आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्‍टी परिवर्तनाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेट माध्यमांचा गैरवापर करून बहुलिंगींबद्दल समाजात द्वेष-तिरस्कार आणि भेदाभेदाची भावना रुजवली जातेे. या गुंत्याला सोडवण्याच्या उद्देशानेच हैदराबादमध्ये हिजडा समुदायातील काही व्यक्तींनी यूट्यूब चॅनेल सुरु करण्यासाठी  पुढाकार घेतला आहे. माझ्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची घटना आहे. नव्या युगाचं माहिती प्रसाराचं साधन हेच त्याचं अस्त्र बनलं आहे...

आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात माणसं प्रत्येक गोष्टीचं उत्तर ‘गुगल’ या ऑनलाइन गुरूला विचारु लागले आहेत. ते हे विसरताहेत की तंत्रज्ञान हीसुद्धा मानवाचीच निर्मिती आहे. त्यामुळेच त्यात उणिवा असण्याची शक्यता आहे, म्हणूनच ते काळजीपूर्वक पारखून घेणे गरजेचे आहे. सोशल मीडिया हे माध्यम वापरणारा, त्यावरून माहिती प्रसारित करणारा आणि ती  मिळवणारा बहुतांश वर्ग हा सुशिक्षित आणि सामाजिक स्तरांत स्वतःला मुख्य प्रवाहातला मानणारा वर्ग आहे. एका अर्थाने या माध्यमावर त्याची पकड आहे. म्हणूनही जात, धर्म, लैंगिकता आणि आर्थिक पातळीवर अल्पसंख्यांक असलेल्या गटाबद्दल जगाला वस्तुनिष्ठ माहिती देण्याची खूप मोठी जबाबदारी या बहुसंख्यांवर आहे. ही जाणीव करून देण्याचं कारण  म्हणजे, सर्वसामन्यांच्या मनात एलजीबीटी समुदायाबद्दल असंख्य प्रश्न असतात. त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी गुगलचा मोठ्याप्रमाणात वापर होताना दिसतो. मात्र, त्या बदल्यात त्यांना  बहुतांशी चुकीची, गैरसमज पसरवणारी माहिती तेवढी मिळत राहते. ज्यामुळे  बहुलिंगींबद्दल अनेकदा समाजात द्वेष-तिरस्कार आणि भेदाभेदाची भावना रुजू लागते.  या गुंत्याला सोडवण्याच्या उद्देशानेच अंजली कल्याणप्पू, जान्हवी राय, सोनिया शेख आदी हैदराबाद हिजडा समुदायातील व्यक्तींनी आता पुढाकार घेतला आहे. माझ्यादृष्टीने ही अत्यंत महत्वाची घटना आहे. कारण, नव्या युगाचं माहिती प्रसाराचं साधन हेच त्याचं अस्त्र बनलं आहे.
 
या समुदायाने एक यूट्युब चॅनेल सुरू करण्याचा प्रयत्न चालवला आहे. कारण स्पष्ट आहे, यूट्यूबचा वापर करूनच बहुलिंगी समुदायाबद्दल मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती दिली जाते आहे आणि या चुकीच्या माहितीलाही दहा-वीस हजार हिट्स असतात, हे चिंताजनक वास्तव त्यांच्या पुरतं लक्षात आलं आहे. हे खरंच की, आजवर दृकश्राव्य माध्यमाचा गैरवापर करूनच ह्या समुदायाचं विकृत नि विपर्यस्त चित्रण दाखवलं गेलं आहे. त्याचमुळे बहुलिंगी समाज हेटाळणीचा, निंदानालस्तीचा विषय बनून राहिला आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर काही काळापूर्वी रेडिओ माध्यमावरून प्रसारित होणारेे ‘कमला का हमला’ हा कार्यक्रम किंवा वाहतुकीचे नियम समजावून सांगणारे एका जाहिरातीत झळकलेले किन्नर... वरकरणी ही जाहिरात प्रभावी वाटत असली तरी ती समुदायाच्या वागण्या,जगण्याचे,बोलण्याचे निकष पक्के करणारी होती. त्यांना एका प्रतिमेत कैद करणारी स्टिरिओटाइप म्हणता येईल अशी होती. त्या आधी एका प्रसिध्द गायकाने बहुलिंगी समुदायातील काही लोकांना सोबत घेऊन ‘एे, राजू चल निकाल दस रुपये’अशी वाक्यं असणारी गाणी म्हटली होती. जी हे दर्शवत होती की भीक मागणे हाच यांचा मुख्य व्यवसाय आहे. माझ्या मते, हाच विचार त्यांच्या विषयीची गृहितकं बदलू न देणारा आहे. समुदायाविषयी घृणा आणि भीती निर्माण करणारा, त्यांच्याकडे चेष्टेच्या सुरात पाहायला लावणारा आहे.  
 
