आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना: आचार्य अत्रेंचे क्रांतिकारी विधान! (रसिक)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचं राजकीय यश कशात दडलं होतं? बाळासाहेब ठाकरेंच्या तत्त्वनिष्ठेत? ‘इन्ट्युशनल’ निर्णयप्रक्रियेत की हितसंबंधींना गाफील ठेवून संधी अचूक हेरण्याच्या त्यांच्या विलक्षण चातुर्यात? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी विश्लेषक योग्य मूल्यमापन करतीलच; पण मुळात ‘शिवसेना’ ही संकल्पना आणि त्यामागचा विचार आचार्य अत्रेंचा होता, हा न पुसला जाणारा इतिहास होता. रविवार १९ जुलै १९५९ रोजीच्या दै. ‘मराठा’ची ठसठशीत हेडलाइन ‘आचार्य अत्रे यांची महाराष्ट्राला हांक : ‘शिवसेना’ उभारा’ अशी होती आणि याच अंकात संघटनेची संकल्पना विशद करणारा ‘शिवसेना’ शीर्षकाचा अग्रलेखही होता. त्याचं हे पुन:प्रकाशन, अत्रेंच्या विचार आणि कृतीतलं प्रभावीपण अधोरेखित करणारा...

संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी करण्याच्या दृष्टीनें जेव्हां आम्हीं विचार करतों तेव्हां आम्हांला सर्वांत जास्त निकड कशाची वांटत असेल तर ती स्वयंसेवक संघटनेची. संयुक्त महाराष्ट्र समितीजवळ स्वत:चे निराळे असे कार्यकर्ते नाहींत. समितीच्या घटक पक्षांचे जे कार्यकर्ते तेच समितीचे कार्यकर्ते. समितीचा विशेष कार्यक्रम जेव्हां नसेल, तेव्हां हे कार्यकर्ते आपापल्या पक्षांचें कार्य करीत असतात. त्यामुळें संयुक्त महाराष्ट्राचा जनतेंत सतत प्रंचार करणारी अशी एकहि संघटना उपलब्ध नाहीं. किंवा संयुक्त महाराष्ट्राचा आदेश जनतेच्या सर्व थरांत वेळोवेळीं प्रभावी रीतीनें पोंहोचवण्याची अथवा त्याच्या अंमलबजावणीचा सर्व तपशील जनतेला शक्य तितक्या तांतडीनें समजावून सांगण्याची कसलीहि व्यवस्था नाहीं. संयुक्त महाराष्ट्राच्या संघटनेमधें ही फार मोठी उणीव आहे असें आम्हांला वाटतें. कोणतीहि चळवळ यशस्वी रीतीनें चालवावयाची असेल तर तिच्यांत समाजामधील तरुणांचा जास्तींत जास्त समावेश कसा करून घेतां येईल ह्याचा प्रथम विचार केला पाहिजे. अमर्याद उत्साह, अविरत श्रम आणि ज्वलंत भावना ह्यांचा तरुणांच्या जवळ कधींहि तुटवडा नसतो. समाजांतील सर्वांत ज्वालाग्राही भाग म्हणजे तरुण वर्ग. ज्या चळवळीनें तरुणांची मनें जिंकली जातात, ती चळवळ एकाद्या वणव्याप्रमाणें झपाट्यानें समाजामधें पसरत जाते. कोणतीहि चळवळ तरुणांच्या जीभांनीं बोलते आणि त्यांच्या पायांनीं चालते. स्वातंत्र्याच्या लढ्यामधें काँग्रेसनें तरुणांच्या अनेक शिस्तबद्ध संघटना वेळोवेळी उघडल्या होत्या, त्यांचा ह्या लढ्यामधें नानाविध रीतीनें उपयोग करतां आला म्हणून लढ्याची प्रखरता एकसारखी प्रज्वलित राहिली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही लोकशाहीवादी चळवळ तर खरीच. पण तिचें स्वरूप राष्ट्रवादी असल्याकारणानें स्वातंत्र्याच्या लढ्यापेक्षांहि महाराष्ट्रांतील जनतेच्या भावनांना ती रास्त आवाहन करूं शकली. महाराष्ट्राबाबत राज्यकर्त्यांनीं