आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत आणि स्वीकारही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय वाचकहो,
23 जून 2013 ‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक’ पुरवणीत प्रशांत पवार (संस्कृतीची घुसखोरी) आणि संजय पवार (वर्गभेदाची विषवल्ली) यांचे लेख प्रकाशित करण्यात आले. पैकी, प्रशांत पवार यांचा लेखविषय संस्कृती-परंपरेच्या जतन-संवर्धनाची गरज प्रतिपादित करणारा होता, तर संजय पवार यांनी जात-धर्म आणि खाद्य संस्कृतीच्या भेदातून महानगरांमध्ये रुजू पाहणार्‍या दृश्य-अदृश्य स्वरूपातील नव-अस्पृश्यतेचा मुद्दा मांडला होता. दोन्ही लेखांचा उद्देश, महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला आडकाठी आणू पाहणार्‍या प्रथांवर साधक-बाधक चर्चा व्हावी आणि त्यातून समाजात व्यापक स्तरावर विचारमंथन घडून यावे, हा होता. अर्थातच, दोन्ही लेख समाजातील संस्कृतीशरण वृत्ती आणि वर्चस्ववादी प्रवृत्तींकडे निर्देश करत कुणा एका जात-धर्म वा पंथाची नव्हे, तर सुधारणावादी विचारांची कड घेणारे होते. या लेखांवर वाचकांनी ई-मेल, एसएसएम आणि पत्रांच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यातील काहींनी भेदाभेदाला धग देऊ पाहणार्‍या कटू वास्तवावर प्रकाशझोत टाकल्याबद्दल लेखकद्वयीचे अभिनंदन केले, तर काहींनी कठोर शब्दांत तीव्र नापसंतीही व्यक्त केली. वाचकांनी केलेली मनमोकळी प्रशंसा आणि प्रखर टीका दोन्हीचा आदरपूर्वक स्वीकार. अनवधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरीसुद्धा. या निमित्ताने महाराष्ट्राच्या वाद-प्रतिवादाच्या गौरवशाली परंपरेला जागल्याबद्दल ‘दिव्य मराठी’च्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
लोभ असावा,
-मुख्य संपादक

भावनांशी खेळू नका
‘संस्कृतीची घुसखोरी’ या शीर्षकांतर्गत प्रशांत पवार यांनी लिहिलेला लेख वाचून खेद वाटला. पवारांसारखे वरिष्ठ पातळीवरील पत्रकार अशा प्रकारे निराधार लेख लिहून लोकांच्या भावनांशी खेळतात, हे पाहून आश्चर्य वाटले. हे सर्वज्ञात आहे की, फिल्म वा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये गुणांच्या बळावर कलावंतांची निवड होते, जातीच्या नव्हे. पवारांना हेदेखील ठाऊक असावे की साडेतीन टक्क्यांनी आजवर जी प्रगती साधली आहे, ती आरक्षण वा कोटा सिस्टिमचा आधार न घेता साधली आहे. तरीही, आपण लेखात केलेले आदिवासी संस्कृतीबद्दलचे उल्लेख आणि आपली शैली दखलपात्र आहे, हे मी आवर्जून नमूद करू इच्छितो. तरी जातीयतेला धग देणारे लेख लिहू नये, ही विनंती.
- अतुल जोशी

विचार करायला भाग पाडले
‘रसिक’मध्ये प्रशांत पवार यांचा लेख वाचला. या निमित्ताने बरेच विचार मनात घोंगावू लागले. याचा विचार होणे खूप गरजेचे आहे. लेख वैचारिक होता.
- कलीम अजीम

