आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'गोष्ट सांगण्याची कला महत्त्वाची...\' (दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिलं पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचताना तब्बल ४७ प्रकाशकांचा नकार सहन करावा लागला. पण हा अडथळा पार झाला आणि ‘द रोझाबेल लाइन’, ‘चाणक्याज चाण्ट’, ‘द क्रिष्णा कि’ अशी एका पाठोपाठ एक सर्वाधिक खपाची पुस्तकं अश्विन सांघी यांनी लिहिली. आज त्यांचं नाव क्रॉसवर्ड बेस्टसेलरच्या यादीत आहेच, पण फोर्ब्स मासिकाने प्रकाशित केलेल्या शंभर सेलेब्रिटींच्या यादीतही त्यांचे नाव मानाने झळकत आहे... दिव्य मराठी, राजहंस प्रकाशन आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित नाशिक येथील लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये झालेल्या ‘बुक किपर टु बुक रायटर’ या सत्रात सांघी यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. त्याचाच हा गोशवारा...

पुराण आणि ऐतिहासिक व्यक्ती-प्रसंगांचा आधार घेऊन वर्तमानातले नाट्य उलगडणाऱ्या चित्तथरारक कथा हे लेखक अश्विन सांघी यांचे ठळक वैशिष्ट्य. त्यातही कथाकथनाची त्यांची शैली अत्यंत मनोवेधक, वाचकाला अक्षरश: गुंगवून टाकणारी. हाच धागा पकडत ‘बुक किपर टु बुक रायटर’ या सत्रात सांघी बोलते झाले. पुस्तक संग्रहाची गोडी लागलेला वाचक ते वाचकप्रिय लेखक, असा रोमहर्षक प्रवास त्यांनी त्यांच्या रसाळ कथेप्रमाणेच उलगडला. म्हणाले, ‘प्रत्येक माणसाची एक वेगळी कथा असते. ती त्याला मांडता आली पाहिजे. किंबहुना, लििहण्याच्या प्रतिभेपेक्षा अंगी कथा सांगण्याची कला असणं महत्त्वाचं. शेवटी, ही कलाच तुम्हाला वाचकांच्या अधिक जवळ नेते.’
सांघी यांचं म्हणणं साहित्य निर्मितीची रूढ चौकट नाकारणारं. परंतु ते म्हणतात, हा आत्मविश्वास त्यांच्यात आला, तो त्यांच्या आजोबांमुळे. सांघी यांच्या घरात वातावरण व्यापार-व्यवसायाचे. पुस्तके ही विद्वत्ता दाखवण्यासाठी शेल्फमध्ये सजवून ठेवायची असतात, असे त्यांचे मुनीमजी नेहमी सांगायचे. पण इंदोरहून आजोबा नेहमी पुस्तकं पाठवायचे, त्यातूनच त्यांना वाचनाची गोडी लागली.

