आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटकी शाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची वेदना चितारणारी कविता आपण वाचली. या आठवड्यात दगडखाण कामगारांच्या मुलांची वेदना रेखाटणारी कविता आहे. आपल्या मुलांचे भावविश्व किती कोवळे असते. त्यांची भाषा, जगणे कसे चौकोनी असते, पण या कवितेतला मुलगा अतिशय आक्रमक शैलीत त्याचं जगणं मांडतो आहे. ते थरारून टाकणारे आहे, अस्वस्थ करणारे आहे.

दुर्दैवाने अशी काही माणसं आहेत आणि त्यांची अशी लाखो मुलं आहेत याची माहितीही आपल्या समाजमनाला नसते. या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांच्या मते महाराष्ट्रातच केवळ असे 15 लाख दगडखाण कामगार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची 2 ते 4 लाख मुलं असतात. कर्नाटक, आंध्र व विदर्भ-मराठवाड्यासारख्या गरीब भागातून पुणे, कोल्हापूरसारख्या समृद्ध भागातल्या बांधकामाचे दगड फोडायलाही माणसं येतात. यांचा जातवार अभ्यास झाला आहे. यात दलित व भटके विमुक्त जास्त आहेत.

एकीकडे शिक्षण कायदा म्हणतो, मुलगा जिथं राहतो तिथपर्यंत शाळा उघडली पाहिजे, पण हे कायदे करताना या माणसांचे प्रश्नही माहीत नसतात. मुळातच दगडखाणीत ब्लॉस्टिंग होते त्यामुळे त्याच्यापासून काही किलोमीटर शाळा किंवा कोणतीच इमारत उभारता येत नाही, अशा दुर्गम ठिकाणी पोरांनी कोणत्या शाळेत जायचं... गाव तिथून खूप लांब.. मुले शिकतच नाही. लहानपणीच दगडखाणीत बालकामगार होतात. काळा विनोद करावा तसा या कवितेत या दगडखाणीला म्हणजे त्याचे बालपण खाऊन टाकलेल्या दगडखाणीला शाळा उपहासाने म्हणतो. त्या शाळेतली प्रतीकं कोणती आहेत ते सांगतो. मुलांचे बालपण उद्ध्वस्त होऊन जाते.

मुलांचे कोवळे हात रक्ताळतात... हळूहळू निबर होतात. ते निबर हात हे आपल्या समाजमनाच्या निबर संवेदनांचे प्रतीकच जणू असते. या शाळेत या मुलांचे बाल्य करपून जाते. उद्ध्वस्त होते. ही मुलं खाणमालकासाठी दगडासारखीच निर्जीव असतात. पालकांना इवलीशी मिळणारी मजुरी गोड वाटते. पुन्हा दुर्दैव हे की हा अन्याय दूर जंगलात राहत असल्याने माध्यमांच्या समाजमनाच्या कुणाच्याच लक्षात येत नाही...या लेकरांच्या रक्ताळलेल्या आयुष्यावर शहरातले इमले उभे राहतात. बांधकाम व्यवसाय वाढतो. सेवा क्षेत्र फुगते आणि आम्ही मुलांच्या शिक्षणाच्या थडग्यावरील या दगडी विकासाचा विकासदर वाढला म्हणून पाठ थोपटून घेतो...

भरत दौंडकरने आक्रमक भाषेत हे कारुण्य अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. दगडखाणीतली सारी प्रतीकं जिवंत झाली आहेत.

गुरुजी ही शाळा आमची नाही, जी खाणीच्या धडीखाली भरते
ती आमची शाळा, तिथे आमचे हात पेन्सिल नाही
सुतकीचा दांडा पकडतात, एका ठोक्यात दगडाला चिर पाडून
पहिला धडा गिरवतात, गुरुजी पहिला धडा गिरवतात
आमची एकच असते प्रार्थना, सुटण्याआधी शाळा
कोसळू नये अंगावर, रक्त सांडलं तरी
आळ येऊ नये अंगावर....
आम्ही काय भितो, तुम्ही हातावर देता त्या छडीला...
दणका बसून रक्त कळकते, तीच शिक्षा वाटते गोड
चुकी नसतानाही गुरुजी, हातावरती किती येतात फोड
तुम्ही शिकवता की, दोन बिंदूतलं अंतर
कसं काढायचं, आम्ही कसं शिकायचं की
पाल आणि बंगला, यातलं अंतर कसं काढायचं
जाऊद्या गुरुजी, भटकी शाळा न भटकी पोरं
दगडांचे प्रश्न अन्, हातुड्यांची उत्तरं
पण एकमात्र खरं, एकदा का टाकलं नाव
पुन्हा कधीच खोडता येत नाही, खाणीतील शाळाच अशी
जी पाणी लागल्याबिगर
कुणालाच सोडता येत नाही....
चड्डीला गॅटर पण, वाटत नाही लाज
मरून कित्येकवेळा पाहिलंय, आता जगण्याचा आलाय माज
जन्मभर उघडी, ही शाळा कशी झाकायची
सगळं दिलंय फेकून
दाखल्यावरती जात कुठं फेकायची...
(कवी भरत दौंडकर हे प्रसिद्ध कवी असून पुणे जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत)

संकलन. हेरंब कुलकर्णी