सांस्कृतिक दहशतवाद ग्रामीण जीवनातही...
‘संस्कृतीची घुसखोरी’ हा लेख आवडला. सांस्कृतिक दहशतवाद केवळ आदिवासी पाड्यांपर्यंतच नव्हे, तर आपल्या एकूणच ग्रामीण जीवनातही शिरला आहे. मी स्वत: चंद्रपूरपासून 90-100 कि.मी. अंतरावरच्या गावांमध्ये हा बदल टिपला आहे. टीव्ही, मोबाइल ही साधने येथील जनतेच्या पारंपरिक जगण्याचा समतोल बिघडवत आहे. आपण लेखाद्वारे मांडलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यावर समाजाच्या एका वर्गाची तीव्र प्रतिक्रिया येणे शक्य आहे. एका अस्पर्शित मुद्द्याला हात घातल्याबद्दल धन्यवाद.
- श्रीराम बजबळे, असि. कमिशनर
सेल्स टॅक्स, सोलापूर

वाकडे शोधण्याची वृत्ती
‘दिव्य मराठी’तला प्रशांत पवार यांचा लेख वाचला. वाचून आमचे किती कौतुक करता तुम्ही, ते कळले... कशातही तुम्ही वाकडेच काढू शकता, ही खात्री पण पटली. धन्यवाद.
- देवेंद्र कुलकर्णी
फिल्म इंडस्ट्रीतही
रिझर्व्हेशन हवे का?
तुमचा लेख वाचला नि हसू आले. अजूनही एवढा काळ बदलूनही तुमच्या घुस्पटलेल्या विचारांवर लेखाची पाने वाढावीत म्हणून किंवा उगाच सध्याची एक हॉबी समजून फुकटच ब्राह्मणांवर टीका करायची...? का...? तर साडेतीन टक्के तुमच्या नजरेत खुपताहेत. का तर ते सगळ्या क्षेत्रांत पुढे आहेत म्हणून...? अरे, आता काय फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण रिझर्व्हेशन हवंय का तुम्हाला...? तुमच्यासारखे उच्च विचारांचे लोक अजूनही जातिभेद धरून बसलेत. कधी बघितला का कुण्या ब्राह्मणाचा लेख दुसर्‍या जाती-समाजावर टीका करणारा...? नाही दिसणार, कारण हे साडेतीन टक्के शांततेने पुढे जात राहणार... तुमच्यासारख्यांच्या साडेतीन लाख लेख लिहिल्याने परिस्थिती बदलणार नाही.
एक काळ होता, काही चुका घडल्या, त्या आता सुधारल्यात. आज आम्ही सर्व समाजात वावरतो. त्या चुका सुधारणारे आगरकर, रानडे, टिळक, सावरकर, आनंदीबाई जोशी या ब्राह्मण लोकांना विसरलात तुम्ही... कला क्षेत्र असेल, अभिनय असेल, गायन, नृत्य यात आम्ही आजही पुढे आहोत. याला कारण आमचे संस्कार. सोडा आता, आमच्यावर टीका करण्यापेक्षा लोकांच्या फायद्याचे लिहा. मी एक छोटा माणूस आहे. फार अभ्यास नाही माझा, पण तुमच्या अशा ब्राह्मणांवर केलेल्या टीकेचा निषेध करतो... नि हे लक्षात ठेवूनच ब्राह्मण सभेचे आणखी जोराने काम करतो. कारण दिसतेय, साडेतीन टक्के तुमची झोप उडवतायत...