लेखकाच्या गोष्ट सांगण्याच्या तंत्राने त्यांना भुरळ घातली. आपणही हेच आपले बलस्थान बनवायचे, असे त्यांनी मनोमन ठरवले आणि लिहिण्यासाठी तुम्ही जन्मजात लेखक असण्यापेक्षा तुमच्याकडे गोष्ट सांगण्याची कला आहे का, हे ओळखा आणि लिहितं व्हा, असं स्वत:ला बजावून सांघींनी पुस्तक लिहायला घेतलं. मात्र पुस्तक लिहिण्यापेक्षा ते प्रकाशित करणं किती अवघड असतं, हेही कालांतराने त्यांना कळलं. पहिलं पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचण्याआधी तीन वर्षांत तब्बल ४७ प्रकाशकांचा नकार त्यांना पचवावा लागला. मात्र, हे अग्निदिव्य पार पडलं आणि अश्विन सांघी नावाचा विलक्षण ताकदीचा लेखक साहित्यविश्वात संचार करता झाला. खरं तर, उद्योजक आणि लेखक अशा दोन्हीही भूमिकांत काही काळ वावरलेल्या अश्विनना वाचकांना नेमकं काय पाहिजे, त्यांची आवड-निवड काय, याची अचूक नाडी सापडली. आपण लिहिलेले साहित्य वाचकांपर्यंत कसे पोहोचावे, यासाठी आवश्यक असलेले मार्केटिंग तंत्रही गवसले आहे. प्रारंभी म्हणजे, २००७च्या सुमारास आपण लिहिलेल्या पुस्तकांना कसा वाचक प्रतिसाद मिळतो, हे जाणून घेण्यासाठी स्वत: अश्विन या दुकानातून त्या दुकानात अक्षरश: फेऱ्या मारत असे. अश्विन सांघी नावाच्या एका मोठ्या लेखकाची पुस्तके आपल्या दुकानात आली आहेत, ती वाचकांना द्या, बेस्ट सेलरच्या शेल्फमध्ये ठेवा, असा प्रेमळ आग्रह दुकानदारांकडे धरत असे. याच प्रयत्नांमुळे नऊ वर्षांच्या संघर्षानंतर त्यांचे बेस्ट सेलर होण्याचे स्वप्नही साकार झाले. इथे, ‘माझे पुस्तक लिहून झाले. आता पुढचे काम प्रकाशक- वितरकांनी करायचे आहे’, असा संकुिचत विचार करणाऱ्या नवोदित लेखकांना अश्विन सांघी यांनी एक प्रकारे कानमंत्रही दिला.

श्रीकृष्णापासून कर्णापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवे आणि चाणक्यापर्यंत अनेक पौराणिक-ऐतिहासिक पात्रांना वाचकांनी डोक्यावर घेतले आहे. पौराणिक पात्रांच्या आधारे वर्तमानाशी नातं सांगणारी कथा सांगण्याचा विदेशी भाषेतला प्रवाह आता अश्विन सांघींसारख्या भारतीय तरुण इंग्रजी लेखकांनी पुरेशा ताकदीनिशी भारतात रुजवला आहे. मात्र, ४७ वेळा प्रकाशकांनी नकार दिल्यानंतर तुमचा आत्मविश्वास कमी झाला नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना अश्विन म्हणाले, ‘माझ्या खोलीत जगातल्या बेस्ट सेलर लेखकांची यादी लावली होती. त्यांना किती प्रकाशकांनी नाकारले, याचा आकडा लिहिला होता. १६, २०, ३३ असे ते आकडे होते. इतक्या श्रेष्ठ लेखकांना प्रथम नाकारण्यात आले. माझेही तसेच होईल, असे म्हणून मी माझ्या मनाची समजूत काढत होतो. जन्मजात कोणी लेखक नसतो. माझ्या मते, लेखक होण्यासाठी प्रतिभा असणेदेखील गरजेचे नाही. मात्र कथा सांगण्याची कला आपल्याकडे असायला हवी. ही कला आपल्याकडे असेल तर आपली कथा वाचकांना आवडते. हेच तंत्र मी माझ्या लेखनात ठेवले आहे.’

सरतेशेवटी, ‘उद्योगाची पार्श्वभूमी असणारा मी लक्ष्मीचा भक्त होतो. ज्या ठिकाणी लक्ष्मी असते, त्या ठिकाणी सरस्वती अधिक काळ टिकत नाही, असे म्हणतात. मात्र या दोघींना एकत्र आणणारा गणपती आपण आपल्यात आणू शकलो, तर या लक्ष्मी आणि सरस्वतींना एकत्र ठेवणे सोपे होईल. आणि तेच करण्याचा मी प्रयत्न केल्याचे नम्र उद‌्गार सांघी यांनी काढले आणि उपस्थितांनी त्यांच्यातल्या पारदर्शी आणि प्रामाणिक अभिव्यक्तीला मनोमन दाद दिली.
संकलन : मंदार जोशी
बातम्या आणखी आहेत...