आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता शिक्षणाची : कोयता...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भर दुपार
उसांवर कोयत्याचे सपासप वार
ती ओली बाळंतीण
दोनच महिन्यांच्या लेकराची
काजळ नसलेल्या डोळ्यांची
शेवरीला बांधलेल्या धडप्याचा झोळा
आणि त्यात वळवळता एक
मांसाचा लालभडक गोळा
लुकलुकत्या डोळ्यांनी कुठलं भविष्य बघत असेल या देशात...
कोयत्याच्या प्रत्येक घावाबरोबर
पाझरणारी तिची स्तनं
आणि घामाच्या थेंबाथेंबातून झरणारी
शतकानुशतकाची पिळवणूक
त्या बाईने करावी कशी
तिच्या आईपणाची जपणूक
उन्हातान्हात रापलेलं तिचं बाईपण
आणि ऊसचरख्यात पिळवटून गेलेलं आईपण
पोटाला कशाचीच पर्वा नसते
उसाच्या फडात नसतात बाळंतपणाची पथ्य
लेकरासाठी अंगाई किंवा बोबडे बोल
बर्‍याचदा ही लेकरं सरीतचं जन्म घेतात
आणि सहकाराच्या नावानं
पहिलंवहिलं भोकाड पसरतात...
सहकाराच्याही कानावर पडतं कधी कधी
या लेकरांचं भोकाड पसरणं
पण सहकार धूर्तपणानं
आपली बधिर बोटं कानात घालतं
मनातल्या मनात आनंदित होतं
एक नवा ‘कोयता’ जन्माला आला म्हणून...
सुरेश मोहिते
(कवी सुरेश मोहिते
इस्लामपूर जि.सांगली येथील
प्रसिद्ध ग्रामीण कवी आहेत)
1 एप्रिलला सक्तीच्या व मोफत कायद्याला 4 वर्षे पूर्ण झाली... आणि त्याचवेळी महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोड चालू आहे. वीटभट्टीवर विटा पाडल्या जात आहेत. दगडखाणीत दगड फोडले जाताहेत आणि हजारो बांधकामाच्या साइट्स सुरू आहेत. दिवाळीनंतर घराबाहेर पडलेले 30 लाखांपेक्षा जास्त मजूर जगायला बाहेर पडले आहेत... सोबत त्यांची 4 ते 5 लाख मुलं... यांच्या शिक्षणाला या 1 एप्रिलच्या सक्तीच्या शिक्षणानं एप्रिलफूल केलंय....
आमचीही मुलं खिजगणतीतही नाहीत... 8 कोटींपेक्षा जास्त मजूर देशभर दरवर्षी स्थलांतर करतात आणि सोबत अक्षरश: लाखो मुलं असतात, पण सक्तीच्या शिक्षणाचा कायदा या मुलांना अडवत नाही... शिक्षण जरी मोफत असले तरीसुद्धा या मुलांचे मोफत श्रम मालकांना ठेकेदारांना वापरायला मिळतात...तेव्हा शिक्षणाच्या सक्तीचा कायदा होऊनसुद्धा ही लाखो मुलं शिक्षणाच्या सुविधांपासून वंचित राहतात. आमचा शिक्षणाचा कायदा मात्र कागदावर यशस्वी असतो...
सहकारसम्राट, वीटभट्टीमालक, बिल्डर, दगडखाणमालक यांनाच ही मुले शिकावीत, असे वाटत नाही. त्यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्ट्रिकोन हा उपयोगितेचा आहे. केवळ या गरीब वर्गानेच नाहीतर त्यांच्या पुढच्या पिढ्यांनीही हेच करावे. हे जर शिकले तर मग ऊस कोण तोडणार...विटा कोण पाडणार असे अनेक प्रश्न या मालकांच्या मनात असतात. सहकारात या कामगारांना एक वस्तू म्हणून बघितले जाते. मजुराला मजूर न म्हणता ‘कोयता’म्हटले जाते. यातून मानसिकता कळते. बालशिक्षणाची आपण खूप चर्चा करतो. मेंदूचा जास्तीत जास्त विकास हा बालवयातच होतो, असेही आम्ही सांगतो, परंतु या वयातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना कसे वागविले जाते, याचे अत्यंत विदारक चित्र कवी रेखाटतो. महिला कर्मचार्‍यांना 6 महिने बाळंतपणाची रजा देणारे शासन या महिलांसाठी मात्र संवेदनशील नसते. त्या महिलांची परवड बालकांची हेळसांड रेखाटत ‘लुकलुकत्या डोळ्यांनी ते कुठले स्वप्न बघत असेल’, असा अस्वस्थ करणारा प्रश्नही कवी विचारतो. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत शूद्रांनी फक्त सेवाच करावी शिकू नये, असे उच्चवर्णीय म्हणायचे. तीच मानसिकता आजच्या उच्च आर्थिक वर्गाची व सत्ताधार्‍यांची आहे. हे उच्चवर्गीय आता सर्व जातींचे आहेत. तळातल्या माणसांनी पिढ्यान्पिढ्या तेच करत राहावे हीच मानसिकता आहे. ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत गरिबांच्या शिक्षणाची कोंडी फुटणार नाही, हेच कवी अत्यंत धारदार भाषेत सांगतो आहे. इतकी थेट आक्रमक आणि तरीही हळूवार कलात्मक असलेली ही कविता एक अस्सल कलाकृती आहे.

संकलन. हेरंब कुलकर्णी