आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Rasik Article About War And Robot Solider

युद्धभूमीवरचा यांत्रिक सैनिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणाही देशाने कुणाविरोधात जाहीरपणे युद्ध पुकारलेले नसले तरीही आंतरराष्ट्रीय दहशतवाद अमेरिका-रशियासारख्या महासत्तांनाही आता जुमानेनासा झाल्यामुळे या घटकेला अवघे जग युद्धसदृश परिस्थितीत वावरताना दिसत आहे. मध्य आणि पूर्व आफ्रिका बाको हरामसारख्या वांशिक टोळ्यांच्या ताब्यात गेला आहे. मध्य पूर्वेत ‘आयसीस’ सारख्या दहशतवादी संघटना आपले बस्तान बसवू पाहताहेत. पॅलेस्टाइनची हमास ही संघटना आणि इस्रायलचे लष्कर यांच्यातल्या संघर्षात गाझा पट्टीत दरदिवशी भीषण मानवी संहार घडून येत आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान कधीचेच ज्वालामुखीच्या तोंडावर आहेत. अमेरिका-युरोपची फिकीर न करता मध्य आशियालगतच्या चेचन्या, युक्रेन आणि क्रिमियावर ताबा मिळवण्यासाठी रशियाचे सातत्याने हिंसक प्रयत्न सुरू आहेत. धर्म आणि राष्ट्रभक्तीच्या नावाखाली एका बाजूला जगभर हिंसेचे तांडव सुरू असताना देशोदेशीचे युद्धतज्ज्ञ अत्याधुनिक शस्त्रास्त्र वापराच्या नवनव्या शक्यता तपासून पाहत आहेत.

आपल्या बाजूची मनुष्यहानी टाळत हवाई ड्रोन(अनमॅन्ड एरियल व्हेइकल) हा शत्रूला टिपण्यासाठीचा आतापर्यंतचा प्रभावी उपाय होता. मात्र, अमेरिका-ब्रिटन यासारखे युद्धसज्ज असलेले देश अनमॅन्ड ग्राउंड व्हेईकल(यूजीव्ही) म्हणजेच भूपृष्ठीय ड्रोनचा वापर करत शत्रूला नामोहरम करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजना आखत आहेत. त्याच योजनेचा भाग म्हणून अलीकडेच ब्रिटनने तब्बल 60 ‘टेरियर्स’ नावाच्या मानवरहित वाहनतंत्राची खरेदी केली आहे. ही वाहने शत्रूने जमिनीखाली पेरलेले सुरुंग शोधणे, मार्गातले अडथळे दूर करणे आदी कामे करतात. यात मनुष्यहानी टाळणे शक्य होतेच, पण सुरक्षित ठिकाणांवरून या वाहनांचे रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने नियंत्रण करणेही शक्य असते.

ब्रिटनने यापूर्वीच इराक अणि अफगाणिस्तानात व्हिलबॅरो आणि पनामा या नावाचे यूजीव्ही परिणामकारकरीत्या वापरले आहेत.

जगात संरक्षणसज्जतेत अमेरिका-ब्रिटनखालोखाल इस्रायलचा क्रमांक लागतो. अलीकडेच ‘लॉयल पार्टनर’ या नावाने ओळख निर्माण झालेले ‘यूजीव्ही’ इस्रायलनेही आपल्या लष्करी ताफ्यात सामील करून घेतले आहेत. पुढच्या वर्षी इस्रायल आपल्या संरक्षण ताफ्यात ‘बॉर्डर्स प्रोटेक्टर’ नावाचे यूजीव्ही सामील करून घेणार आहे. हे ड्रोन प्रत्यक्ष सैनिकांची जागा घेत गाझा सीमेवर गस्त ठेवण्यापासून बॉम्ब शोधण्याचे तसेच गोळीबाराची दिशा ओळखण्यापर्यंतची महत्त्वाची कामे करणार आहेत.

अमेरिकेतली बडी शस्त्रास्त्र निर्मिती कंपनी असलेल्या ‘आॅशकॉश डिफेन्स’ने अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याद्वारे दृश्यमानता जवळजवळ शून्य असलेल्या ठिकाणी शत्रूला हेरणे शक्य होणार आहे. सध्या या तंत्राच्या युनायटडेट स्टेट्स मरीन कॉर्पतर्फे चाचण्या होत आहेत. याच जोडीने अमेरिकी लष्कराने डिफेन्स अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी आणि बोस्टन डायनामिक्स या कंपनीने संयुक्तपणे बनवलेल्या ‘अल्फाडॉग’ (लेग्ड स्क्वाड सपोर्ट सिस्टिम) नावाच्या घोड्यासारख्या दिसणार्‍या चार पायांच्या रोबोची चाचणी सुरू केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, युद्धभूमीवर हा रोबो तब्बल 400 पौंडांची साधने घेऊन जाऊ शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे, नव्याने इंधन भरेपर्यंत 20 मैल अंतर चालूही शकतो.

या सगळ्या युद्धतंत्रविकासाचा एक अर्थ असाही आहे की, एरवी युद्धात सैनिक मरण पावणे ही कोणत्याही सैन्यासाठी, त्या देशासाठी सगळ्यात मोठी हानी असते. मात्र यापुढच्या काळात युद्धभूमीवर रोबो सैनिकांची भूमिका वठवणार आहेत आणि प्रत्यक्षात कमीत कमी मनुष्यहानी होणार आहे. सैनिकांची किंमत चुकवावी लागल्याने निर्माण होणारा जनतेचा युद्धविरोधी दबावही अनेक देशांसाठी अडचणीचा ठरत आला आहे. मात्र यूजीव्हीच्या वापरामुळे ही शक्यताही निकालात निघणार आहे. म्हणूनही युद्धासाठी जनतेचे मन वळवणे राज्यकर्त्यांना तुलनेने सोपे जाणार असल्याचे मत मॅसाच्युसेट्स विद्यापीठातले जॉन कॅग यांनी बोलून दाखवले आहे. यापुढे लॉयल पार्टनर अथवा अल्फाडॉगसारखे भूपृष्ठीय ड्रोन दिसणे म्हणजे युद्धाची अप्रत्यक्ष घोषणा होणे वा लष्करी कारवाई सुरू होणार असल्याचा संदेश मानले जाण्याची तसेच भविष्यात दहशतवादी गटांकडून असे ड्रोन निर्माण होण्याचीही भीती आॅशकोशचे चीफ इंजिनिअर जॉन बेक यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे. शेवटी, या ड्रोनचा रिमोट कंट्रोल सैनिकांच्या म्हणजेच माणसांच्याच हातात असणार आहे. अशा वेळी ड्रोनचा अनिर्बंध वापर होऊन हिंसाचार कमी होण्याऐवजी वाढण्याचीही शक्यता अनेक तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. आजवर केवळ थरारक हॉलीवूडपटांमधून कल्पनेच्या पातळीवर अनुभवायला मिळालेले भूपृष्ठीय ड्रोन आज्ञावलीबरहुकूम जर हिंसक कारवाई करू लागले तर त्याची जबाबदारी कोणाची, त्या निर्जीव ड्रोनची की त्या ड्रोनला आज्ञा देणार्‍या माणसांची, असा नैतिक सवालही उपस्थित होण्यास प्रारंभ झाला आहे.
(संदर्भ : द न्यूजविक 10 जुलै 2014)