आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाळ विरघळवणा-या समुद्र काकड्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाळ म्हटले की आयुर्वेदतज्ज्ञाला त्यामधील गुण जाणवू लागतात, भूगोल आणि पर्यटनात रस असणा-यांना प्रवाळ बेटे लक्षद्वीप किंवा ग्रेट बॅरिअर रीफ (ऑस्ट्रेलिया) आठवू लागतात, तर हवामान बदलाचा ऊहापोह करणा-यांना त्याचे रंगहीन होणे सतावते. प्रवाळांचा प्रत्यक्ष अभ्यास करणा-या तज्ज्ञांच्या मते मात्र प्रवाळ ही एक अत्यंत वैविध्यपूर्व परिसंस्था असून, जगातील एकूण जैववैविध्याच्या जपणुकीकरिता ती फारच महत्त्वाची आहे. प्रवाळ हे काही निर्जीव खडक नसून जीव आहेत ते त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार स्वत:ला बदलत असतात. त्यामुळेच सागरी पाण्याच्या गुणधर्मात होणारा सूक्ष्म बदलदेखील ते लगेच टिपतात. म्हणूनच ब-याचदा सागरांच्या प्रकृतीचे द्योतक म्हणूनच त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांना जणू महासागरांच्या वर्षावनांप्रमाणेच वागणूक मिळते.
समुद्रातील वर्षावने म्हणून प्रवाळ भित्ती (कोरल रीफ) ओळखले जातात.
जगातील सर्वात मोठी प्रवाळ भित्ती 2000 किमी लांबीची असून ‘ग्रेट बॅरिअर रीफ’ या नावाने सुपरिचित असून ती ऑस्टेÑलियन किना-यावर आहे.
जगातील किमान एकचतुर्थांश प्रवाळ पूर्णपणे नष्ट झाले आहेत.
प्रवाळ भित्तींवर हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम होत असून खते, प्रदूषक आणि मासेमारीसाठी डायनामाइटसारख्या रसायनांमुळे त्यांची हानी प्रामुख्याने होताना दिसते.
तेल उत्खननाकरिता वा परिवहनाकरिता इंजिन्सची सतत ये-जा सुरू राहते, त्यामुळे तसेच पाण्याखालील अन्वेषणामुळे प्राण्यांचे ध्वनी प्रवाळांना ऐकून आल्यामुळेदेखील प्रवाळांवर वाईट परिणाम होतो.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे महासागरांचं आम्लीकरण होत असल्यामुळे प्रवाळ भित्ती आणि इतर सागरी प्राणीदेखील संकटग्रस्त बनत आहे. कार्नेजी इन्स्टिट्यूशन फॉर सायन्सच्या केनेथ श्निडर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या एका गटाने केलेल्या संशोधनांतर्गत समुद्र काकडी (सी ककुम्बर)च्या यासंदर्भातील भूमिकेचे विश्लेषण करण्यात आले. ग्रेट बॅरिअर रीफच्या काही क्षेत्रात हे संशोधन करण्यात आले. त्यानुसार त्यांच्या पचनक्रियेमार्फत आजूबाजूच्या प्रवाळांच्या विरघळण्याच्या प्रक्रियेत जवळपास निम्मा वाटा उचलत जातो. रात्रीच्या वेळी होणा-या विरघळण्याच्या प्रक्रियेत हे घडते. हे संशोधन ‘जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च’ या संशोधन नियतकालिकात नुकतेच प्रसिद्ध झालेय.
प्रवाळांची निर्मिती कॅल्शियम कार्बोनेट (उंउङ्म3) च्या जैविक डिपॉझिशनद्वारे होते. प्रवाळाच्या अवतीभवती आणि त्यावर राहणा-या ब-याच सागरी जीवांमुळे एकतर त्यांचा नाश होतो वा निर्मिती होण्यास मदत होते. त्यामुळेच कॅल्शियम कार्बोनेटचं संतुलन राहणं महत्त्वाचं. जेव्हा हे संतुलन बिघडतं तेव्हा प्रवाळांची वाढ खुंटते आणि मग त्यांचा पाया डळमळीत होण्यास सुरुवात होते. प्रवाळांची कार्बोनेट जमा करण्याची आणि वाढण्याची क्षमता पूर्णपणे समजावून घेण्याकरिता या प्रक्रियेत असणारी इतर सागरी जीवांपैकी विविध घटकांची भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वातावरणात वाढत जाणा-या कार्बन डायॉक्साईड प्रमाणामुळे आम्लीकरणाच्या प्रक्रियेतून मिळणारं कार्बोनेटचं प्रमाण घटतं.
