आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी शिक्षण घेण्यासाठी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी शाळेत असल्यापासूनच मानसिक आणि बौद्धिक तयारी करायला हवी. परदेशामधल्या कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवावा ही बाब थोडी गौण ठरवली तरी कुठले क्षेत्र निवडावे हा प्रश्न सुद्धा सुटू शकतो. तेव्हा परदेशामधील कॉलेजमध्ये ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी खास ‘सॅट’ ही परीक्षा असते. ‘सॅट’ म्हणजे ‘स्कोलास्टिक अँप्टिट्यूड टेस्ट’ आणि ‘स्कोलास्टिक असेसमेंट टेस्ट’. ही परीक्षा उत्तीर्ण होणं किंवा परदेशी विद्यापीठांनी घालून दिलेल्या निकषांवर आधारित गुण मिळवून पास होणे म्हणजे पहिली पायरी जिंकली. कारण इथे तुमचा प्रवेश निश्चित झालेला असतो. ज्या विद्यार्थ्यांचे स्पेशलायझेशन किंवा ठरावीक क्षेत्र निश्चित नाही त्यांच्यासाठी ‘सॅट- जनरल’ परीक्षा असते. यामध्ये कुठल्याही ठरावीक विषयाचे ज्ञान अपेक्षित नसते तर क्रिटिकल थिंकिंग, मॅथ्स आणि रिझनिंगसारखे दहा वेगवेगळे सेक्शन्स असतात .प्रत्येक सेक्शनचा कालावधी पंचवीस मिनिटांचा असतो. दोन सेक्शन वीस आणि दहा मिनिटांचे असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, किंवा मॅथ्स किंवा इकॉनॉमिक्स किंवा सायकॉलॉजी किंवा इंग्लिश लिटरेचरसारखे अन्य विषय घेऊन ज्यांना कॉलेज करायचे असते त्यांच्यासाठी मात्र ‘सॅट -सब्जेक्ट टेस्ट’ असते. ही सब्जेक्ट टेस्ट म्हणजे निवडलेल्या विषयांचे ज्ञान मोजण्याचा मापदंडच असतो. अमेरिकेतील बर्‍याचशा विद्यापीठांचे गुण पात्रता निवडीचे निकष वेगवेगळे असू शकतात. भारतामधील सॅट सेंटर्सवर ‘सॅट-जनरल’ व ‘सॅट सब्जेक्ट’ अशा दोन्ही परीक्षा होत असतात. परीक्षांची फी अंदाजे दीडशे ते एकशे ऐंशी डॉलरच्या आसपास असते. अपंग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेळेच्या दृष्टीने काही सवलती असतात.

ही संपूर्ण माहिती www.collageboard.com वर मिळू शकते आणि इथेच विद्यार्थी ऑनलाइन रजिस्टरही करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज भारतामध्ये पूर्ण केले आहे मात्र पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जायचे आहे त्यांच्यासाठी जीआरई अर्थात ‘ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झाम’ असते. पुन्हा इथे मुद्दा येतो तो जनरल आणि सबजेक्टचा. कुठल्याही उच्च शिक्षणासाठी ‘जीआरई जनरल’ उत्तीर्ण होणं गरजेचं असतं पण स्पेशलायझेशनसाठी मात्र ‘जीआरई सब्जेक्ट टेस्ट’ उत्तीर्ण होणे गरजेचे असते. रजिस्टर करतानाच आपण पेपर बेस्ड टेस्ट द्यायची का कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची हे ठरवायचे असते. त्यानुसार मग सेंटरच्या किंवा कॉम्प्युटर्सच्या उपलब्धतेनुसार टेस्ट सेंटरमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागते. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ‘जी-मॅट’ ही परीक्षा असते. ‘जनरल मॅनेजमेंट अँप्टिट्यूड टेस्ट’ ही परदेशातील बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकते. जगभरातील अनेक विद्यापीठांमधून कुठल्याही देशामध्ये तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे त्यानुसार स्कोअर्स ठरवावे लागतात. अमेरिकेतही बर्‍याचशा विद्यापीठांचे स्कोअरचे निकष वेगवेगळे असू शकतात. परदेशामधील शिक्षणासाठी एक गोष्ट सगळ्यांसाठी समान असते आणि ती म्हणजे इंग्लिश लँग्वेज! इंग्रजी भाषेचे ज्ञान हे त्यांच्या मापदंडाप्रमाणेच असायला हवे. म्हणून मग कॉलेजमधले अँडमिशन असो वा मास्टर्स, वा अन्य कुठले त्या देशांमधल्या इंग्लिशच्या नियमांनुसारच प्रवेश निश्चित होतो. म्हणून अमेरिकेसारख्या देशामध्ये शिकायचे झाल्यास ‘टोफेल’ म्हणजे ‘टेस्ट ऑफ इंग्लिश अँज फॉरीन लँग्वेज’ ही परीक्षा देणे बंधनकारक असते.

इंग्लिशची आणखी एक परीक्षा असते ती म्हणजे ‘ईलेट’ अर्थात ‘इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सर्व्हिसेस’. ही परीक्षा मात्र कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युके, नेदरलँडमधील शिक्षणासाठीच उपयुक्त ठरते. कारण ही ब्रिटिश मापदंडानुसार ठरवलेली परीक्षा आहे. ‘टोफेल’ ही अमेरिकन संस्थांची असल्यामुळे ‘ईलेट स्कोअर’ इथे उपयुक्त ठरत नाही आणि ऑस्ट्रेलिया, युके, नेदरलँड, कॅनडामध्ये ‘टोफेल स्कोअर्स’चा उपयोग होत नाही. त्यामुळे ‘सॅट’, ‘जीआरई’, ‘जी मॅट’सारख्या परीक्षांबरोबरच ‘टोफेल’ किंवा ‘ईलेट’ परीक्षा देणेही बंधनकारक आहे. ‘टोफेल’ किंवा ‘ईलेट’च्या स्कोअर आणि मग वेगवेगळ्या परीक्षांचा स्कोअर बघून मग परदेशातील विद्यापीठ प्रवेश निश्चिती करते. परदेशी शिक्षणासाठीची कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी आपल्याकडे अधिकृत पासपोर्ट असणे गरजेचे असते. परदेशामधील उच्च शिक्षणाचा खर्च तीस ते सत्तर लाख रुपयांच्या आसपास असतो. मात्र कुठला देश, कुठले विद्यापीठ, कुठला कोर्स, किती काळाचा कोर्स ह्यावर खर्चाचे आकडे बदलतात. मात्र स्कॉलरशिपची सोय सुद्धा असते. www.ets.org अर्थात एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिसेस या वेबसाइटवर अधिक माहिती मिळू शकते.