आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अस्वस्थ हतबल करणारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दंगलीत पोरक्या झालेल्या पोरांसारखी
चिडीचूप बसलेली पुस्तकं मोकळी होतात
कपाटाच्या बंदीवासातून तेव्हा
दाही दिशा कवेत घेत ती उभी करतात
जीवनाचा विशाल पट...
सर्व मितींसह पुस्तकांच्या जगाचं रहस्य उलगडून दाखवणारी ही कविता आहे ललिता गादगे यांची. जीवनातील सुखदु:खाच्या, आशा-निराशेच्या झुल्यावर झुलताना काळीज विदीर्ण करणा-या वेदनेचा अनुभव घेताना पुस्तकंच मित्र बनून मदतीला येतात. कधी चाचपडणा-या पावलांना दिशा दाखवताना मार्गदर्शक होतात, कधी गुदगुल्या करून पोट धरून हसायला लावतात तर कधी वाकुल्या दाखवून, डोळे वटारून भीती दाखवतात. या पुस्तक आणि वाचकाच्या नात्याचे मोठे विलक्षण वर्णन या कवितेत केलेले आहे.
ललिता गादगे कर्नाटकात बीदर जिल्ह्यातील रक्षाळ या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या, पण शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या आणि लग्न करून कायमच्या मराठवाडी बनून गेलेल्या. दहावीची परीक्षा दिली आणि लग्न झाले, पण म. फुलेंचा वारसा चालवणारा जोडीदार मिळाल्यामुळे नंतर शिक्षण पूर्ण करता आले. मनाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयात सेवा संपवून त्या नुकत्याच समाधानाने निवृत्त झाल्या आहेत.
ब-याचदा कुठल्याही साहित्यिकाची लेखनाची सुरुवात कवितेनेच होते. (त्यातल्या त्यात प्रेमकवितेने.) ललिता गादगेही याला अपवाद नाहीत. त्यांचा पहिल्या कवितासंग्रहाचे नाव ‘फसवी क्षितिजे’ आहे. क्षितिजे नेहमीच फसवी असतात याचे आत्मभान देणा-या अनेक सुंदर कविता त्यात आहेत. त्यातील ‘स्वयंपाक करता-करता’ ही कविता पाहण्यासारखी आहे.
दोन घड्यांची पोळी लाटताना मुलगी म्हणाली, ‘चार घड्यांची पोळी मऊ होते ना?’
म्हटलं, ‘स्त्री-पुरुष दोनच वर्ण,
चार वर्ण मान्य नाहीत मला.’
तेवढ्यात बैठकीतून कडाडणं झालं
‘तत्त्वज्ञान घाला चुलीत, पोटात काऽव काऽव होतेय’
आणि तेव्हापासून
मी सुरुवात केली, ‘एकाधिकार’
घडी नसलेले फुलके करायला.
स्थळकाळाच्या मर्यादा पुसून सर्व ठिकाणी येणा-या अनुभवाची वास्तव जाणीव करून देणारी ही कविता भ्रमाचे भोपळे फटाफट फोडणारी आहे. तसेच नाळबंधाची कहाणी, खिडकीतलं आभाळ, अंतरीचे धावे हे ललितनिबंधही आले आहेत.
ललिता गादगे यांचे बालपण ग्रामजीवनाशी निगडीत असल्यामुळे तिथले संस्कार, रीतीभाती, जगण्याच्या पद्धती, ग्रामीण जीवनातील सुखदु:ख त्यांना जवळचे वाटते. ग्रामीण स्त्रीचे चित्र उभे करताना तिच्या वेदना अनुभवताना त्या एकरूप होऊन गेल्याचे त्यांच्या अनेक कवितांमधून अनुभवायला मिळते. खेड्यात मुलीचे लग्न होऊन सासरी नांदायला निघाल्यावर अख्खा गाव तिला निरोप द्यायला पारावर जमा व्हायचा.
म्हारोतीच्या पारापाशी, पाय धिवीले भावानं
माय तव्हा म्होरं आली, पाणी डोळ्याचं पुसून
भाऊ-भावजय तिचे पाय धुऊन कुंकू लावून तिच्या पाया पडायचे. बैलगाडीत बसलेल्या मु-हाळ्याजवळ शिदोरीची पाटी दिली जायची. लेक गाडीत बसताना सगळे गहिवरून जायचे. आया-बाया तिला कुंकू लावून कानसुलावर बोटं मोडताना अलाबला करायच्या. सासरघरी चांगलं नांदून बापाचं, कुळाचं, गावाचं नाव मोठं करण्याबद्दल सूचना द्यायच्या.