प्रवाळ पर्यावरणातील समुद्र काकडीची भूमिका नेमकी काय ते जाणून घेण्याकरिता संशोधन गटानं प्रयत्न केले. ऑस्टेÑलियाच्या ग्रेट बॅरिअर रीफमधील वन ट्री आयलंड भोवतालच्या वन ट्री रीफच्या विरघळण्याचा आणि वाढीचा त्यांनी अभ्यास केला. त्या ठिकाणी त्यांना समुद्र काकडीचं बरंच मोठं प्रमाण आढळून आलं. काही समुद्र काकड्या त्यांनी गोळा केल्या आणि मग अ‍ॅक्वेरियममध्ये त्यांना ठेवले. त्यांच्या पचनसंस्था आणि प्रक्रियेतून बाहेर पडणा-या वाळू आणि इतर पदार्थांचा समुद्री पाण्यावरील प्रभाव तपासून पाहिला. अध्ययनाच्या दुस-या टप्प्यात त्यांना असे आढळून आले की प्रवाळ भित्ती रात्रीच्या वेळी विरघळतात. या प्रक्रियेत समुद्र काकड्यांची प्रमुख भूमिका आहे. ते कार्बोनेटमधील सेंद्रिय पदार्थांवर जगतात. यादरम्यान त्यांच्या पचनसंस्थेद्वारे कार्बोनेटचं प्रमाण कमी करणारी विरघळवणारी आम्ल तयार होतात. मग ही विरघळलेली खनिजे आजूबाजूच्या पर्यावरणात सोडली जातात. त्यामुळे रात्रीच्या वेळी विरघळणा-या प्रवाळांपैकी निम्मी प्रवाळे विरघळतात हे संशोधकांच्या गटाला आढळून आले.
कोळसा, खनिज तेल आणि वायू (गॅस)च्या ज्वलनामुळे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते. पुढे तो महासागरांत शोषला जातो. त्यामुळे त्यांचे आम्लीकरण होते. त्यामुळे प्रवाळांची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. प्रवाळांची वाढ मंदावल्यामुळे एकूणच प्रवाळांमधील कॅल्शियम कार्बोनेटच्या बजेटकरिता समुद्र काकडीच्या पोटातील विरघळलेले कॅल्शियम कार्बोनेटच्या बजेटकरिता समुद्र काकडीच्या पोटातील विरघळलेले कॅल्शियम कार्बोनेट अधिकच महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवाळ भित्तींचे एकूण आरोग्य उत्तम राहण्याकरिता समुद्राचे आम्लीकरणास ‘मूंहतोड जवाब’ देण्याच्या दृष्टीने सागराची बफर क्षमता वाढविण्याचे कामदेखील ते पार पाडतात.
हे सर्व संशोधन मूर फाउंडेशनच्या मदतीतून साकारले असून याविषयी अधिक माहिती स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या वेबसाइटवर मिळू शकते. संपर्कासाठी kennysch@stanford.edu या ई-मेलवर श्निडर यांच्याशी पत्रव्यवहार करता येईल. निसर्गविषयक कार्यक्रमाचे प्रसिद्ध सादरकर्ते सर डेव्हिड अ‍ॅटेनबरो म्हणतात, ‘त्यांनी सागरामध्ये बुडी मारून अद्भुत नैसर्गिक सौंदर्यांची अनुभूती देणारी प्रवाळ जवळून पाहिलीत त्यांची आणि इतरांचीही नैसर्गिक जगाबाबत विशेष जबाबदारी आहे. पुढच्या पिढ्यांकरिता आपल्या नातवंडांकरिता, आपल्या पतवंडांकरिता खास नैसर्गिक जबाबदारी आहे.’
shailesh.malode@gmail.com