आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ह्युमन रिसोर्स- एक उत्तम करिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुठल्याही कंपनीचा ‘फायनान्स’ विभाग म्हणजे त्या कंपनीचा पाठीचा कणा( बॅक बोन) समजला जातो. तेवढेच महत्त्व कुठल्याही कंपनीच्या ह्युमन रिसोर्स (एच.आर.) विभागालादेखील असते. कारण कंपनी चालवण्यासाठी जितकी आर्थिक गुंतवणूक अपेक्षित असते तितकीच कुशल, कर्तबगार, मनुष्यबळाचीही आवश्यकता असते. मनुष्यबळाशिवाय कंपनी चालवणे शक्य नाही आणि म्हणून एच. आर. विभागाचे काम अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. कंपनी चांगली किवा वाईट हे सर्व व्यवस्थापनाच्या पॉलिसीवर अवलंबून असते. एच. आर. विभाग म्हणजे व्यवस्थापन आणि कर्मचारी यामधला एक दुवा म्हणायला हवे. कारण एखाद्या विशेष जागेसाठी किवा अनेक जागांसाठी पदांची नियुक्ती करणे, नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांचा ठराविक पदांसाठी आवश्यक असणारा विकास करणे ( ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट) शिवाय त्यांना देण्यात येणारे वेतन, मोबदला, मानधन, किंवा सोयी सवलती तसेच त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी काही बोनस या सारख्या बाबींची तरतूद करणे, कंपनीला आर्थिक नुकसान न होऊ देता एक कुशल कर्मचारी घडवून त्यांच्याकडून अधिकाधिक काम योग्यरीत्या करून घेणे आणि कंपनीचा व्यवसाय वाढवून त्यांच्यामधील गुणांचा कंपनीला कसा काय फायदा करून देता येईल याचे प्रयत्न एच. आर. विभाग करत असतो. त्यासाठी खेळीमेळीचे परंतु शिस्तीचे वातावरण प्रस्थापित करणे, कर्मचार्‍यांशी संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे, जे पात्र कर्मचारी असतील त्यांच्यासाठी बढती तसेच अपात्र किंवा कामात टाळाटाळ करणार्‍या कर्मचार्‍यांना समज देण्याची जबाबदारी एच. आर. ची असते. नोकरीसाठी येणार्‍या उमेदवारांची पात्रता जोखण्यासाठी परीक्षा, मुलाखती, पगारांची अपेक्षा आदींची जबाबदारीही एचआरची असते. उदारीकरणामुळे अनेक उद्योग, कार्पोरेट कंपन्यांचा पसारा वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस भासत आहे. त्यामुळे एच. आर. ही कंपन्यांच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक बाब आहे. थोडक्यात एच. आर.ची मागणी वाढत आहे.
या शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर पदवीनंतर डिप्लोमा किंवा अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा किंवा एमबीए हे पर्याय असू शकतात. पण एच.आर. विषयीचे काही गोड गैरसमज मात्र विद्यार्थी मित्रांनी टाळायलाच हवेत. उदा. हे पूर्णपणे महिलांचे काम आहे किंवा इथे कामाचा राबता नसतो किंवा गोड बोलणे हीच कला अवगत असणे गरजेचे आहे, वगैरे वगैरे. पण तसे नाही, ही एक परिपूर्ण विद्या शाखा आहे.
vilasgavraskar@yahoo.co.in