आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझाइन्स’ मधील करिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्याच्या करिअरला आकार मार्कांपेक्षा त्यांच्यामध्ये असणार्‍या सुप्त गुणांनी खूप चांगला येऊ शकतो. अर्थात असं ‘करिअर डिझाइन’ करण्यासाठी खूप चांगली कल्पनाशक्ती, आकलन शक्ती, सर्जनशीलतेची नितांत आवश्यकता असते. अशा सुप्त गुणांनी, कौशल्यांनी घडवलेले करिअर म्हणजे खरोखर आनंदच! कारण आपल्यामधील गुणांना, कौशल्यांना एक चांगलीच दिशा सापडलेली असते. बरेचदा नुसती दिशा माहीत असूनही फारसा उपयोग होताना दिसत नाही. ‘मार्ग’ कळायला हवा असतो. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ ही गुजरात, अहमदाबाद स्थित संस्था अशा हजारो विद्यार्थ्यांना ‘मार्ग’ दाखवण्याचं काम करते. इथे कोर्सेसची सुरुवातच मुळात बारावीनंतर करता येते. ‘डिझाइन्स’ मधील अनेकविध शाखांपैकी कुठल्या शाखेमध्ये आपला खरा कल आहे, हे ओळखण्यासाठी सुरुवातीचे दोन सत्र म्हणजे ‘फाउंडेशन प्रोग्रॅम’ असतो. या सत्रांमध्ये डिझाइन संदर्भात निरनिराळ्या शाखांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन आकलन करणे, ती कला समजावून घेणे, समजलेली कला प्रत्यक्ष स्वरूपात आणण्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करणे, मानवी भावनांचा, स्वभावांचा मेळ साधून डिझाइन निर्माण करणे. हे करत असतानाच कमीतकमी संसाधनांचा वापर व प्रदूषणाला आळा कसा बसवता येईल, याचाही विचार करण्यात येतो. एखाद्या प्रदेशातील किंवा राष्टÑातील संस्कृतीला साजेसा, तसेच हवामान, पर्यावरण आणि भौगोलिक रचनेला अनुसरून उत्तम काय घडवता येईल, याचा विचार करण्याची संपूर्ण संधी विद्यार्थ्यांना मिळते. आणि इथूनच त्यांच्यामधील वैचारिक प्रगतीला चालना मिळते. एखाद्या घटनेकडे बघण्याची एक वृत्ती तयार होते जी करिअर प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ‘जी.डी.पी.डी.’ अर्थात ‘ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन डिझाइन’ हा बारावीनंतर चार वर्षांचा कोर्स करता येऊ शकतो. यामध्ये सिरेमिक अँड ग्लास डिझाइन, एक्झिबिशन डिझाइन, फिल्म अँड व्हिडिओ कम्युनिकेशन, अ‍ॅनिमेशन फिल्म डिझाइन, फर्निचर अँड इंटेरियर डिझाइन, ग्राफिक डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, टेक्स्टाइल डिझाइन अशा अनेकविध शाखांमध्ये स्पेशलायजेशन करता येऊ शकते. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी फोटोग्राफी डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, स्ट्रेटेजिक डिझाइन, गेम डिझाइन, ट्रान्सपोर्टेशन अँड ऑटोमोबाइल डिझाइन, लाइफस्टाइल अक्सेसरीज डिझाइन, इन्फर्मेशन अँड इंटरफेस डिझाइनसारखे स्पेशलायझेशन उपलब्ध आहेत. अडीच वर्षांच्या पोस्ट ग्रॅजुएट प्रोग्रामसाठी मात्र त्या शाखेची पदवी असणे गरजेचे आहे. पुस्तकी विद्या, प्रात्यक्षिके, तसेच भरपूर प्रशिक्षणात्मक कार्यक्रम करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ही भारतामधील अग्रगम्य संस्था म्हणायला हवी. गेली सहा दशके ही संस्था कार्यरत असून भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रमाणित केलेली आहे. त्यामुळे इथून बाहेर पडल्यानंतर देशभरात अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शिवाय काही आंतरराष्टÑीय संस्थांचेही नामांकने या संस्थेला मिळाली असल्याने देशाबाहेरसुद्धा योग्य उमेदवाराला संधी उपलब्ध होऊ शकतात. गुजरातमधील अहमदाबाद , गांधीनगर तसेच कर्नाटकात बंगळुरू येथे संस्थेचे कॅम्पस आहेत. मात्र ग्रॅजुएट प्रोग्राम आणि पोस्ट ग्रॅजुएट प्रोग्रामसाठी सामायिक परीक्षा देणे महत्त्वाचे आहे. या परीक्षेमधील ‘मेरीट’ वर आधारितच पुढील कोर्सचा प्रवेश निश्चित करता येऊ शकतो. 2015-2016च्या वर्षातील कोर्सकरिता www.nid.edu US वर संपर्क साधावा.


vilasgavraskar@yahoo.co.in