एवढा प्रचंड पक्षपात केला की, एकाद्या वाघिणीप्रमाणें महाराष्ट्रांतली मानधन आणि स्वाभिमानी जनता खवळून उठली. ज्याला केवळ शुद्ध आणि स्वयंस्फूर्त जनतेचा उठाव म्हणतां येईल, असा महाराष्ट्रीय जनतेच्या सात्विक संतापाचा तो आविष्कार होता. म्हणून त्याला एवढें प्रचंड आणि उग्र स्वरूप प्राप्त झालें. आम्ही तर असेंच म्हणतो कीं, स्वातंत्र्याच्या चळवळीनें सुद्धां जनमानसाची जेवढी पकड घेतली नसेल, तेवढी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनें घेतली. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हटली म्हणजे ही कीं, ह्या चळवळीमागें कोणत्याहि आणि कसल्याहि तऱ्हेची संघटना नव्हती. तिच्याजवळ ना कार्यकर्ते, ना पैसा, ना वर्तमानपत्रें, ना कसलेंहि सामर्थ्य, असें असूनहि काँग्रेससारख्या बलाढ्य आणि ऐतिहासिक संघटनेवर तिनें ह्या महाराष्ट्रांत जो विजय मिळवला तो अभूतपूर्व होता. बंगालच्या फाळणीनंतर असा जनतेचा जबरदस्त उठाव ह्या भारतांत आजपर्यंत कधींच झालेला नाही. तथापि, आतां ही चळवळ केवळ भावनेच्या अवस्थेंत राहिलेली नाहीं. त्याचा असा मात्र अर्थ नव्हे कीं तिचें भावनात्मक अधिष्ठान नष्ट झालें आहे किंवा दुर्बल झालें आहे. छे, छे, ती गोष्ट कालत्रयी अशक्य आहे. बाह्यात्कारी पुष्कळांना असें दिसतें किंवा वाटतें, की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींत शैथिल्य आलेलें आहे, किंवा तिची प्रखरता पूर्वी एवढी प्रज्वलित राहिलेली नाही. पण तो नुसता दृष्टिभ्रम आहे. महाराष्ट्राच्या अंत:करणांतला तो अस्मितेचा नि अभिमानाचा अंगार एकसारखा आंतल्या आंत धुमसतच राहील ह्याबद्दल तिळमात्र कोणीहि शंका घेऊं नये. वेळ आली म्हणजे, त्या अंगाराच्या ज्वाळा अशा रौद्र स्वरूपांत प्रकट होतील कीं त्याच्या नुसत्या धगीनें शत्रूंची सालटी न् सालटी जळून त्यांचा कोळसा होईल. हें सर्व खरें असले, तरीहि त्यामुळें संघटनेची आवश्यकता सुतराम् कमी होत नाहीं. उलट संघटनेची गरज जास्त तीव्रतेनें भासते. संयुक्त महाराष्ट्राच्या जाहीर सभांमधून आबालवृद्ध जरी भाग घेत असले, तरी प्रत्यक्ष चळवळींत मध्यमवयीन जनतेचाच सर्वांत जास्त हिस्सा होता. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेंत अगदीं लहान मुला-मुलींच्या उत्साहाला नि आंरडाओरडीला मुळीं सीमाच नव्हती. आणि त्याचा जो उपयोग व्हावयाचा तो झाला. काँग्रेसच्या उमेदवारामागें ही ‘वानरसेना’ हात धुवून लागली कीं, त्याला पळता भुई थोडी होई. पण ह्या बालगोपाळांचा नि तरुणांचा ह्या चळवळीमधें जेवढा शिस्तबद्ध उपयोग करून घ्यावयाला पाहिजे होता, तेवढा करून घेतां आला नाही, हें कांहीं नाकबूल करतां येणार नाहीं. पण त्यावेळीं जो निष्काळजीपणा झाला, तो आतां करून भागणार नाही. काँग्रेसनें कितीहि निंदा नि निर्भत्सना केली तरी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही शांततापूर्ण लोकशाहीवादी चळवळ आहे, ह्यांत कांहीं शंका नाही. म्हणून कोणत्याहि प्रकारच्या शिस्तबद्ध