नेमक्या याच गोष्टी हैदराबादच्या बहुलिंगी समुदायासाठी कार्य करणाऱ्या रचना मुद्राबोईना हिला अस्वस्थ करत आल्या होत्या.  मात्र, त्यावर उपाय म्हणून चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्या माध्यमाचाच विधायक वापर करून आपण सत्य आणि शास्त्रीय माहिती द्यावी या विचारातून रचनाने अनेकांना सोबत घेऊन  ‘ट्रान्स-व्हिजन’ नावाचं यूट्यूब चॅनेल सुरु करायचं ठरवलं आहे.  हे चॅनेल  समुदायातील सगळ्या घटकांबद्दल वस्तुनिष्ठ माहिती देणारं असेल. त्यात रुढ प्रतिमांना फाटा दिला जाईल. त्यावर बहुलिंगी समाजावर होणारे जीवघेणे हल्ले, मानसिक आघात, त्यांची सामाजिक परिस्थिती आदींवर भाष्य करणारे व्हिडिओ असतील. प्रारंभी आठ भागांत या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्याची तिची योजना आहे. कार्यक्रमाचे दोन भाग तयार झाले आहेत जे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसारित होतील. हे प्रयत्न स्थानिक आणि इतर भाषांतील लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी हे व्हिडिओ तेलगु, कानडी आणि दखनी उर्दूत भाषेत असतील.  मी या सगळ्या उपक्रमाकडे खूप आशेने पाहाते. कारण,आजच्या पिढीला समजेल अशा माध्यमाच्या वापरातूनच  बहुलिंगींचा मुख्य प्रवाहात येण्याचा प्रवास थोडाफार सुकर होण्याची शक्यता आहे.  याउपर जिथे भारतीय भाषेच्या माध्यमांमधून बहुलिंगी समुदायाबद्दलच्या धारणा समाजमनावर थोपवल्या जात आहेत, तिथे समुदायाला आपल्या अडचणी, खरं रूप लोकांसमोर आणण्यासाठी रचना मुद्राबोईनासारखी वाट निवडण्यावाचून पर्याय उरलेला नाही. अन्यथा समुदायाला सोयीनुसार आधुनिक करून पारंपरिक शोषणाचे आधुनिकीकरण तेवढे होत राहणार आहे.
 
आज खरं तर बहुलिंगी समुदायाच्या मानसिक-भावनिक, सामाजिक अडचणींवर गांभीर्यपूर्वक अभ्यास होण्याची आवश्यक आहे. तो न होता, किन्नरांना बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान दिल्याने लागण होते, किन्नरांचा मृत्यू पाहिल्याने भाग्योदय होतो, असल्या तोतया अफवा  तंत्रज्ञानाचा वापर करून पसरवल्या जात आहेत. दुसरीकडे ज्यांचा आम्ही अभिमान बाळगतोय त्या बहुलिंगी समुदायाला ह्या गोष्टी समजून घ्यायला वेळच नाही, कारण त्यांची पोटाची भूक या पेक्षा खूप मोठी आहे . पण रचना आणि तिच्या सहकाऱ्यांंनी आता जाब विचारायला आणि समुदायाची बाजू मांडायला सुरुवात केली आहे. याचीच परिणिती म्हणून ‘गुगल’वर हिजडा हा शब्द टाइप करताच ज्या दिवशी त्यांच्या शारीरिक,मानसिक,सामाजिक परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती मिळेल, तेव्हा खरा ह्या माध्यमांचा फायदा ह्या समुदायांना मिळेल. तेव्हाच  त्यांच्या आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक प्रश्नांवर या माध्यमांवर बोलले जाईल. त्याचमुळे ही वेळ आपण सगळे रचना  होण्याची आणि रचना सारख्या धाडसाने पुढे येणाऱ्यांना हातचं राखून न ठेवता मदत करण्याची आहे.
 
आजवर खपविला तुम्ही दिव्याच्या खाली अंधार
आजवर केला तुम्ही दासाला दास ठेवायचा कारोबार
आजवर तिच्या डार्क लिपस्टिकचा रंग
पुन्हा पुन्हा भडक करून दाखवलात
आजवर तिचा बाजारात अर्धनग्न देह
असंस्कृत म्हणून दाखवलात आणि ती सहन करत राहिली
आता ती तुम्हाला आरसा दाखवायचा म्हणतेय
तुम्हीच सोयीस्कर डार्क केली होती तिची लिपस्टिक
उघड्या मांड्यांवर भकाळीला गेलेलं पोट
दाखवेल ती तुम्हाला
तुमच्याच सभ्यत्येनं तिला कसं भिकेला लावलं,
कसं बाजारात उभं केलं
तिला ओरबाडणारे तुमचेच हात आणि
तिलाच नाव ठेवणारे तुम्ही   
तेजाब टाकून जळालेली ती,
सिग्नलला टाचा घासून म्हातारी झालेली ती
ती सारं दाखवेन आणि तुम्हाला ते पाहिल्यावर
ती तुमचीच वाटेल, हा विश्वास आहे मला...
 
disha.kene07@gmail.com
बातम्या आणखी आहेत...