आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी का बाळगावी लाज?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तसं पाहायला गेलं तर मासिक पाळी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. तरी हे असं चित्र? एकीकडे शासन सामाजिक आरोग्याच्या गप्पा मारतं, तर दुसरीकडे सामाजिक आरोग्य प्रश्नांत सॅनिटरी नॅपकिनचा हा प्रश्न महत्त्वाचा असूनही, कमालीची दुर्लक्षित गोष्ट म्हणून दूर ठेवला जातोय. महिलांचं आरोग्य हेच प्राथमिकतः देशाचं आरोग्य नाही का?

मी बाजार मागत होते. ताई, बाई, ‘आक्का’ म्हणत मस्त चाललं होतं. ‘दे गं, आक्का!’, असं म्हणत मी तिच्या समोर हात केला, आणि ती म्हणाली ‘मला द्यायचं नाहीये.’ मी म्हणाले, ‘का गं’? उत्तर आलं, ‘दूर झाल्येय’...आणि मी पुढे झाले. तसं मी हे वाक्य नेहमीच ऐकते; पण या वेळेस मात्र तिचं ‘दूर झाल्येय’ हे वाक्य खूप डोक्यात फिरत होतं. एकीकडे प्रसारमाध्यमांवर चाललेल्या मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅडवरच्या चर्चा आणि एकीकडे तिच्यासारख्या आदिवासी, ग्रामीण महिला ज्यांना ‘सॅनिटरी नॅपकिन’ म्हणजे काय, हेच माहीत नाही. मासिक पाळीविषयीची कमालीची अस्पृश्यता मी जवळून पाहतेय. ही तफावत अजून किती वर्षे चालणार, माहीत नाही; पण या अनुषंगाने आपण यावर बोलावं, असं वाटत असताना ‘का बोलावं?’ हा प्रश्नही मनात होताच. तेव्हा सार्वजनिक बाथरूमच्या खिडक्यांमध्ये, टॉयलेट सीटमध्ये ठेवलेले कपड्याचे बोळे आठवले. ते कपडे बाहेर ठेवलेल्या कचरापेटीतही टाकण्याची हिंमत का होत नसेल बायकांची? हे असले टाकाऊ, अस्वच्छ कपडे वापरणाऱ्या महिला सॅनिटरी नॅपकिन खरेदीसाठी मेडिकलमध्ये तरी जात असतील का, हा प्रश्न मनात उभा राहिला. सोबतच मी आणि माझ्यासारख्या महिला, ज्या मासिक पाळीपासून दूर आहेत, त्यांच्या आरोग्यावर या अस्वच्छतेचा परिणाम होत नसेल का, हाही प्रश्न होताच.
 
मग जरा बायकांशी बोलायला सुरुवात केली. चांगल्या शिकलेल्या बायका, पोरीही या प्रश्नाबाबत अडाणी होत्या. अशिक्षित बायकांची तर बातच नको! मग शाळा, कॉलेजेस, प्राथमिक आरोग्य केंद्रे, हॉस्टेल्स, बसस्टॉप्स, अॉफिसेस इत्यादी ठिकाणी कामानिमित्त फिरणाऱ्या आणि दिवसातला जास्त काळ सार्वजनिक ठिकाणी व्यतीत करणाऱ्या बायकांची अचानक मासिक पाळी आल्यावर होणारी मानसिक, शारीरिक कुचंबणा महाभयंकर असते, हे माझ्या लक्षात आलं. शहरी भागात वृत्तपत्रे आणि माध्यमांच्या तोंडून यावर किमान चर्चा तरी होते, (तरी लोक याविषयी मोकळेपणा दाखवत नाहीत, तो भाग वेगळा!) तिथे या ग्रामीण महिलांचं काय? मी ज्या महिलांशी आणि मुलींशी बोलले, त्यापैकी फक्त एका खाजगी कॉलेजात शिकणाऱ्या मुलीने सांगितले की, तिच्या कॉलेजात सॅनिटरी पॅड्स मिळतात. पण बाकीच्या सगळ्या जणी टाकाऊ कपड्याचाच वापर करणाऱ्या होत्या. काहींना सॅनिटरी पॅडच माहीत नव्हतं. तर ज्यांना माहीत होतं, त्यांना ते परवडणारं नव्हतं. ‘बाई हितं तेलामिठाची तारांबळ! तर हे असे मोठ्या लोकांचे चोचले आपल्याला परवडणार आहेत का?’, ‘इथं शाळेत जायला बसच्या पासचे १००-१५० रुपये आठवडाभर अगोदरपासून मागावे लागतात, तर यासाठी कोण पैसे देणार?’ ‘बाबांकडे पैसे मागायला गेलं की ते म्हणतात, कशाला पाहिजे? म्हणून मग सांगायला लाज वाटते!’ - ही असली कारणं मिळायला लागली. मी म्हणाले, ‘अगं ते पाच रुपये टाकून पॅड मिळवायचं मशीन मिळावं म्हणून तरी अर्ज करा की शाळेत...’ तर उत्तर मिळालं, ‘त्या टायमाला पाच रुपये जवळ असायला नको का?’...आता मात्र माझा जीव चिडत होता. जिथे स्वतः कमावणाऱ्या बायकासुद्धा या गोष्टीवर पैसे खर्च करायला मागेपुढे पाहात होत्या, तिथे कुटुंबावर अवलंबून असलेल्यांसाठी तर हे दूरच होतं सारं!
तसं पाहायला गेलं तर मासिक पाळी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. तरी हे असं चित्र?

