आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता शिक्षणाची : पोरी तू तरी शाळा शिक...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोरी तू तरी शाळा शिक...
मढं गाडल्याबिगर मुळाशी
रानात डूलणार नाही पिकं
अडाणी राहू नगस पोरी
तू तरी शाळा शिक
उन्हातला चटका सोसवत नाय
घामाची आंघूळ सरत नाय
हातात बांगडी पायात वहाण नांदत नाय
उन्हाच्या झळा तुला सोसणार काय॥
चिमणे माझं ऐक तू तरी शाळा शिकं
शेणमूत आवरताना
पाठीमधला ढळतो बाक
थाळ ढळस्तोवर अंगामधी
भरतो ताप
तापाचे चटके तुला सोसवायचे नाय॥
चिमणे माझं ऐक
तू तरी शाळा शिक
बांधावरची हिरवी लादी
कापल्याबिगर व्हत नाय
काटयासंग ईळा बी बोटामंदी
घुसल्याबिगर राहत नाय
रक्ताची धार आवरायची नाय
चिमणे माझं ऐक
तू तरी शाळा शिक
मक्यातले सोट अन् उसातले टोप
हातभर झोंबल्याबिगर रहात नाय
चुलीमधल्या सरपणासाठी
रानीवनी किडूककाटूक
डसल्याबिगर रहात नाय
फिरक्यातली ठणक तू सोसणार काय
चिमणे माझं ऐक तू तरी शाळा शीक
चुल्ह्यातल्या धुरासंग ईवळून
काय फायदा नाय
उभी हयात माझ्यावानी
चुल्ह्यामंदी घालवायची नाय
उधळून दे पोरी मळभं
काळजामंदी रूतलेलं
शिक्षण घे जगण्यासाठी
शब्दामंदी व्यापलेलं....
(सीमा सोनवणे, नाशिक )

मुलींचे शिक्षण या विषयावर ठोकळेबाज उपदेश ऐकायची आपल्याला सवय लागलीय.... मुलींच्या शिक्षणाच्या पाट्या ठिकठिकाणी लागलेल्या असतात. एस.टी. बसवर ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’असे यमक जुळवलेले वाचतो. प्रौढ शिक्षणाच्या काळात तर महिला शिक्षणाच्या प्रचाराचे समाजाला अजीर्ण झालेले होते. बाईने का शिकले पाहिजे हे थेट कुणीच सांगत नाही. आडबाजूने सांगत राहतात. त्यामुळे शिक्षणाने मुली पायावर उभ्या राहतील असे अमूर्त भाषेत 8 मार्च बालिका दिवस वगैरेला बोलण्याची प्रथा आहे.
या पार्श्वभूमीवर ही कविता आहे. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी पण ती पारंपरिक उपदेश करत नाही. ही कविता सकारात्मक उपदेश करण्यापेक्षा उलट्या बाजूने मुद्दा पटवून देते. मुलीला तिची आई शाळेत जायला सांगते पण शिक्षणाने काही चांगले घडेल म्हणून नाही तर शेतकरी कुटुंबांतील अमानुष कष्टातून सुटण्यासाठी...तेव्हा ही कविता एकाचवेळी शिक्षणाची ही आहे आणि त्याचवेळी शेतकरी कुटुंबातील महिलांच्या वाट्याला येणार्‍या अमानुष कष्टाविषयीसुद्धा आहे.
कवयित्रीने शेतीतील सर्व कामांचे वर्णन खास शेतकरी ग्रामीण भाषेतल्या शैलीत केले आहे. त्यामुळे त्यातील अस्सलपणा बोलीभाषेचा बाज यामुळे कविता अधिकच प्रभावी होते. कवयित्रीच्या उद्वेगात शिक्षणाच्या आग्रहात आणखी एक भाग आहे. तो म्हणजे शिक्षण हे या अमानुषतेतून सुटका करणारे तिला वाटते. पशूवत कष्टाच्या जीवनातून मानवी जगणे वाट्याला येण्याची शक्यता केवळ शिक्षणामुळेच येऊ शकते हा तिचा आशावाद वेगळा आहे. शिक्षणाने माणसांचे वर्ग बदलतात यावर तिची श्रद्धा आहे.

एवढे करून ही कवयित्री जेव्हा मुलीला शाळेत पाठवेल तेव्हा तिच्या अपेक्षा पूर्ण होतील का... ज्या कष्टकरी वर्गाने चिकाटीने आपली मुलं शिकवली त्या वर्गाच्या पदरी पडलेलं नैराश्य आपण बघतोच आहोत. पदवीधर मुलं पुन्हा याच अमानुष कष्टांना जुंपली गेलीत पण तरीही म्हणून या आईचा आशावाद मुलीला शिकवण्याची जिद्द नक्कीच कमी ठरत नाही.
मुलींच्या शिक्षणाचा वेगळाच आयाम व शेतकरी कुटुंबातील महिलांचे अमानुष कष्ट यासाठी ही कविता कायम महत्त्वाची राहील.

संकलन : हेरंब कुलकर्णी
herambrk@rediffmail.com