आशीलाच्या लेकीचा ग, पदर डोईनं असावा
औडा-दोन औडाऊन, बंदा कुंकाचा दिसावा
बंद्या रुपयाएवढं ठसठशीत मोठं कुंकू लावणं म्हणजे नव-याबद्दल असीम निष्ठा जपण्याचं परिमाण आणि डोईवरचा पदर म्हणजे तिच्या घरंदाजपणाची खूण समजली जात असे. त्यामुळे लग्नाच्या वयातल्या आणि लग्न झालेल्या सर्व मुलींना माहेरातून या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक समजून सांगितल्या जात.
मन लई हे वडाळ, त्याच्या मुसक्या बांदून
अभाग्याच्या लेकीनं ग, नाव करावं नांदून
प्रत्येक आईवडिलांसाठी हे प्रतिष्ठेचं समजलं जाई की त्यांच्या मुली सासरी चांगल्या नांदत आहेत. त्यामुळे इकडेतिकडे धावणा-या मनावर ताबा ठेवून संसार करण्याचे संस्कार कुटुंबसंस्थेकडून प्रत्येक घरातून हेतुपुरस्सर केले जात असत. मुलीचं नांदणं मोडणं म्हणजे आईवडिलांसाठी मोठी मानहानीची गोष्ट समजली जात असे. त्यामुळे हे होऊ नये म्हणून अनेक मुली त्या काळी सासरघरी अपरिमित छळ सोसत दु:खी-कष्टी आयुष्य जगत पण नांदणं सोडत नसतं. वंशाचा दिवा देणा-या स्त्रियांची थोडी बरी अवस्था असे. मुलींच्याच आईच्या किंवा निपुत्रिक स्त्रीच्या जगण्याची पार दशा होई. सगळीकडून उपेक्षा आणि अवहेलनाच तिच्या वाट्याला येई. हेच आपलं दैव अशी समजून मनाची घालून भडभडून रडताना पदरानं डोळे पुसणा-या किती तरी जणी घराघरातून दिसायच्या हे चित्र महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात दिसतं आणि त्याचं अतिशय प्रत्ययकारी चित्रण ललिता गादगे यांनी उत्कटपणे केले आहे. संवेदनशील जाणत्या मनाला हे प्रश्न सतत बेचैन करत असतात. त्या लिहितात;
उन्हं कलतात तेव्हा, निरर्थक वाटतात
सारे संघर्ष नि झगडे, उमटत राहतात नुस्ते
शून्याचेच ओरखडे...
ललिता गादगे यांनी जशी ग्रामीण स्त्री कवितेतून उभी केली अगदी तशीच शिक्षित, नोकरी-व्यवसाय करणा-या स्त्री तिच्या समस्येसह चित्रित केली. त्यांची कविता स्वत:च्या अनुभवाचा आत्मशोध घेण्यासोबतच सभोवतालाशी तादात्म्य पावणारी, खोल आणि गंभीर संवेदना व्यक्त करताना वाचकाला अंतर्मुख करणारी कविताही त्यांनी लिहिली. स्त्रीच्या समर्पित भावातून आणि नातेसंबंधातील ताणतणावातून निर्माण झालेले प्रश्न, समस्यांचे ओझे घेऊन जगणा-या स्त्रियांचे दु:ख जसे त्यांच्या काव्यातून अभिव्यक्त केले आहे तसेच नवनव्या जाणिवा घेऊन आशावादी जीवन जगणा-या, मनाला उभारी देणा-या, वाट दाखवणा-या स्त्रियाही त्यांच्या कवितेत भेटतात. असफल प्रेमातील फसवेपण, यातना, क्लेश, एकाकीपण, विनाशाची चाहूल, तुटलेपणाची भरून न निघणारी जखम या उत्कट जाणिवा ललिता गादगे यांनी प्रभावीपणे आपल्या काव्यातून वेळोवेळी मांडल्या आहेत. अस्वस्थ हतबलता हा त्यांच्या काव्याचा एक विशेष गुण आहे.
आसवांचं सिंचन केलं, तरी
फुलेना गुलाब, हसेना मोगरा
रुसलेलीच सायलीही
सजवलं मग सारं अंगणच
निवडुंगांनी...