आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणिताचा अभ्यास कसा करावा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणित हा विषय तुमचा नावडता आहे का? गणिताची समीकरणे सोडवताना तुमच्या कपाळावर आठ्या येतात का? गणित विषय कच्चा असल्यामुळे तुमच्या एकूण टक्केवारीत फरक पडेल यामुळे तुम्ही निराश झाले आहात का? आता वेळ आली आहे ती या नकारात्मक विचारांच्या वादळातून सहीसलामत बाहेर येण्याची. गणिताचा अभ्यास कसा करावा, याबाबत मी काही टिप्स देणार आहे, ज्याचे नियमित पालन केले गेले तर गणित हा विषय तुमचा आवडता तर बनणारच आहे. पण त्याचबरोबर त्यात तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवण्यातही नक्कीच यशस्वी व्हाल.

- गणित शिकणे म्हणजे निरीक्षण करणे नव्हे : वर्गात बसून फक्त शिक्षकांचे व्याख्यान ऐकून तुम्ही गणित विषय कधीच शिकू शकत नाही. त्याकरिता शिकण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला पूर्णत: सामील व्हावे लागते. शिक्षक प्रकरण शिकवत असताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतात त्या लक्षपूर्वक ऐकून त्यांच्या नोट्स बनवणे आवश्यक असते. त्याचबरोबर घरी जाऊन त्याच दिवशी त्या प्रकरणाचा सराव करणे आवश्यक असते.

- संकल्पनांचा पाया जाणून घ्या : महत्त्वाच्या सनसनावळी, घटना यांचे पाठांतर करून तुम्ही इतिहासासारख्या विषयात उत्तीर्ण होऊ शकतात. पण गणितांमध्ये नुसती सूत्रे पाठ करून गणिते सोडवता येत नाही. पाठांतराबरोबरच त्या सूत्रांचा वापर कोणत्या पद्धतीने करावा हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. बर्‍याच सूत्रांना काही मर्यादा असतात, त्याचेही आकलन होणे आवश्यक.

- नवीन प्रकरण शिकवताना दिल्या जाणार्‍या सूचना : गणिताच्या तासामध्ये कोणतेही नवीन प्रकरण शिकवले जात असताना, सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये शिक्षक आपल्याला त्या प्रकरणाविषयीच्या महत्त्वाच्या सूचना, गोष्टी सांगत असतात त्या वेळी विशेष लक्ष द्या.

- नोट्स बनवा : बर्‍याच वेळा शिक्षक साध्या पद्धतीने समीकरणे सोडवायच्या पद्धतीही सांगत असतात. शिक्षक फळ्यावर सोडवत असताना समीकरणे आपल्याला खूप सोपी वाटतात, मात्र घरी गेल्यावर जेव्हा आपण स्वत: सोडवायला जातो, तेव्हा मात्र फारच कठीण वाटतात. त्या वेळी तुम्ही फळ्यावरून उतरवलेली माहिती उपयोगी पडते. तेव्हा शिक्षक शिकवत असताना लक्ष देऊन ऐका पण त्याचबरोबर नोट्ससुद्धा लिहिण्याची सवय लावा. सुरुवातीला दोन्ही एकत्र करणे कठीण जाईल. परंतु सरावाने तेही सोपे वाटेल.

- प्रश्न विचारा : शिक्षक नवीन प्रकरण शिकवत असताना, जर तुमचा गोंधळ उडत असेल, तुम्हाला समजत नसेल तर त्याच वेळी शिक्षकांना प्रश्न विचारा आणि तुमच्या समस्याचे निराकरण करा. कारण प्रकरणाचा पायाच समजला नाही तर प्रकरणातील समीकरणे सोडवणे कठीण जाईल.

- दुसरे प्रश्न विचारत असताना लक्ष द्या : वर्गात जर इतर विद्यार्थी शिक्षकांना काही प्रश्न विचारत असतील तर तेही लक्षपूर्वक ऐका. कारण त्या विद्यार्थांना पडलेले प्रश्न, शंका, तुम्ही स्वत: जेव्हा समीकरणे सोडवायला जाल, तेव्हा तुम्हालाही उद््भवू शकतात.

- व्याख्या, सूत्रांची कार्ड बनवा : महत्त्वाच्या व्याख्या, सूत्रे यांची कार्डे बनवा. येता, जाता, जेव्हा केव्हाही वेळ मिळेल तेव्हा ती वाचा. म्हणजे ती सदैव तुमच्या स्मरणात राहील व त्याचे पाठांतर सहजरीत्या होईल.

- सराव सराव सराव : शिक्षकांनी शिकवलेल्या समीकरणांचा घरी गेल्यावर त्याच दिवशी सराव करा. म्हणजे समीकरणे सोडवताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी त्याचबरोबर समीकरणे सोडवायचे प्रत्येक पायरी तुमच्या ठामपणे लक्षात राहील. सतत सराव केल्यामुळे जी समीकरणे सुरुवातीला आपल्याला कठीण वाटत असतात ती किती सोपी आहेत हे जाणवायला लागते. गणित म्हणजे सराव, सराव म्हणजे गणित हेच ध्यानी ठेवा. सरावामुळेच गणितात नैपुण्य मिळू शकते.

- चिन्हानांही महत्त्व : गणित वाचन म्हणजे कादंबरी वाचण्यासारखे नसते. प्रत्येक पायरीचा अर्थ कळणे आवश्यक असते. गणितामध्ये चिन्हांनाही फार महत्त्व असते. या चिन्हांचा अर्थ शिक्षक शिकवत असताना लक्ष देऊन समजून घ्या.

- 100 टक्क्यांचा ध्यास घ्या : सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘मी गणितात 100% मिळवणारच’ असे मनाशी ठाम ठरवा. कारण आपल्या प्रत्येक कृतीत महत्त्वाचा असतो तो सकारात्मक आशावाद. लक्षात ठेवा, आपले विचारच आपल्या कृतीची दिशा व गती ठरवत असतात. तेव्हा फक्त पास होण्यापुरते गुण गणितात मिळाले म्हणजे झाले, हा विचार मनातून मुळानिशी काढून टाका. अगदी तुमचा विषय नावडता किंवा कच्चा असला तरी या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात नव्या जोमाने, नव्या उत्साहाने, नव्या पद्धतीने करून तर बघा.

smit.kelkar@gmail.com