आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोचूनही न फुटणारा फुगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवसाच्या पार्टीनंतर बच्चे कंपनीला फुगे फोडायला फार मजा वाटते. आज तुम्हाला टाचणी टोचली तरी फुगा फुटणार नाही असा एक खेळ शिकवणार आहे. साहित्य अगदी सोपे. फुगे, प्लास्टिकच्या किंवा लाकडी टूथपिक, पेट्रोलियम जेली (पायाला भेगा पडू नयेत म्हणून जे मलम लावतात तेसुद्धा चालेल), खराट्याच्या दोन पुरेशा लांबीच्या काड्या, टाचणी, सेलोफेन टेप.

प्रयोग - आधी फुगा फुगवा. फुगा तट्ट फुगवू नका. फुगा थोडा लवचिक राहायला हवा. त्याचे तोंड बांधा, म्हणजे हवा बाहेर जाणार नाही. खराट्याच्या काडीवर पेट्रोलियम जेली लावा. खराट्याच्या काडीऐवजी लोकर विणण्याच्या सुईचासुद्धा उपयोग करता येईल. आकृतीत दाखवल्याप्रमाणे हवा भरलेल्या फुग्याच्या खालील बाजूने फुग्यामध्ये घुसवलेली काडी बांधलेल्या तोंडाजवळून बाहेर यायला हवी. काडी फुग्यामध्ये शिरताना अडथळा येत असल्याचे लक्षात आल्यास काडी हळूहळू फिरवून फुग्यामध्ये घाला. आता आश्चर्य वाटण्याची पाळी तुमची आहे. फुगा फुटत कसा नाही बरे! फुगा नूडलसारख्या लांब रेणूंनी बनलेला आहे. पूर्ण नूडलचे पाकीट गरम पाण्यात शिजवले तर नूडल न मोडता परस्परांना चिकटलेले राहतात तसे फुग्याचे रेणू चिकटलेले असतात. हवा भरल्यानंतर ते ताणले जातात. दोन रेणूमधील ताण अधिक झाल्यासच फुगा फुटतो. हाच प्रयोग तुम्ही फुग्याच्या रुंदीच्या बाजूने करायचा प्रयत्न केल्यास तेथे असलेले रेणू कमी ताणले जात असल्याने फुगा सहज फुटतो. या भागातून फुगा न फोडता सुई घालायची असल्यास फुगलेल्या फुग्याच्या बाजूवर दोन चौरस सेंमी आकाराचा सेलोफेन टेप चिकटवा. टेप पारदर्शक असल्यास लांबून तो दिसणार नाही. टेप लावलेल्या भागामधून सुई घाला. सुई सहज आत जाईल, तीसुद्धा फुगा न फोडता. या ठिकाणी असलेला टेप फुग्याच्या रेणूना फुटण्याएवढे ताणू देत नाही. त्यामुळे सुई फुग्यामध्ये गेली तरी फुगा तसाच राहील.