आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण : साबणाच्या साहाय्याने बोटीची सफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ साबणाच्या साहाय्याने टबमध्ये बोट फेर्‍या मारायला लागेल असे तुम्हाला सांगितले तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल? आज आपण हे नेमके काय होते हे करूनच पहायचे आहे. साहित्य अगदी मामुली. एक दहा गुणिले पंधरा सेमी थर्मोकोलचा तुकडा, टूथपिक, दोन तीन चौरस सेमी स्पंजाचा किंवा भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणारा हिरव्या रंगाचा स्क्रबरचा तुकडा आणि टबमध्ये पाणी.

ज्या आकाराचा साबणाचा तुकडा आहे तेवढ्या आकाराचे खाच थर्मोकोलच्या तुकड्याच्या एका बाजूस मध्यभागी पाडायची. आकृती तुमच्यासमोर आहेच. साबणाच्या तुकड्यामधून आरपार टूथपिक घुसवायची आता बनवलेल्या खाचेमध्ये साबण टूथपिकच्या आधाराने राहिला पाहिजे. साबणाचा पाण्याला स्पर्श तर व्हायला पाहिजे पण साबण पाण्यात पडता कामा नये एवढी काळजी घ्या. प्रत्यक्ष प्रयोग करण्याआधी प्रयोगामागील विज्ञान कसे कार्य करते ते पाहूया. फुगा फुगवण्याएवढे सोपे काही नाही हे तुम्हाला ठाऊक आहे. फुगा फुगवण्यासाठी फार कमी ऊर्जा लागते. पण चाकात हवा भरण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. तोंडाने सायकलच्या चाकात हवा भरता येत नाही. कारण ट्यूब आणि त्यावरील टायर यांचा प्रतिरोध अधिक असतो. हवा असो की द्रव पदार्थ दोन्ही प्रसरण पावण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. आणि प्रतिरोध निर्माण करणार्‍या पदार्थाच्या प्रतिरोधास पृष्ठताण ‘सरफेस टेंशन’ म्हणतात. द्रवपदार्थाचे रेणू सतत परस्परास ढकलत असतात. त्यामुळे त्यांच्या पृष्ठभागावर क्षीण विद्युत भार तयार होतो. आता प्रयोग तुम्ही बनवलेला थर्मोकोलचा तराफा टबमध्ये सोडा. थर्मोकोलमुळे तो तरंगत राहील. त्याच्या एका टोकास असलेल्या स्पंजावर भांडी घासण्यासाठीच्या द्रव साबणाचा एक लहान थेंब ड्रॉपरने सोडा. द्रव साबण पाण्यात पडणार नाही याची काळजी घ्या. पाच सहा सेकंदात तुमचा तराफा कोणीतरी ढकलल्यासारखा पुढे जातो हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एवढा लहान स्पंज तराफ्याला कसा ढकलतो बरे? आकृतीत दाखवलेला तराफा आयताकृती आहे. याचा आकार बदलून पुढील बाजू स्पीड बोटीसारखी निमुळती केली आणि मागील बाजू सपाट सरळ रेषेत ठेवली तर तराफ्याच्या वेगात फरक पडतो का हे पहा. दोन्ही तराफ्याना मिळणारी ऊर्जा कोण देतो? व निमुळते टोक असलेला तराफा वेगात का पुढे जातो याची उत्तरे तुम्ही मिळवायची आहेत. मी फक्त तराफा पुढे का जातो याचे उत्तर देणार आहे. तराफा पुढे जाण्याचे कारण पाण्याचा पृष्ठताण हे आहे. साबण किंवा द्रव डिटर्जंट पाण्याचा पृष्ठताण कमी करतात. पाण्याचा पृष्ठताण कमी झाला म्हणजे पाण्याचे रेणू वेगाने परस्परापासून दूर जातात. पाण्याचे रेणू दूर जाण्याने निर्माण होणारी ऊर्जा तराफा पुढे ढकलते. आहे की नाही गंमत. मोठे सिंक पाण्याने भरून हा प्रयोग करून पाहता येईल. द्रव साबणाने जर पाण्याचा पृष्ठताण कमी होत असेल तर भांडी स्वच्छ करण्यासाठी द्रव साबण कशासाठी वापरतात हे तुमच्या सहज ध्यानात येईल.