आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय वाढले पानावरती...(मधुरिमा दिवाळी विशेष)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती
धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले
चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनचि त्यांचे भरले
मिरची खोबरे तीसह ओले, तीळ भाजुनी त्यात वाटले
कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले
वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले

- ग.दि. माडगूळकर
स्वयंपाकघरात जेवायच्या टेबलाने ठाण मांडूनही बरीच वर्षं लोटली. तरी पाटावर मस्तपैकी बैठक मारून चौरंगावर मांडलेल्या ताटातून जेवण्याची मजा काही औरच. मिक्सरमुळं कामं पटापट आटोपतात हे खरं, पण पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची चव वेगळीच. पंचतारांकित हॉटेल, रस्त्यावरच्या चायनीज ठेल्यावर मिळणाऱ्या डिशवर ताव मारावासा वाटतो अनेकदा, पण आईच्या हातच्या स्वयंपाकाची हुकमी चव जिभेवर रेंगाळतेच. एरवी वर्षातले ३६५ दिवस फराळ तयार मिळत असला तरीही घरी आईला-बायकोला मदत करत बनवलेल्या आणि त्यांची नजर चोरून गुपचूप मटकावलेल्या चकल्या-करंज्या, चिवड्याच्या लज्जतीबद्दल तर क्या कहना... सणावाराला खवय्यांची रसतृप्ती करणारं पंचपक्वान्नांचं ताट असो किंवा रोजच्या जेवणातला साजूक तुपातला वरणभात, तो तयार करणं आणि वाढणं ही कला आहे हे खरंच. ती सगळ्याच जमते असं नाही. पण प्रयत्नांंनी साध्य जरूर करता येते. म्हणूनच ‘मधुरिमा’ या दिवाळीला तुमच्यासाठी घेऊन आली आहे, प्रादेशिक पदार्थांचा गोडवा. आणि त्याला साथ आहे सेलिब्रेटींच्या मुरलेल्या आठवणींची. तेव्हा या दिवाळीला प्रसन्न चित्तानं स्वादिष्ट-रुचकर पदार्थ घरी तयार करूया. घरातल्या लहानमोठ्या सदस्यांना त्यात सहभागी करून घेऊ. सहकुटूंब त्याचा आस्वाद घेऊया. समाधानानं-आनंदी वृत्तीनं जेवून तृप्त होऊया.
पाककृती विशेष
संयोजन : वंदना धनेश्वर
कला निर्देशन : गजानन दौड
मांडणी : कुणाल शर्मा
बातम्या आणखी आहेत...