- स्वप्निल जोशी
आकसबुद्धीचे लक्षण
मी प्रशांत पवार यांचा लेख वाचला. ज्या संस्कृतीला आपण साडेतीन टक्क्यांची संस्कृती म्हणता ती महाराष्ट्रात सर्व समाजात थोड्याफार फरकाने आढळून येते, ठरावीक ब्राह्मण समाजात नाही. आणि राहणीमानातील बदलांना मीडिया कारणीभूत आहे, ब्राह्मण समाज नाही. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर अशा प्रत्येक ठिकाणची भाषा, राहणीमान वेगवेगळे आहे. मीडियावर पुणे-मुंबईचा पगडा आहे, ब्राह्मण समाजाचा
नाही. आणि लोकांच्या बोलण्या-वागण्यातील बदलांना ब्राह्मणी बदल म्हणणे ही आपली आकस बुद्धी आहे. ब्राह्मण समाज हा महाराष्ट्र समाजापासून व महाराष्ट्र धर्मापासून कधीच वेगळा नव्हता आणि असणार नाही.
- आनंद पाटील
सडेतोड लेख
प्रशांत पवार यांचा लेख सडेतोड आहे. अभिजनांनी आपल्या आईशी इमान राखले पाहिजे.
- भैरवनाथ वाकळे
पक्षपाती लेख
प्रशांत पवार यांचा लेख वाचला. विनाकारण पक्षपाती वाटला. हे खरे की, कित्येक शतके ब्राह्मणांनी वर्चस्व गाजवले, परंतु बदलत्या काळानुरूप त्यांनी आपल्या व्यवसाय व संस्कारांमध्येही बदल घडवून आणले. आधी त्यांनी नागरी सेवेत प्रवेश केला, मग ते खासगी नोकरीत स्थिरावले, नंतर ते परदेशात स्थिरावले. आता ते फिल्म आणि टीव्ही क्षेत्रात चमकताहेत. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मला वाटते, आता
याही क्षेत्रात लेखकाला आरक्षण हवे आहे. हे निंदनीय आहे.
- अभिजित भांडे-पाटील, जळगाव
अप्रतिम लेख
प्रशांत पवार यांचा अप्रतिम लेख वाचला आणि संपूर्ण कुटुंबासह मित्रपरिवारासदेखील फार फार आवडला. नक्कीच समाजबांधवांमध्ये थोडा तरी बदल यामुळे घडून येईल. आपल्या या सर्वोत्तम कार्यास अनेक अनेक शुभेच्छा. आम्हीदेखील याच कार्यात आपल्यासवे आहोत.
- संजय सुरवसे
एककल्ली लेख
‘वर्गभेदाची विषवल्ली’ हा लेख एककल्ली वाटला. जातीयवादी लेखकाला मुंब्रा-भिवंडी दिसली नाही का? एका जातीचा पुळका असणे हीच लेखकाची वर्गभेदाची विषवल्ली दिसून येते.
- एम. पी. गांधी, अहमदनगर.
द्वेषमूलक लिखाण
23 जूनच्या अंकातील ‘संस्कृतीची घुसखोरी’ हा लेख वाचला. लेखकाचा ‘साडेतीन टक्क्यां’बद्दल पराकोटीचा द्वेष स्पष्टपणे दिसून आला. त्या द्वेषापायी प्रस्तुत लेखक जातिभेद न पोहोचलेल्या कलाकारांची जात शोधू लागले. आणि महात्मा फुले आणि
न्या. रानडे यांची विनाकारण तुलना करू लागले.
- राजेश जोशी, औरंगाबाद.

