आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाग बये, जाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिजडा आणि जोगती या दोन लैंगिक अल्पसंख्याक घटकांत मागण्यावरून मारामारी  झाली. तसे पाहायला गेले, तर हा मुद्दा सामंजस्याने सोडवणे गरजेचे होते. पण या अंतर्गत वादाला राजकीय आवरण चढवून धर्मीय ढाच्यात बसवून, सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. आपसातील वादात धर्मातल्या लांडग्यांनी डाव साधत मलिदा खायला सुरुवात केली.

मागील काही वर्षांमध्ये सत्तेने विविध गटांच्या अस्मितांना खतपाणी घालत, अगदी खालच्या पातळीवरचे राजकारण सुरू केले आहे. जे माणूसपणाला निश्चितच घातक आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीकडे धर्म-जात-प्रांत आदी अस्मितांच्या चष्म्यातून पाहून निकष ठरवतोय. यातून उद्भवणारे गुंते अभ्यासणारे बरेच अभ्यासक, लेखक वारंवार बोलतच आहेत. पण मी यावर बोलण्याचे कारण मात्र वेगळे आहे. इतकी वर्षं ज्या धर्म-जात आणि प्रांतीय अस्मितांनी सर्वसमावेशक आणि सर्वधर्मीय असलेल्या हिजडा समुदायाला सोयीचे दैवीकरण करून वापरले आणि आहे त्याच परिस्थितीत खितपत ठेवले, त्या समुदायाच्या अंतर्गत वादांना या अस्मितांच्या चौकटीत बसवून समोर आणण्याचे काम एक विशिष्ट गट करू पाहत आहे. ज्यावर समूहासोबतच इतरांनीसुद्धा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

हे सारे सांगण्याचे कारण, म्हणजे २५ ऑगस्टला धुळ्यात हिजडा आणि जोगती या दोन लैंगिक अल्पसंख्याक घटकांत मागण्यावरून वाद झाले. ज्याचे रूपांतर पुढे मारामारीत झाले. तसे पाहायला गेले, तर हा मुद्दा सामंजस्याने सोडवणे गरजेचे होते. पण या अंतर्गत वादाला राजकीय आवरण चढवून धर्मीय ढाच्यात बसवून, सामान्यांपर्यंत पोचवण्यात आले. आपसातील वादात धर्मातल्या लांडग्यांनी डाव साधत मलिदा खायला सुरूवात केली. 

वाईट याचे वाटते की, आजही आपल्यावर भीक मागायची वेळ ज्या व्यवस्थेमुळे आली आहे, आम्ही तिला प्रश्न विचाराचे सोडून, कळत नकळत त्याच व्यवस्थेचे समर्थन करत आहोत, हे या समूहाला कळत का नसावे? आम्हाला एकविसाव्या शतकातही भीक का मागावी लागतेय हे विचारायचे सोडून आम्ही भीक मागण्यासाठी भांडतो आहोत. आणि ज्यांच्यावर आपले हे भुकेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे, ते मात्र आपल्या या वादात त्यांची राजकीय पोळी भाजताहेत हे आपल्या केव्हा लक्षात येणार? 

धार्मिक प्रश्नांवर पुढे येऊन समर्थन देणारे आमच्या शैक्षणिक, आरोग्य, लैंगिक अभिव्यक्तीच्या वेळी मात्र या समूहाला विकृत ठरवतात. परंतु आम्ही आज त्यांनाच आमचे नेतृत्व करण्यासाठी निवडतोय हे का लक्षात येत नसावे? आम्ही किती दिवस ही गुलामी सहन करणार आहोत? ज्यांनी प्रमाणभाषेत तुमचं अस्तित्व शिवी म्हणून वापरले, ज्यांनी तुमच्या असण्याला हजारो वर्षापासून वाळीत टाकले, आम्ही भीकेसाठी त्यांच्या सोबत उभे आहोत, याची खंत आपल्याला केव्हा वाटणार आहे आणि हिजडा, जोगती समाज केव्हापासून कुठल्या एका धर्माशी बांधील झाला? आपण आपल्या इतिहासात डोकावले पाहिजे. हा समुदाय वरकरणी एका धर्माचा वाटत असला तरी, तो सर्वसमावेशक आहे. ज्यात विविध जातीधर्मांचा समावेश आहे. याला एका धर्माशी बांधणाऱ्यांनी अगोदर या समूहाच्या इतिहासाचा अभ्यास करावा. त्यांच्यावर असलेल्या संस्कारांचा, तसेच एैतहासिक, सामाजिक परिस्थितीचा आभ्यास करावा.

