आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा कट्टा: नवरात्रोत्सवात स्मरण नवरसांचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईचे ठायी तंतोतंत अनुभूती
— ज्योत्स्ना पाटील,नाशिक
नवरसातील शांत, करुण व हास्य या त्रिवेणी रसाच्या संगमांचा समुच्चय म्हणताच आठवतो तो माझ्या आईचा चेहरा. चार वर्षे सोरिअॅसिससारख्या त्वचाविकारामुळे अंथरुणावर पडूनही कुठलीही चिडचिड नाही की त्रागा नाही, फक्त डोळे मिटून पडलेली आईची शांत मूर्ती. तितक्याच शांतपणे या असाध्य आजारातून चार वर्षांनी अंथरुणावरून उठली आणि पुन्हा प्रसन्न चेहऱ्याने काम करू लागली. डॉ. प्रमोद अंबुळकर यांचे प्रयत्न, भावाने, वहिनीने व दोघा भाच्यांनी या काळात केलेली तिची सेवा आणि तिच्या शांत स्वभावामुळे तिने या आजारावर सहजपणे केलेली मात. आज सत्तराव्या वर्षीही आई सतत काम करीत राहून स्वतःला कार्यक्षम ठेवू शकली, ते केवळ तिच्या शांत व सोशिक स्वभावामुळे. शृंगार करायला तिला मनापासून आवडत असूनही शृंगाररसाची तशी तिच्याशी फारकतच झाली, याचे खूप वाईट वाटते. परंतु तिचा दबलेला शृंगार ती अंगणात रांगोळी काढून प्रकट करायची, तर कधी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या आकारात बनवून पदार्थांनाच शृंगारिक बनवायची. खान्देशातील व्रत घेणे या प्रथेत गव्हाच्या कणकेपासून स्त्रीचे सर्व दागिने बनवून ते पाण्यात उकडून पूजा करून खाण्याची पद्धत आहे. त्या दिवशी माझी आई कणकेपासून दागिने बनवताना इतकी एकाग्र व्हायची की, जणू काही एखादा सोनारच दागिने घडवत आहे, असे वाटायचे. तिची ती दागिने बनवतानाची मूर्ती आठवून मन नेहमीच कासावीस होत असते. प्रत्येक गोष्टीत समाधान शोधणाऱ्या आईला जगण्याचा खरा अर्थ सापडला असल्यामुळे ती नेहमीच स्थितप्रज्ञ असते आणि तिच्या त्या अवस्थेला मी नेहमीच सलाम करते. राधेचं मीरेत झालेलं रूपांतर म्हणजेच नावाप्रमाणे शालीन असलेली माझी आई ‘शालिनी’ होय.

आईचे रौद्र रूप
— प्रिया निकुम, नाशिक
नवरात्रीत या नवरसांची आठवण होते. आरोग्यासाठी जशा सगळ्या चवी आवश्यक असतात, त्याप्रमाणे या रसांशिवाय जीवनात मजा नाही. असाच एक अनुभव. मागच्या वर्षी नवरात्र बसायच्या गडबडीत आम्ही होतो. सकाळपासून सगळं साहित्य आणून लवकर घट बसवायचे, म्हणून आमचे प्रयत्न होते. साहित्य तर आणलं गेलं होतं. परंतु त्या दिवशी सारखे पाहुणे चालू होते. हळूहळू आईची चिडचिड चालू झाली होती. पण करणार काय! तरीसुद्धा ती हसतमुखाने, शांत चित्ताने सर्व काही करत होती. शेवटी तीन वाजता आम्ही घट स्थापन केला, तेव्हा तिला बरं वाटलं. आणि आम्हीसुद्धा सुटकेचा निश्वास टाकला.