एकीकडे शासन सामाजिक आरोग्याच्या गप्पा मारतं, तर दुसरीकडे सामाजिक आरोग्य प्रश्नांत सॅनिटरी नॅपकिनचा हा प्रश्न महत्त्वाचा असूनही, कमालीची दुर्लक्षित गोष्ट म्हणून दूर ठेवला जातोय. महिलांचं आरोग्य हेच प्राथमिकतः देशाचं आरोग्य नाही का? आपण महिलांचे प्रश्न नेहमीच सवडीने आणि स्वतःच्या सोयीने ऐरणीवर घेतो, मग आज सॅनिटरी पॅड टॅक्स फ्री व्हावे, ही चर्चा याच अनुषंगाने का नाही होत? पाहायला गेले, तर सॅनिटरी नॅपकिन आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असायला हवेत आणि ते शेवटच्या स्त्रीपर्यंत कसे पोहोचतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. विकतचे सॅनिटरी पॅड टॅक्स फ्री करून काय होणार? हे आता माहीत नाही. पण घरात सॅनिटरी नॅपकिन कसे बनवायचे, याचं प्रशिक्षण आपण घ्यायला हवं आणि आपल्या आयुष्यात स्त्री ही वेगवेगळ्या नात्याने आहेच; म्हणून ही संकल्पना फक्त स्त्रीपर्यंत न राहता त्यात पुरुष आणि बहुलिंगी समुदायालाही सामील करून घ्यायला पाहिजे, असं मला वाटतं.
 
शासन जसं पुरुषांच्या सोयीसाठी आणि सामाजिक आरोग्यासाठी सार्वजनिक जागी मोफत निरोध उपलब्ध करून देतं, तसं सॅनिटरी नॅपकिन हासुद्धा सुरक्षित आरोग्याचा प्रश्न आहे, हे समजून त्या दिशेने वाटचाल व्हायला हवी. कारण, प्रश्न फक्त स्त्रियांपुरता मर्यादित नाही. अस्वच्छ कापडाच्या वापरामुळे महिलांना वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांना सामोरं जावं लागू शकतं, आणि तो संसर्ग त्या महिलेच्या सेक्श्युअल पार्टनरलाही होण्याच्या शक्यता वाढतात. सोबतच हे सॅनिटरी नॅपकिन विघटन होणारे नसतील, तर सामाजिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो, त्या मुद्द्याचासुद्धा शास्त्रीयदृष्ट्या विचार व्हावा.
 
यात मला या मुद्द्यावर स्त्रियांइतकीच पुरुषांची भूमिका महत्त्वाची वाटते. प्रत्येक घरातील पुरुष जेव्हा या विषयावर बोलू लागेल, तेव्हा यावर मोकळी चर्चा होऊन पर्यायी उत्तरं बाहेर निघतील. मासिक पाळीच्या प्रश्नावर काम करणारा माझा मित्र प्रवीण निकम सांगत होता- ‘अस्वच्छ कापड वापरल्याने, एकच कापड अनेकींनी वापरल्याने, कापड स्वच्छ धुऊन उन्हात वाळत न घातल्याने ८०% आजार होतात. वेगवेगळ्या विदेशी कंपन्या ज्या त्यांच्या देशात परत-परत धुऊन वापरता येतील असले पॅड देतात, पण आपल्याकडे मात्र ‘यूज अँड थ्रो’चे पॅड मिळतात; ज्यामुळे आपल्या निसर्ग स्वास्थ्यालाही इजा पोहोचते. ‘घरात बनवलेले कापडी पॅड कधीही चांगले आणि हे कापडापासून बनवलेले पॅड आपण घरीच बनवू शकतो’, हे ऐकताना वाटलं, महिलांसोबत पुरुषांनीही या पॅड बनवण्याच्या कामाकडे आपली सामाजिक जबाबदारी म्हणून का पाहू नये? अजून कुठपर्यंत आपण स्त्रीला तिच्या मूलभूत गरजांपासून दूर ठेवणार आहोत? चला तर, शाळा-कॉलेजातील मुलामुलींसोबतच कुटुंबातील प्रत्येकाला आपण सॅनिटरी पॅड घरी कसे बनवायचे, ते शिकवू या, आणि  आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका बजावत आपलं आयुष्य सुंदर करणाऱ्या स्त्रीचा मासिक पाळीचा खडतर प्रवास सोप्पा होण्यासाठी थोडा हातभार लावू या.
 
माझी ओळख वाहती, मी जगाची निर्माती
त्या प्रवाहाची जगाला गरज, मी का बाळगावी लाज?
चिंध्या कोपऱ्यात तशाच, बाईपणाचा तो साज कोंडलेला
खुशाल सुकवन दारात, मी का बाळगावी लाज?
माझा सखा माझा पती, मुलं, पिता, भाऊ संग
मला कशाचा हो घोर, मी का बाळगावी लाज?
बोलू घरी दारी आणि शेजारी
करू आकाश मोकळे घेण्यास भरारी
झोका आकाशीचा माझा, मी का बाळगावी लाज?
 
disha.kene07@gmail.com
बातम्या आणखी आहेत...