हिजडा आणि जोगती ही संस्कृती फकिरीकडे नेणारी संस्कृती आहे. जी कुठल्या धर्माशी नाही, तर वैश्विकतेशी, मानवतेशी संबध असणारी आहे. त्या संस्कृतीला पिढ्यान् पिढ्या पुढे नेणाऱ्यांऐवजी दांभिकांच्या नादी लागून आम्ही आपली वैश्विक संकल्पना स्वतःच पायदळी तुडवत आहोत, याचा विचार समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीनेही करावा, वैयक्तिक स्वार्थासाठी समूहाचाच बळी घेऊ नये. हिजडा संस्कृती ही धार्मिक अस्मिता जपण्यासाठी नाही, तर माणसाला माणूस म्हणून जोडणारी संस्कृती आहे, तिचे अशाप्रकारे धार्मिक विघटन होऊ नये. भांडायचेच आहे तर शैक्षणिक प्रश्नांसाठी भांडावे, ३७७ कलम जे समूहाच्या लैंगिकतेवर निर्बंध लादते, त्या विरोधात भांडावे, आरोग्यविषयक आणि रोजगारविषयक प्रश्नांसाठी भांडावे. रोजगाराचे प्रश्न, समानता आणि सन्मानाचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावे, ज्या धर्मानी आपले सोयीचे दैवीकरण किंवा हराम मानून आपल्याला परंपरेच्या नावाखाली पायात घुंगरू बांधून नाचवले, आपण त्या संस्कारांचे समर्थन कसे करू शकतो? फोडा आणि राज्य करा ही व्यवस्थेची नेहमीच रणनीती राहिली आहे. तिला वेळीच ओळखून परिवर्तनाकडे वाटचाल आपण करायला हवी. धर्म आणि राजसत्तेची चमचेगिरी करणाऱ्यांना वेळीच जागा दाखवायला हवी, तरच आपल्या भविष्यातील पिढ्यांना सन्मानाने जगता येईल. आधुनिक स्वरुपात धार्मिक गुलाम बनवू पाहणाऱ्या नेतृत्वानेही, आपण आपल्या समूहाला परत हजारोवर्ष मागे नेत आहोत, याचे भान ठेवावे असे या क्षणी सांगावेसे वाटते. 
तू भीक मागतेस कारण, 
त्यांनी ठरवलंय तू भीक मागावी म्हणून.
तू अर्धनग्न नाचतेस त्यांच्या, मैफलीत कारण, 
त्यांनी ठरवलंय तू त्याच योग्यतेची आहेस म्हणून.
तू असतेस त्यांच्या अंथरुणावर वारंगना म्हणून कारण 
तुला त्यासाठीच वापरायचं ठरवलंय त्यांनी म्हणून.
त्यांनी तुला तुझ्या गुलामीची जाणीव होऊ नये म्हणून 
बांधलीय तुझ्या डोळ्यावर दैवीकरण आणि धर्माची पट्टी
आणि तुझ्याच कळपातील एकाच्या हातात दिलाय दंड, 
तुला व्यवस्थेच्या शिस्तीत हाकण्यासाठी...
जाग बये आणि डोळे उघडून पाहा तुझं मुक्त वैश्विकपण 
कोण बंद करू पाहतंय धर्म आणि जातीच्या चौकटीत...
आणि विचार त्यांना कारण, तुझ्या भीक मागण्याचे, 
देह विकण्याचे, सामाजिक अवहेलनेचे
मग बघू म्हणाव तुमचा धर्म कशासोबत खायचाय ते..
तोपर्यंत स्वतःच्या माणूस असण्याला, 
त्यांच्या व्याखेत रूपांतरित होऊ देऊ नकोस ...

- दिशा
disha.kene07@gmail.com
बातम्या आणखी आहेत...