शक्तिरुपिणीचे स्मरण
— धैर्यमोहन कळमकर
नवरात्र नवदुर्गेचा, स्त्रीशक्तीचा सण. अशा या आदिमाय स्त्रीशक्तीची रूपंसुद्धा नावाप्रमाणे वेगवेगळी आहेत. या विविध रूपांमधील मला जास्त भावलेले रूप म्हणजे तिचं धैर्य. कितीही संकटे आली तरी ही शक्ती अशी आहे की, ती कधीच हार मानत नाही की डळमळत नाही. याचे चालतेबोलते उदाहरण म्हणजे माझ्या मित्राची आई. मसणजोगी समाजात जन्मलेला माझा मित्र. घरात अठरा विश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत या माउलीने मुलाला बीएस्सी अॅग्रीपर्यंत शिक्षण दिले. तो मसणजोगी समाजातला पहिला पदवीधर ठरला. हे सर्व शक्य झाले ते त्या माउलीच्या निर्धाराने, तिच्या चिकाटीने.

नवरसांनी नवरात्रीला उधाण
— रत्नमाला ठाकूर,अहमदनगर
पितृपंधरवड्यात पितरांच्या श्राद्धामुळे त्यांच्या आठवणीने मन उदास होते; पण पुढे नवरात्र येत असल्याने मरगळ सोडून अंगात वीररस संचारतो. घर स्वच्छ केले जाते. मन प्रसन्न होते. उत्सव, सण साजरे करण्याचा उद्देश हाच आहे की, मागील सर्व दु:ख विसरून आनंद साजरा करायचा. अंबाबाई घरी बसते, आनंदाला उधाण येते. देवीची आरती, पूजा करताना मन भक्तिरसात बुडून जाते. देवीचा घट, नंदादीप माळ लावून शांतरस अनुभवास येतो. रोज महिला भजन, श्रीसूक्त गाण्यासाठी सर्व शृंगार करून घरोघरी जातात. गोंधळ, भारूड, टिपऱ्या, जोगवा यात हास्यरसाला जोर येतो. देवीच्या दर्शनाला जाण्याचाही खूप उत्साह असतो. आमच्या ‘ज्ञानदेवी’ मंडळाचे मी रचलेले गाणे आठवले.

‘आली ग आली अंबाबाई आली।
कोल्हापूरची लक्ष्मी आली।
नवरात्री घरी बैसली। आई नवरात्री घरी बैसली।
महालक्ष्मीचा घट स्थापिला। घटापुढे दिवा लाविला।
दिव्याला तेल मी घालिते।
आईच्या दिव्याला तेल घालिते।’
अशा प्रकारे माहुरची देवी, तुळजाभवानी, सप्तशृंगीमाता, दुर्गादेवी अशा सर्व देवी या गाण्यात नवरात्री घरी बसतात. अशा आनंदात करुण रस, बीभत्स रस कुठल्या कुठे पळून जातात.

शांत रसाचा वारसा
— हेमलता झंवर, नाशिक
या आठवड्याचा मधुरिमा कट्टाचा विषय खूपच छान आणि वेगळा आहे. मी स्वत:शीच शोध घेऊ लागले की, कोणता रस मला जास्त आवडतो? दोन-चार दिवसांपूर्वी घरातील सर्व जण दिवसभर घराबाहेर जाणार होते. मला म्हणाले, तू कशी राहशील! मी म्हटले, काळजी करू नका. दिवसभराची ती शांतता मला खूप भावली अन् लक्षात आले, मी शांतरसाची भक्त आहे. म्हणूनच मला पहाटे लवकर उठल्यानंतर जाणवणारी शांतता खूप हवीहवीशी वाटते. घरातील-बाहेरील सर्व लाइट‌्स गेल्यानंतर निर्माण होणारी नीरव शांतता माझ्या आत आत पोहोचते. टीव्ही मालिकांचा सोस नसणाऱ्या, वाचनात रमलेल्या मला काही कारणास्तव घरातला टीव्ही बंद झाला की, माझ्या तरुणपणी घरात वास्तव्याला असलेली शांतता आठवते. नवरात्रीत सर्व जण झोपल्यावर घरातील घटस्थापनेजवळ अखंड तेवणाऱ्या दिव्याकडे आणि गव्हांकुराकडे एकटक पाहात असताना मी अंतर्यामी अजून शांत शांत होत जाते. शांत रसाचा विचार करताना आठवतात दोन वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेले माझे वडील. आयुष्यभर त्यांनी ओम शांतीचाच मंत्र जपला. कदाचित त्यांनीच मला हा वारसा दिला; पण अजूनही त्यांच्याइतका विजय मिळवता आला नाही, एवढे खरे.

