकेवर आपली एक छाप सोडली आहे. पटकथा लेखक एक पात्र लिहितो, संवाद लेखक त्या पात्राला विचार आणि मतं देतो, दिग्दर्शक ते पात्र जिवंत करतो तर कलाकार त्या पात्राला एक अस्तित्व देतो. दीपिकाने रंगवलेली सर्व पात्रं जणू तिच्यासाठीच लिहिली गेली होती असं वाटतं. तिने ‘ओम शांती ओम’मध्ये आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या हिरोसोबत टिपिकल बॉलिवूड स्टाइल रोमान्स केला तर ‘चांदणी चौक टू चायना’मध्ये डबल रोल करत गुंडांशी मारामारीदेखील केली. ‘रेस २’मध्ये कावेबाज दिसणारी दीपिका ‘बाजीराव मस्तानी’मध्ये एकाच वेळी हळवी आणि शूर दिसते.
तरुण वर्गाला दीपिका सगळ्यात जास्त आवडली ती ‘लव आज कल’, ‘कॉकटेल’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटांमध्ये. ‘लव आज कल’मधली प्रॅक्टिकल आणि करियरला महत्त्व देणारी मीरा सगळ्यांनाच भावली. मुली करियरला फाट्यावर मारून सीतेप्रमाणे आपल्या नवऱ्याच्या किंवा बॉयफ्रेंडच्या मागे न जाण्याचा निर्णय घेऊ शकतात हा आत्मविश्वास त्या मीराने अनेकींना दिला. उलटपक्षी हा निर्णय आपल्या मित्रमैत्रिणींना ब्रेक-अप पार्टी देऊन साजरा करण्याचा ट्रेंडही सेट केला. कॉकटेलमधली व्हेरोनिका काही लोकांना बोल्ड आणि बिनधास्त वाटू शकते तर काही लोकांना वाया गेलेली. आई-वडिलांकडून दुर्लक्ष झालेली व्हेरोनिका वरून जितकी खंबीर दिसते तितकीच आतून विखुरलेली आहे. घरच्या अस्थिर वातावरणाचे किती विचित्र आणि टोकाचे परिणाम होऊ शकतात ह्याचं उत्तम सादरीकरण दीपिकाने केलं. कधीही न मिळालेलं प्रेम जबरदस्तीने मिळवण्याच्या प्रयत्नात ती ते गमावते. मात्र नंतर स्वत:ची चूक लक्षात आल्यावर ती सुधारण्याचा प्रयत्नदेखील करते. त्यामळे लोकांना वाया गेलेली मुलगी वाटणारी व्हेरोनिका नीट विचार केल्यास आपल्याला ‘सेल्फलेस’ होण्याची शिकवण देऊन जाते. दीपिकाची सर्वात जास्त आवडलेली आणि भावलेली भूमिका म्हणजे ‘पिकू.’ अतिशय कमी सहनशक्ती असणाऱ्या आजच्या तरुणांना पिकू संयम शिकवून जाते. पडद्यावर अमिताभ बच्चनसोबत तितक्याच ताकदीची भूमिका सादर करून दीपिकाने अभिनयाची एक वेगळी उंची गाठली.

प्रसिद्ध व्यक्तींची कुठलीही गोष्ट व्यक्तिगत नसते. त्यांच्या तब्येतीपासून ते लग्नापर्यंतच्या सगळ्या गोष्टींची चर्चा गल्लीबोळात सतत होत असते. दीपिकादेखील ह्याला अपवाद ठरली नाही. तिचा आणि रणवीर कपूरचा प्रेमभंग प्रसारमाध्यमांनी राष्ट्रीय बातमीप्रमाणे चघळला. पण दीपिकाने आकांडतांडव केलं नाही. उलट तिने शांतपणे आपली बाजू मांडत म्हटलं, “आमचं ब्रेक अप झालं तेव्हा मी खूप रडले. पण त्यातून मी खूप काही शिकले आणि एक अधिक चांगली व्यक्ती बनू शकले याचा मला आनंद आहे. त्यासाठी मी रणवीरची आभारी आहे.” हे समजूतदारपणे सांगण्यापूर्वी तिला किती मानसिक त्रास झाला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींवर विनाकारण चर्चा करणाऱ्या प्रसारमाध्यमांशी न भांडता तिने त्यांना शांत केलं. पण जेव्हा वेळ आली तेव्हा तिने याच माध्यमांशी भांडणदेखील केलं.

देशातील एका महत्त्वाच्या वृत्तपत्राने जेव्हा तिच्या क्लीवेजवर भाष्य करणारी बातमी मुख्य पानावर छापून आणली तेव्हा त्यांना दीपिकाचं वेगळंच रूप पाहायला मिळालं. त्यांच्यावर टीकात्मक ताशेरे ओढत तिने दाखवून दिलं की, प्रसिद्धी मिळवण्यासाठी ती कधीही चुकीचे मार्ग अवलंबणार नाही. दीपिका स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहे. भरभराटीच्या काळातच आलेल्या नैराश्याबद्दल ती मोकळेपणाने बोलते. कुटुंबीयांच्या मदतीने ती त्यातून बाहेर पडली, पण तिला या गोष्टीची जाणीवही झाली की, नैराश्याने अनेकांना ग्रासलंय पण योग्य काळजी न घेतल्याने ते त्यातून बाहेर पडू शकत नाहीत. प्रसिद्ध कलाकार असल्याने आपली सामाजिक जबाबदारी समजून तिने नैराश्यग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी एक संस्था सुरू केली आहे. एका मुलाखतीत दीपिकाने म्हटलं होतं, “मला नाही वाटत की, मी कुणी मोठी व्यक्ती आहे. मी माझ्या वयाच्या सामान्य मुलींसारखीच आहे. काही मुली ऑफिसमध्ये काम करतात, फिरतीची कामं करतात; त्यांच्याचप्रमाणे मी. मला कधीच चुकण्याची भीती वाटत नाही कारण माणूस चुकांमधून शिकतो आणि मोठा होतो. गरज आहे ती फक्त योग्य आत्मविश्वास आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची. मग तुम्हाला कुणीच प्रगती करण्यापासून थांबवू शकत नाही.”

दिशा महाजन, वसई
mahajandisha93@yahoo.in
बातम्या आणखी आहेत...