प्रबोधनात्मक लेख
प्रशांत पवार यांचा ‘संस्कृतीची घुसखोरी’ लेख खूप आवडला. प्रत्येक ठिकाणी अशी घुसखोरी झाली आहे. पण ठरावीक विद्रोही लोक सोडले तर याचा प्रतिवाद कोणीही करीत नाही, म्हणून तर या घुसखोरांचे फावते, असेच प्रबोधन अपेक्षित आहे. लेख खूप खूप आवडला.
- डॉ. विद्याधर सूर्यवंशी, सोलापूर

विदारक सत्याचे दर्शन
‘रसिक’मधील ‘संस्कृतीची घुसखोरी’ आणि ‘वर्गभेदाची विषवल्ली’ या लेखांमध्ये प्रशांत पवार व संजय पवार यांनी दाखवलेल्या संतांची भूमी, समाजसुधारकांची भूमी म्हणून मिरवणार्‍या महाराष्ट्राचे विदारक सत्य बाहेर आले आहे.
- सचिन यशवंत बिरहाडे, बांबोरी,
पोस्ट-धरणगाव, जिल्हा-जळगाव.

अंतर्मुख करायला
लावणारा लेख
‘वर्गभेदाची विषवल्ली’ हा संजय पवार यांचा लेख अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. भारतासारख्या अखंड लोकशाही असलेल्या देशात प्रगत आणि शिक्षित असलेल्या जनमानसावर धार्मिकतेचा पगडा किती घट्ट आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते...
- हबीब शेख, औरंगाबाद.

वाचनीय लेख
प्रशांत पवार लिखित ‘संस्कृतीची घुसखोरी’ हा लेख वाचनीय आणि चिंतनीय आहे.
- लता बी. गायकवाड,
आंबेडकर सोसायटी, सोलापूर.

दुखर्‍या जखमेवर प्रकाश
‘संस्कृतीची घुसखोरी’ आणि ‘वर्गभेदाची विषवल्ली’ हे लेख अप्रतिम आहेत. समाजातील दुखर्‍या जखमेवर प्रकाश टाकला आहे. ‘रसिक’ पुरवणी इतर पुरवण्यांच्या तुलनेत फार सरस आहे.
- असिफ, औरंगाबाद

धर्मवाद, जातीयवाद कशासाठी?
‘वर्गभेदाची विषवल्ली’ या लेखातील जैन धर्मासाठी पिण्याच्या पाण्याच्या वेगळ्या पाइपलाइनबद्दल वाचून धक्का बसला. धर्मवाद, जातीयवाद का? कशासाठी? मन दु:खी झाले.
- रवि गजानन ताड, धोकी, ता.-जि.उस्मानाबाद.

वास्तवावर प्रकाश
‘संस्कृतीची घुसखोरी’ हा लेख आवडला. प्रशांत पवार यांनी वास्तव विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसेच संजय पवार यांचासुद्धा लेख वाचून ‘मिनी भारता’मधील लोक कसे वागतात, ही माहिती मिळाली. बाकी इतर लेख वाचनीय होते.
- अनिल देशमुख, धोकसाल,
ता. मंथा, जि. जालना.

दांभिकपणाचा पर्दाफाश
पवार बंधूंचे ‘संस्कृतीची घुसखोरी’ वा ‘वर्गभेदाची विषवल्ली’ दोन्ही लेख खूप आवडले. स्पष्टपणा आणि समाजातील दांभिकपणा असाच समोर आला पाहिजे...
- अ‍ॅड. शिरीषकुमार जाधव, औरंगाबाद.

विविधता में एकता?
‘वर्गभेदाची विषवल्ली’ हा लेख खूप खूप आवडला. हा लेख वाचल्यानंतर शाळेत शिकवलेला धडा आठवला. ‘भारत- विविधता में एकता’. आम्ही पाकी(पाकिस्तानी) नाहीत... आम्ही लोक कट्टर भारतीय आहोत. आणि आम्हाला गर्व आहे या गोष्टीचा..
- एजाज हन्नुरे परांदा, जि. उस्मानाबाद

जातीयवादाला धग
महाराष्ट्रात जातीयवाद दबा धरून होता, पण तो आता उफाळून येत आहे, हे सत्य लपवता येणार
नाही. आणि ती देशासाठी खेदजनक बाब असून घातकपण आहे.
- आर. सी. भालेराव, भोरोले नगर, चोपडा

लेख आवडला नाही...
‘संस्कृतीची घुसखोरी’ हा लेख बिलकुल आवडला नाही. उलट राग आला.
-योगेश जाधव

पूर्वग्रहदूषित लिखाण
‘संस्कृतीची घुसखोरी’ हा लेख अर्धसत्य विशद करणारा लेख आहे. बाकी चांगल्या गोष्टी शिकायला जातीचे बंध नसावेत. भलेही ते कोणत्याही जातीचे असले तरीही राग नसावा. लिखाण पूर्वग्रहदूषित असल्यासारखे वाटते.
-9673596252

उथळ स्वरूपाचा लेख
‘संस्कृतीची घुसखोरी’ हा लेख अतिशय जातीयवादी, तर्कदुष्ट व उथळ स्वरूपाचा होता.
-9850504364