नवरात्रीचे नवरस
— सरोज शेवडे, नाशिक
नवरस काव्य, लेखन, नाट्य इ.मध्ये कलात्मकता निर्माण करतात, तर माणसामध्ये स्वभाव निर्माण करतात. नवरस म्हटलं की, नवरात्रीतील नऊ देवींची रूपं आठवतात. त्यातील मला शांतरस फार आवडतो. शांतता असली की सर्व गोष्टी सुकर होतात. शांत रसामुळे मन एकाग्र होऊ शकते. शांत मन हे क्रियाशीलतेसाठी आणि उन्नतीसाठी महत्त्वाचे असते. घाई, गडबड न करता शांतपणाने घेतलेले निर्णय, कोणतेही काम हे चिरकाल यश देणारे असते. हा रस नेहमी प्रगती करतो. शांत रसाचे उत्तम उदाहरण म्हणजे संत. ते कोणीही असोत, ज्ञानेश्वर, तुकाराम, गोरा कुंभार, मीराबाई इ. पण त्यांच्यामुळे जनजागृती व दिशाहीन समाजाला दिशा प्राप्त करून देण्याचे कार्य झाले.

हास्य हवेच
— मंगेश जाधव पाटील, पुसद
एकदा सर्कशीतल्या विदूषकाने लोकांना एक विनोद सांगितला. लोक खूप हसले. त्याने तोच विनोद पुन्हा सांगितला. अर्धे लोक हसले. तोच विनोद त्याने तिसऱ्यांदा सांगितला, तेव्हा मात्र कोणीच हसले नाही. तो विदूषक म्हणाला, बाबांनो, एकच एक विनोद ऐकून तुम्ही पुन:पुन्हा हसू शकत नाही, तर मग एकच एक दु:ख घेऊन पुन:पुन्हा का रडता?
परंतु, हास्य जीवन बदलवून टाकतं. सकाळी उठल्यावर ज्याच्या चेहऱ्यावर हसू असतं, त्याचा दिवस चांगला जातो. हास्य हे अनेक रोगांवर इलाज आहे. हसत राहा, सुंदर जगा.

हास्यरस रामबाण औषध
— जयश्री सुकळीकर, सोलापूर
‘कुछ छोटीसी कुछ मोटीसी, जैसे अचार की बरनी.
अक्षर तक का ज्ञान नही है, बनी हुई है हेडमास्तरनी’
वर्मा मॅडम रंगात येऊन शिकवत होत्या. वर्गातील मुली वरील ओळी ऐकून जोरात हसल्या आणि अचानक मुख्याध्यापिका हा आवाज ऐकून वर्गासमोर हजर. (त्या बालिश वयात शारीरिक विनोदावर हसू नये, एवढंही कळत नव्हतं.) मुली हसता हसता स्तब्ध झाल्या. मॅडम पण हसू दाबून शांत झाल्या. मधुरिमा कट्ट्याचा विषय ‘नवरस’ वाचून ४५-५० वर्षांपूर्वीचा तो कालखंड झरझर डोळ्यासमोर जिवंत झाला.

