आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्री अपयशाशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपयशासारखा चांगला मित्र शोधूनही सापडणार नाही.
- एक सुविचार.


मैत्रीच्या व्याख्येनुसार खरा मित्र तो असतो जो संकटात तुमच्या कामाला येतो. तुमच्या अडचणीत तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा योग्य तो सल्ला देतो. भविष्यातील संकटाविषयी सावध करतो आणि तुम्हाला कायम अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रेरित करतो. मैत्रीच्या या व्याख्येत अपयश चपखलपणे बसतं. बहुसंख्य लोकांना अपयशाची भीती वाटत असते. ही भीती घालवायची असेल तर तिच्याशी मैत्री करणं हा सर्वांत चांगला उपाय आहे. अपयशाशी मैत्री करणं ही संकल्पना जरा विचित्र वाटत असली तरी त्यातील अर्थ समजून घेतला तर एका चांगल्या मैत्रीची सुरुवात होऊ शकते. कोणत्याही कामात आपल्याला यशाची जशी अपेक्षा असते तशीच अपयशाची भीतीही असते. जेव्हा यशाची फाजील खात्री असते तेव्हा आपण बेसावध राहून त्या कामाचा विचकाच होण्याची शक्यता जास्त असते, पण तेच जर आपल्याला अपयशाची भीती वाटत असेल आणि त्याचा आपण सकारात्मक विचार केला तर आपण हे अपयश न येण्यासाठी सावधगिरी बाळगू शकतो. अपयश टाळण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न आपण करतो. आणि हे सारं आपण अपयशाच्या अस्तित्वामुळे करतो. अपयश आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतं. अगदी ते येण्याच्या आधी आणि ते आल्यानंतरही.
एवढं केल्यानंतरही अपयश आलंच तर त्यामुळे आपली मन:शांती गमावण्यात काही अर्थ नसतो. स्वत:ला किंवा नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या अपयशाची जरा लक्षपूर्वक चिकित्सा केली तर आपल्या लक्षात अनेक गोष्टी येतात. या सर्व आपल्याला यशाच्या दिशेने नेणा-या मार्गदर्शक खुणा असतात.
अपयशाची धास्ती बाळगून बहुतांश लोक काम करणंच टाळतात आणि अपयशी होतात, पण यश हे त्यालाच मिळतं जो प्रयत्न करतो. सहजपणे यश ज्याला मिळतं त्याच्या मनात त्या यशाविषयी आदर उरत नाही. त्यातून तो काही शिकत नाही, पण ज्याला अपयश लाभतं तो मात्र त्यावर विचार करतो. ज्या गोष्टी त्याला माहीत नव्हत्या त्या शिकण्याची प्रेरणा या अपयशातून त्याला मिळते. त्याच्यातील अनेक सुप्त गुणांचा आणि क्षमतांचा कस या कसोटीच्या काळात लागतो आणि त्याच्यात सुधारणा होते. अपयश मिळालेली व्यक्ती कधी अतिआत्मविश्वासात वाहून जात नाही. आपल्या यशाबद्दल त्यांना सार्थ अभिमान आणि आदर वाटत असतो. अन्य लोकांनाही ती मदत करण्यात पुढे असते. कारण अपयश टाळता न येणारी गोष्ट आहे याचा त्यांना अनुभव आलेला असतो. अपयशाशी मैत्री केली तर तो यशाची गुरुकिल्ली तुम्हाला देतो.

सावधान ...
०अपयशाला कारणीभूत ठरलेल्या गोष्टी लक्षात घ्या. त्यांची नोंद करा आणि त्यावर उपाय शोधा.
० अपयशाच्या भीतीने काम करणं टाळू नका. प्रत्येक अपयश तुम्हाला यशाच्या जवळ नेत असतं.
० तुम्ही नेटाने काम करीत राहिलात तर प्रत्येक वेळी पहिल्यापेक्षा अधिक उत्तम रीतीने तुम्ही काम करू शकाल.
० तुमच्या अपयशाकडे एक संधी म्हणून पाहा. स्वत:ला सुधारण्याची व यशासाठी प्रेरित करणारी संधी म्हणून.
०संभाव्य अपयश टाळण्यासाठी आपण अधिक सावध राहून मेहनत करतो.
० आपल्या कामातील दोष हुडकून ते दूर करतो.
० मुख्य म्हणजे पर्यायी योजना तयार ठेवतो.