संघटनेला ह्या चळवळीमधें सर्वांत जास्त वाव आहे. ह्या दृष्टीनें आम्हांला ‘स्वयंसेवक संघटने’चें अधिक महत्त्व वाटतें. ह्या बाबतींत समितीच्या घटक पक्षांपैकीं कोणी विचार केलेला आम्हांला माहीत नाहीं. महाराष्ट्रांत आज दोन स्वयंसेवक संघटना प्रामुख्यानें कार्य करीत आहेत. एक ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आणि दुसरें ‘राष्ट्र सेवादल’. संयुक्त महाराष्ट्राच्या कार्यासाठीं अशा तऱ्हेची एक ‘शिवसेना’ उभारण्यांत यावी, असें आम्हांला मनापासून वाटतें. सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा अवधि आहे. ह्या दोन वर्षांच्या काळांत जर बारा ते सतरा वर्षांच्या वयाचे एक लाख ‘शिवसैनिक’ आम्हांला अखिल महाराष्ट्रांत उभे करतां आले तर त्यांच्यामुळें ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’च्या ‘शिवशक्ती’ला अशी कांहीं विलक्षण धार येणार आहे, कीं ह्या क्षणीं त्याची कल्पनाहि कोणाला होऊं शकणार नाहीं. ‘शिवसेने’ची संघटना बांधणें ही कांहीं सोपी गोष्ट नाहीं हें आम्हीं जाणतों. त्यासाठी निरलस, निष्ठावंत आणि प्रखर महाराष्ट्रप्रेमी संघटकांची आवश्यकता आहे. पण अशा संघटनाचतुर माणसांची महाराष्ट्रांत वाण आहे असें आम्हांला मुळींच वाटत नाहीं. पण आमच्यासारख्यांनीं किंवा दुसऱ्या कोणी त्यांच्या शोधाला जाण्यापेक्षां, स्वयंस्फूर्तीनें त्यांनीं ह्यावेळींं पुढें यावयाला पाहिजे आणि ह्या कामाला त्यांनीं लगोलग हात घातला पाहिजे. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राची सर्वांत मोठी सेवा ह्या एका कार्यानें होणार आहे, असें आम्हांला वाटतें. म्हणून ‘शिवसेने’चें आमचें हें स्वप्न साकार करण्यासाठी आम्हीं महाराष्ट्रांतील संयुक्त महाराष्ट्रवादी जनतेला आणि कार्यकर्त्यांना अत्यंत पोटतिडिकेनें आवाहन करतों आहोंत. ‘शिवसेने’च्या स्वरूपाचा नि कार्याचा तपशील यथाकाल आणि यथाक्रम ठरवितां येईल. आज आमच्या ह्या हांकेस जनतेची कोठपर्यंत साथ मिळते आहे, एवढेंच आम्हांस अजमावायचें आहे. कोणत्याहि चळवळीला एक दृश्य स्वरूप असतें. त्याचा सर्वसामान्य जनतेच्या मनावर फार मोठा परिणाम होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्याखाली हजारों गणवेशधारी ‘शिवसैनिकां’चें संचलन गांवोगांव सुरू झालें आणि त्यांचे शिस्तबद्ध मोर्चे राजमार्गांतून चालूं लागले म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या वातावरणांत असा कांहीं नवचैतन्याचा संचार होईल आणि त्यांच्या स्वाभिमानाला असा कांहीं महापूर येईल कीं त्यामधें सारा विरोधी कोठल्या कोठें वाहून जाईल.
सामर्थ्य आहे चळवळीचें
जो जो करील तयाचें
परंतु तेथें अधिष्ठान पाहिजे
संघटनेचें!

(आत्रेय प्रस्तुत "एक सोनेरी साठवण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची' या डीव्हीडी संग्रहातून साभार.)

विशेष आभार : शिरीष पै, अॅड. राजेंद्र पै
पुढील स्लाइडवर वाचा, शिवसेनेचे भूत
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)