आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णमूर्ती : एक परिचय, सुजाण पालकत्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुजाण पालकत्व हा शब्द आपल्याकडे खूप वेळा वापरून गुळगुळीत झाला आहे. पालकांसाठी खूप पुस्तके असतात. आता तर पालकांची प्रशिक्षणेही होतात. त्या सर्वांचा सारांश हाच असतो की, आपलं मूल आजच्या जगात यशस्वी करताना ते कसे कराल. मुलांना वाढवण्याच्या टिप्स त्यात असतात; परंतु कृष्णमूर्तींची पालकांविषयीची मांडणी मूळ गृहितकालाच आव्हान देणारी आहे. ते यशस्वी होण्याच्या कल्पनेलाच आव्हान देतात. ते विचारतात की, आपल्याला मुले कशासाठी हवीत हा प्रश्न आई-वडील आपल्याला कधी विचारतात का... आपले नाव पुढे चालावे, आपल्या इस्टेटीस वारस लाभावा एवढ्यासाठीच बहुतेकांना मुले हवी असतात. आपल्या समाधानाचे, आपली भावनात्मक गरज भागवण्याचे एक साधन अशीच मुलाकडे बघण्याची आपली दृष्टी असते. असे असेल तर आपल्या इच्छांचा, भीतीचा, आशांचा प्रक्षेप यापेक्षा आपल्या मुलांच्या अस्तित्वाला वेगळा अर्थ उरत नाही. ज्यामुळे द्वेष, लोभ यांचे बीजारोपण मुलांच्या मनात होते. असे चुकीचे शिक्षण आपल्या मुलांना देणारे आई-वडील आम्ही आमच्या मुलांवर प्रेमच करतो आहोत, असे म्हणत असतात. जे माणसा-माणसांत धर्म-वर्ग असे भेद निर्माण करतील, त्यातून युद्धाच्या आणि द्वेषाच्या धुमाळीशिवाय अन्य काहीच निर्माण होऊ शकत नाही. त्याला प्रेम कसे म्हणता...
कृष्णजी त्याच तीव्रतेने पालकांवर तुटून पडतात. ते मुलांना म्हणतात की, तुमच्या पालकांचे तुमच्यावर खरोखरी प्रेम असेल तर तुम्हांला भीतीचे कारण उरणार नाही. युद्धे होणार नाहीत, जगात दारिद्र्य राहणार नाही. समाजाकडून तुमचा किंवा तुमच्या भोवताली असलेल्या कोणाचाही नाश होणार नाही, अशी दक्षता ते घेतील. पालकांचे आपल्या मुलांवर खरे प्रेम असते तर जगात युद्धेच झाली नसती.... प्रेम नाही म्हणूनच गरीब व श्रीमंत हा भेद आहे. कृष्णमूर्ती इतक्या उंचीवरून पालक-बालक नात्याकडे बघतात. त्यांच्या दृष्टीने पालक ज्याला प्रेम म्हणतात ते मालकी हक्काचेच दुसरे नाव आहे. अपेक्षांचेच ते प्रक्षेपण आहे. कृष्णजी प्रेमाची, व्यवहारी नात्याची ही भाषाच बदलून टाकतात. ते म्हणतात, खरे प्रेम हे आजच्या संघर्षमय समाजात आमूलाग्र क्रांती घडवून आणण्यासाठी लागणारी जीवनदृष्टी देते. आपल्या मुलावर प्रेम करणे म्हणजे त्यांचे मन समजावून घेणे, ज्यायोगे त्यांची मने संवेदनशील होतील असे शिक्षण त्यांना देणे, त्यांच्या व्यक्तित्वात सुसंवाद होईल, असे शिक्षण त्यांना देणे होय.
हे वाचल्यावर लक्षात येते की, आपल्या संस्कार, प्रेमाच्या कक्षा किती सीमित आहेत. या पातळीवर आपण आपल्या मुलातील परिवर्तन कधी बघतच नाही. जगातील शांती, प्रेम, सद्भाव निर्माण करण्याची त्याची जबाबदारी आहे, असा आपण विचारच करत नाही. आपण केवळ आजच्या समाजातील प्रतिष्ठित पदांवरच मुलांनी जावे यासाठी धडपडत असतो; पण कृष्णमूर्तींच्या ते गावीही नाही. ते वैश्विक कलहाच्या सोडवणुकीत पालक व मूल यांचे नाते बघतात. मुलाशी पालकाने कसे वागावे याविषयीही ते सांगतात. मुलाला समजावून घ्यायचे तर त्यात धिक्काराचा भाग त्यात येता कामा नये. मूल खेळताना, रडताना, जेवताना त्याचे निरीक्षण करायला हवे. त्याच्या सगळ्या लहरी भावभावनांचे अवलोकन करायला हवे. इतके संयमी वर्तन पालकांचे असले पाहिजे. एकदा युद्धात मूल गमावलेली आई कृष्णजींना भेटायला येते. तिचे सांत्वन करण्याऐवजी ते तिला म्हणतात की, ती स्वत:ला एका देशाची नागरिक देशभक्त मानते का... आणि जर तसे असेल तर तिच्या मुलाच्या मृत्यूला ती स्वत:ही अप्रत्यक्ष जबाबदार आहे. कारण या देशभक्तीच्या संघर्षानेच युद्धे निर्माण होतात. हे बघितल्यावर लक्षात येते की, पालक सर्व पूर्वसंस्कार भ्रमापासून मुक्त असतील तरच मुलांची मने बहरू शकतात. फक्त निरपेक्ष प्रेम करणे एवढेच पालकांनी करावे. ते म्हणतात, पालकांचे जर आपल्या मुलांवर खरे प्रेम असते तर समाज एका रात्रीत बदलला असता.
खलील जिब्रानचे शब्द आठवतात.
our children are not your children
They are the sons and daughters of lifes longing for itself They have come through you, not from you Give them love, not your thoughts