माझे हिंदी माध्यमातून शिक्षण झाले आहे. हिंदी साहित्यात पारंगत असलेल्या शिक्षिकांमुळे वाचनाची आवड वृद्धिंगत झाली. आम्ही वर्गातील मुली मंत्रमुग्ध झाल्यासारख्या हिंदीच्या वर्गाला उपस्थित असू. आजही ती उदाहरणं तोंडपाठ आहेत.
करुण रस : देखि सुदामा की दीन दशा,
करुणा करके करुणानिधी रोए,
पानी परात को हात छुओ नहीं
नैनों के जल से पग धोए
मला वाटते, साहित्यातील नवरस आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेतच; मात्र हास्यरस या तणावाच्या व धकाधकीच्या आयुष्यात गरजेचा आहे. कंटाळा आल्यावर पुलंच्या पुस्तकातील फक्त एक पान वाचा, पुढच्याच क्षणी मरगळ दूर होते. अत्रेंच्या विनोदात दु:ख दूर करण्याचे सामर्थ्य आहे. गडकरींचे साहित्य, चिं.वि. जोशींचे गुंड्याभाऊ, सुभाष भेंडे, मंगला गोडबोले, रमेश मंत्री या सर्वांच्या साहित्यात हास्यरस परिपूर्ण आहे.

शृंगाराकडे महिलांचे दुर्लक्ष
— मंजुषा कोरंगळेकर, औरंगाबाद
शृंगाररस म्हटले की, डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते देवीदेवतांचे. केसांचा मधोमध भांग, त्यात कुंकू भरलेले, मानेवर सैलसर अंबाडा, त्यावर सोन्याचे फूल. कानात कुड्या, नाकात नथ, कपाळावर भव्य असे कुंकू, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र. हातात चुडा. कंबरेला कंबरपट्टा, तर हिरवी कच्च भरजरी साडी-चोळी. अगदी साधा शृंगार; पण हे रूप खूप लोभस वाटते. पण आज धकाधकीच्या आणि स्त्री-पुरुष समानतेच्या आयुष्यात महिलांना नटण्यासाठी वेळच नाही. सकाळची कामे आटोपून ऑफिस टाइम कसा पाळता येईल, याकडेच लक्ष केंद्रित असते. इतरांसाठी नव्हे तर स्वत:चे मन प्रसन्न ठेवण्यासाठीदेखील शृंगार महत्त्वाचा आहे, हे महिलांनी विसरू नये.
(या विषयावर आम्हाला वनमाला इढोळेपाटील-अकोला, अश्विनी गोरे -सोलापूर, चंद्रकांत सरोदे -नाशिक यांच्याही प्रतिक्रिया प्राप्त
झाल्या आहेत.)

आजचा विषय—
नवरात्रीच्या नऊ दिवसांचा उत्साह शिगेला पोहोचल्यानंतर विजयादशमीला कुप्रथांचे दहन केले जाते. अंधकारावर तेजाचा विजय होतो आणि मग वेध लागतात प्रकाशोत्सव अर्थात दीपावलीचे. आपल्याही आयुष्यात, दैनंदिन जीवनात, आजूबाजूला अनेक कुप्रथा, वाईट प्रवृत्तीची माणसे असतील. अशा प्रथा, माणसांवर कधी समजावून तर कधी रौद्र रूप धारण करून विजय मिळवावा लागतो. तुमच्या माहितीत आहेत का अशा कुप्रथा, वाईट प्रवृत्तींची माणसे, ज्यांच्यावर कुणी प्रेमाने तर कुणी कायद्याचा वापर करून विजय मिळवला असेल? तुमचे अनुभव १५० शब्दांत लिहून आम्हाला पाठवा.

आमचा पत्ता—
मधुरिमा, दैनिक दिव्य मराठी, १५२९५,
मोतीवाला कॉम्प्लेक्स, जालना रोड,
औरंगाबाद - ४३१००३
ईमेल: madhurimadm@gmail.com
फॅक्स क्रमांक - ०२४०-२४५३५०३