आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेका साह्य करू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आपण एकटे असलो तर थोडंच करू शकतो, पण एकत्रितपणे खूप काही करू शकतो’. - हेलन केलर

आपण एकटे जरी जन्माला आलो तरी एकटे मात्र जगत नसतो. जगण्यासाठी आपल्याला सातत्याने कोणाच्या ना कोणाच्या मदतीची गरज ही भासतेच. कोणत्याही कामासाठी, मग ते घरातलं असो की घराबाहेरचे असो इतरांच्या मदतीशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या कळत नकळत आपण सारेच एका विराट संघाचे सदस्य असतो आणि इतरांना मदत करतो किंवा इतरांची मदत घेतो. स्वत:च्या, घराच्या, समाजाच्या, कंपनीच्या आणि देशाच्या विकासालाही या सांघिक मदतीनेच गती मिळते आणि प्रगती होते. एकमेकांना मदत कशाला करायची तर एकमेकांजवळ असलेल्या संसाधनांचा पुरेपूर आणि योग्य उपयोग व्हावा यासाठी. आपल्याजवळ जे जास्त आहे ते इतरांना द्यावं आणि जे आपल्यापाशी नाही त्याची इतरांकडून भरपाई करावी. हे संघभावनेचे सूत्र आहे.

संघभावनेत सर्वात महत्त्वाची बाब असते इतरांना मदत करण्याची वृत्ती. ही वृत्ती नि:स्वार्थी किंवा स्वार्थीही असू शकते, पण ती असणे सर्वात महत्त्वाचे. अर्थात संघभावना ही चांगुलपणानेच प्रेरित हवी आणि मदतही चांगल्या कामांसाठीच करणे कधीही हितावह. संघ असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वत:ला सुधारण्याची संधी मिळणे. जसजशा नवनव्या जबाबदार्‍या संघावर येऊन पडतात तसतशी प्रत्येक संघ सदस्याला स्वत:च्या क्षमता वाढवण्याची आणि चुका सुधारण्याची संधीही मिळते. चूक झालीच तर आपले संघसदस्य आपल्याला सांभाळून घेतील हा विश्वास असल्याने आपण धाडसाने आपल्या क्षमतांना आव्हान देत कामे करू शकतो. एरवी असं करणं फार धोक्याचं ठरू शकतं.

एकटा माणूस विचार करू शकतो पण त्या विचारांना कृतीत उतरवणे मात्र अनेकांच्या मदतीनेच शक्य होते. प्रचंड मोठी यंत्रे सुरळीत चालू राहण्यासाठी त्यातील सर्व लहान-मोठ्या भागांनी एकत्रपणे काम करणे गरजेचे असते. एक भाग जरी काम करेनासा झाला तरी त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. एकमेकांना मदत करणे ही वृत्ती कोणत्याही कामातील यशासाठी पूर्व अट असते. ही वृत्ती आपल्या चांगुलपणाचंही लक्षण असते. सांघिक भावनेची उदाहरणं मुंग्याच्या वारुळात सर्वात उत्तम पद्धतीने परावर्तीत झालेले आढळून येते. एकटी मुंगी ही शक्तिहीन असते, पण जेव्हा हजारो ,लाखो मुंग्या एकत्र येतात तेव्हा जीवसृष्टीतील अद्भुत विश्व जन्माला येते. माणसांनीही याच मुंगीपासून धडा घेत सहजीवनाची प्रेरणा घेतली आहे. समाजात असणे म्हणजे संघात असणे. त्यामुळे संघभावनेला इथे पर्याय नसतो.
दिव्य एज्युकेशन टीम
एकीचे बळ...
- एकमेकांवर पूर्ण विश्वास आणि एकमेकांबद्दल आदर ही संघाची शक्ती असते.
- पूर्ण पारदर्शकता आणि पूर्ण समानता हा संघाचा पाया असतो.
- संघ कामाबद्दल गोपनीयता बाळगणे ही संघाच्या यशाची पावती असते.
- एकासाठी सारे आणि सार्‍यांसाठी एक ही नीती संघाला बळकट बनवते.
- सांघिक कामामध्ये जे जे सर्वेत्कृष्ट आहे त्याचा योग्य उपयोग होतो.
- वेळेची बचत होते आणि नैसर्गिक आणि जैविक साधनांचा समतोल वापर होतो.
- एक संघ पद्धतीने काम केल्यामुळे प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या गुणाचा उपयोग केला जातो.
- आपापसातील मैत्रीचे बंध दृढ होण्यास मदत होते.