आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्वाचे अष्टपैलू गुण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेतृत्व हा एक विशेष गुण आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये स्वसुखासाठी धडपड करण्याची जन्मजात क्षमता असते. माणसंही त्याला अपवाद नाही. स्वार्थभावनेनं प्रेरीत होऊन आपल्या चांगल्यासाठी आपण काम करत असतो. त्यासाठी निरंतर पुढे जात असतो. पण ज्या वेळी कोणी आपल्यासोबतच इतरांनाही पुढे नेतो तेव्हा ती एक विशेष बाब ठरते. यातूनच नेतृत्व जन्माला येतं आणि नेता घडतो. असे नेते कमी असतात हे स्वाभाविकच आहे. कारण नेतृत्वासाठी काही गुण अंगी असणं आवश्यक असतात. आपण त्याला नेतृत्वाचे अष्टपैलू म्हणू शकतो.

नि:स्वार्थीपणा : जो स्वत:च्या स्वार्थापलीकडे पाहू शकतो त्याच्यातच नेतृत्वाची क्षमता जास्त असते. आणि हा स्वार्थ व्यक्तीच्या तसेच समाजाच्या हिताचाही कसा असेल हे ज्याला कळतं तोच चांगला नेता होऊ शकतो. आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वत:चा स्वार्थ, समाजाच्या हितासाठी कुटुंबाचा स्वार्थ बाजूला ठेवायची ज्याची तयारी असतो तोच आदर्श नेता असतो.
दूरदृष्टीपणा : नेत्याला आपल्या समूहाच्या भल्यासाठी भविष्यात येणार्‍या गोष्टींचा विशेषत: संकटांचा अंदाज लावण्याची क्षमता असावी लागते. त्यानुसार त्या संकटाचा सामना करण्यासाठी तो आवश्यक ती उपाययोजनाही करून ठेवतो. दूरदृष्टीचा अभाव असलेली माणसं स्वत:सोबत आपल्या अनुयायांनाही अडचणीत आणतात.
ऐकण्याची इच्छा : चांगला नेता निव्वळ व्याख्यानं, आदेश देत नाही. तो आधी चांगला श्रोता असतो. समोरच्याचं म्हणणं ऐकण्याची त्याची इच्छा असते आणि तयारीही. तो सारं काही सहानुभूतीनं आणि समजूतीनं ऐकतो. ऐकण्याच्या बाबतीत तो लहानमोठा असा भेदभाव करत नाही.
जबाबदारपणा : आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घ्यायला चांगला नेता तयार असतो. विशेषत: अपयशाची जबाबदारी तो स्वत:वरच घेतो. त्याचा दोष तो कोणा इतरावर लादत नाही. आणि यशाच्या वेळी तो कधी आपल्या लोकांना विसरत नाही.
प्रेरकवृत्ती : चांगला नेता स्वत:लाही कायम प्रोत्साहित करतो आणि आपल्या लोकांनाही चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देतो. अपयशात त्यांच्यातला आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी तो धडपडतो. त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत राहतो.
न्यायीपणा : निरपेक्ष, नि:स्वार्थ न्यायवृत्ती ही चांगल्या नेत्याची महत्त्वाची खूण आहे. न्याय करताना तो संबंधिताशी असलेले आपले नाते लक्षात घेत नाही तर केवळ सत्याच्या आधारेच न्याय करतो. हाच न्याय तो स्वत:लाही लावतो. त्याच्या दृष्टीत सारे समान असतात.
उदारता : उत्तम नेता हा उदार असतो. तो दयाळू असतो. पण त्याचे हे गुण त्याचा कमकुवतपणा नसतात. आपल्या सहकार्‍यांप्रती त्याची ही उदारता दयाभावनेतून येत नाही तर प्रेमातून येते. त्यांनी अधिक चांगलं वागावं या भावनेतून येते.
कणखरपणा : अडचणीतच नव्हे तर आनंदाच्या काळातही चांगला नेता कधीही चुकीचे निर्णय घेत नाहीत. कोणत्याही व कोणाच्याही दबावाखाली तो काम करत नाही. त्याचे निर्णय हे पूर्वग्रहदूषित नसतात आणि स्वार्थाने बरबटलेलेही नसतात. तो कायम कणखर असतो आणि त्याची ही कणखरता त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवते.

चांगल्या नेतृत्वाला आवश्यक ही गुणांची यादी आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनातच नाही तर सार्वजनिक जीवनातही जो यांच्या आधारे काम करेल त्याला नेतृत्वाच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील.