आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्रेट’ : तळागाळाचा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात अनेक भाषा, धर्म, जाती, उपजाती आहेत. जवळपास प्रत्येक भाषेच्या, धर्माच्या जातींच्या अगदी उपजातींच्या संस्था आहेत. आपल्या कुवतीप्रमाणे त्या संस्था आपल्या समाजबांधवांसाठी मदतही करीत असतात. काही संस्था आर्थिक मदतीबरोबरच शैक्षणिक, व्यावसायिक कार्यक्रमांबरोबरच विवाह मंडळेदेखील चालवतात. प्रामुख्याने, भारतातील दूरवरच्या खेड्यांमधून नोकरी-व्यवसायाच्या शोधात नागरिकांनी शहराच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केल्यावर अशा स्वरुपाच्या संस्था आकारास आल्या. त्याचप्रमाणे भारताबाहेर गेलेल्या भारतीयांनीदेखील अशा स्वरुपाच्या संस्था त्या देशांमधून स्थापन करत आपले योगदान नोंदवत असतात. सामाजिक उतरंडीवर खालच्या स्तरावर असलेल्या अशाच एका ध्येयवेड्याने GREAT नावाची एक संस्था इंग्लंडमध्ये स्थापन केली आहे. ‘गुरू रविदास एज्युकेशनल असिस्टंट ट्रस्ट’ म्हणजेच ( GREAT) ही संस्था विशिष्ट जाती, धर्म, पंथ, वर्ण यांसाठी नव्हे, तर खर्‍या अर्थाने माणुसकी हाच धर्म मानून भारतातील सर्व जाती, धर्म, पंथासाठी कार्य करीत आहे.

ही संस्था डॉ. चरण बंगेर या इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयाने फेब्रुवारी 2005मध्ये स्थापन केली. डॉ. बंगेर हे 1968 साली पंजाबमधून उच्चशिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले. इंग्लंडमध्ये तांत्रिक शिक्षण घेत असतानाच डॉ. बंगेर यांनी ‘न्युक्लियर फिजिक्स’ या विषयात डॉक्टरेट मिळविली आणि इंग्लंडमधील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून अध्यापन सुरू केले. त्याच दरम्यान डॉ. बंगेर यांचे पंजाबमधील मूळ गावाबरोबरच भारतातील अनेक प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी फिरणे झाले. एकेकाळी त्यांनी स्वत: अनुभवलेले प्रसंग आणि शिक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष अजूनही बर्‍याच लहान मुलांच्या वाट्याला येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिक्षणाच पर्याय जर मुलांच्या वाटेला येत नसेल, तर टिचभर खळगी भरण्यासाठी हीच लहान व तरुण मुले वाममार्ग अवलंबतील, ही भीती डॉ. बंगेर यांना वाटली. यातूनच या मुलांच्या शिक्षणासाठी काही तरी भरीव काम करणे आवश्यक असल्याचे डॉ. बंगेर यांना जाणवले. इंग्लंडमध्ये परतल्यानंतर डॉ. बंगेर यांनी समविचारी लोकांच्या मदतीने शैक्षणिक मदतीसाठी संस्था स्थापन करण्याचे ठरवले. त्यातूनच ‘ग्रेट’ ही संस्था जन्माला आली.

गुरू रविदास हे 15व्या शतकातील संत. त्यांनी प्रामुख्याने भक्तीमार्गातून धार्मिक आणि सामाजिक बदल घडवण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात जात-धर्म यांचा प्रभाव होता. धर्मा-धर्मांमध्ये बरेच अंतरही होते. जातीची उतरंड काटेकोरपणे पाळली जात होती. तळागाळातील जातीतील लोकांना कुठलेही मूलभूत हक्क नव्हते. अशा काळात, गुरू रविदास यांनी ‘मानव हाच एक धर्म’ अशी शिकवण भक्तीमार्गातून समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला होता. स्वत: गुरू रविदास हे चर्मकार समाजातील होते, परंतु याचा मनामध्ये रोष अथवा किंतु न बाळगता तमाम मानव जातीसाठी काम करण्याचे त्यांनी ठरविले होते. गुरू रविदास यांनी समानता, स्वाभिमान, न्याय व सामाजिक स्वातंत्र्यता याचा सातत्याने पुरस्कार केला. तसेच स्वार्थासाठी जातीयता बाळगण्याच्या वृत्तीवर कठोर हल्ला चढवला. जात निर्मूलनाबरोबरच कष्ट करून स्वाभिमानाने जगण्याचा मूलमंत्र रविदास यांनी दिला. रविदास यांच्या सततच्या कीर्तनातून हळूहळू समाजामध्ये जनजागृती निर्माण होऊ लागली. ‘शिक्षणाची कास धरा व त्यातूनच आपल्या व समाजाच्या उन्नतीचा मार्ग निर्माण करा’ या रविदास शिकवणीला अनुसरून डॉ. चरण बंगेर यांनी वाटचाल केली. पुढे रविदासांबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांचेच नावे संस्थेला दिले.

आज भारतातील बिहार, पंजाब, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा अशा राज्यांमधून बर्‍याच गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च या संस्थेतर्फे केला जातो. अगदी शालेय शिक्षणापासून ते पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठीदेखील ही संस्था मदत करते. आज वैद्यकीय, दंतवैद्यकीय याचबरोबर फार्मसी, नर्सिंग अशा शिक्षणासाठीदेखील ही संस्था मदत करीत आहे. या संस्थेने भारतातील बर्‍याच शहरांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले असून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती तसेच त्याची गरज जोखली जाते. आवश्यक ते पैसे तेथील शाळा अथवा महाविद्यालयाला दिले जातात.

आतापर्यंत सुमारे अडीचशे विद्यार्थी संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे उच्चशिक्षित झाले आहेत. हैदराबाद येथील चर्मकार तर बिहारमधील मुशहर समाजातील काही मुले गरिबीमुळे आजही शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीत. त्या मुलांचा वर्षाचा संपूर्ण खर्च या संस्थेतर्फे केला जातो. बहुतकरून देणगीद्वारे अथवा मनोरंजनाचे कार्यक्रम करून संस्था पैसा जमवते. संस्थेसंदर्भात अधिक माहितीसाठी www.doiphode.in या संकेतस्थळावर अथवा samastadoiphode@gmail.comया ई-मेलवर संपर्क साधता येईल.