आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर: लढा अपयशाविरुद्धचा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांना करिअरमध्ये अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागतं. बरेचदा वर्षभर अभ्यास करूनही ऐन वेळेवर तब्येत बिघडल्यामुळे मार्कांवर परिणाम होतो किंवा कुठेतरी काहीतरी घडतं आणि मनासारखे मार्क्स मिळत नाहीत. पुढे आवडीचं कॉलेज किंवा कोर्सची पण तीच रड होऊ शकते. आवडीचं कॉलेज मिळालं नाही तर नुकसान तेवढंसं काही होत नाही, पण ‘कोर्स’च जर मुळात आवडीचा नसेल तर पुढचं सगळं गणित चुकत जाऊन बाकी मात्र शून्य राहण्याचीच वेळ येते. बरं हे सगळे पाडाव पार करून नोकरी जरी चांगल्या पॅकेजची मिळाली तरी तिथेही अचानक एखादी ‘प्रोसेस’ किंवा भारतामधील त्या कंपनीचं काम थांबवावं तरी लागतं किंवा अन्य देशांमध्ये हलवावं लागतं अशा वेळी होणारी निराशा किंवा खिन्नता टाळता येतच नाही का? जरूर येते. फक्त थोडासा वेगळ्या वाटेवरचा विचार करणं अपेक्षित असतं. ‘थिंकिंग आऊट ऑफ द बॉक्स’ असं याला म्हणतात. म्हणजेच पारंपरिक, ठरलेल्या, साचेबद्ध एका विशिष्ट चौकटीत विचार न करता थोड्या वेगळ्या पद्धतीने करून बघायचा. कारण आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये जर विद्यार्थी नापास झाला तर किंवा त्याची चांगली चालत असलेली नोकरी गेली तर किंवा व्यवसायामध्ये यश नाही मिळालं तर काय करावं किंवा कसं धीराने सामोरं जावं असा कुठलाच धडा नव्हता म्हणून मग विद्यार्थ्यांनी तो वाचून, क्लासमधून मिळालेली उत्तरं पाठ करून, परीक्षेत ती लिहिण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

करिअरच्या या अशा महत्त्वपूर्ण टप्प्यांमध्ये "चेंज मॅनेजमेंट' अर्थात "बदलाचं व्यवस्थापन' फार महत्त्वाचं ठरतं. आपल्या जवळ असलेले स्कील्स किंवा कला, कौशल्ये, गुण हे म्हणजे संपत्ती आहेत, असं समजून त्यांचं जतन केलं गेलं तर अचानक बदलेल्या परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ अर्थात एम.सी.ई.डी., महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅड इन्डस्ट्रीज (एम.सी.सी.आय.), इंडियन मर्चंट चेंबर्स, जागतिक व्यापार संघटना अर्थाज डब्ल्यू.टी.ओ. अशा कितीतरी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवरील संस्था व्यवसायाभिमुख अनेक उपक्रम राबवत असतात. अगदी जॅम, जेली, लोणची कशी करायची किंवा टिकवायची इथपासून ते त्यांची आयात-निर्यात कधी करावी इथपर्यंतची माहिती आपल्याला मिळू शकते, याचा आपण निश्चित उपयोग करून घेऊ शकतो. विमाक्षेत्र आज खूप वेगाने पसरत आहे, अशा वेळी बोलक्या, संवाद कौशल्य असणाऱ्या, जनसंपर्क चांगल्या असणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एजंट होण्याची सुद्धा एक करिअरची वेगळी वाट ठरू शकते.

मल्टी टास्क अ‍ॅप्रोच हवा
व्यायामाची आवड असलेल्यांसाठी आणि त्या विषयांतील शिक्षण, प्रशिक्षणाची जोड असलेल्यांनी पार्ट टाइम जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम करावयास हरकत नाही. अकाऊंटस्, फायनान्स, टॅक्सेशनमधील लोकांनी सल्लागार म्हणून काम मिळवायला सुरुवात करावी. कारण ‘मल्टी टास्क’ अ‍ॅप्रोच ही सध्याच्या काळाची गरज आहे.केवळ एकाच नोकरीच्या भरवशावर बसून जर दुर्दैवाने काही बदल झाले तर दुसरी बाजू भक्कम असावी हाच उद्देश !

(vilasgavraskar@yahoo.co.in)