आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टळटळीत दुपार. उडणारी धूळ. अशा वातावरणातही पुस्तकांच्या ओढीनं रसिक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होते. पुस्तक चाळल्यानंतर एक-दोन पुस्तकांची खरेदी हमखास व्हायची. दुपारी काहीसा ओकाबोका वाटणारा प्रदर्शनाचा परिसर संध्याकाळी मात्र गर्दीने फुलून जायचा. ऐन उन्हाळ्यात आणि तेही परीक्षांच्या काळात महाराष्ट्र शासनाने ‘ग्रंथोत्सव’ आयोजित करूनही नगरकरांनी सुमारे पाच लाखांची पुस्तके तीन दिवसांत खरेदी केली.
नगरच्या रावसाहेब पटवर्धन स्मारकाच्या आवारात भरलेल्या या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते झाले. पठारे साहित्य व संस्कृती मंडळावर असताना अशी प्रदर्शने घेण्याचा प्रस्ताव त्यांनी 12-14 वर्षांपूर्वी सादर केला होता. तुकारामाची गाथा अवघ्या शंभर रुपयांत म्हणजे जवळ जवळ फुकटात शासन उपलब्ध करून देते. इतकी चांगली पुस्तके नाममात्र किमतीत दिली जात असताना ती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचायला हवीत, यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय ग्रंथभांडार सुरू करण्यात यावे, स्थानिक लेखक, कवी आणि रसिकांना सहभागी करून घेणारे साहित्यिक उपक्रम नियमितपणे गावपातळीवर राबवावेत, अशा पठारे यांनी केलेल्या सूचना तेव्हा कच-याच्या टोपलीत गेल्या होत्या. मात्र, मागील दोन वर्षांपासून ग्रंथोत्सवाचा चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल पठारे यांनी शासनाचे मनापासून अभिनंदन केले. विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळाचे मात्र त्यांनी कान टोचले. या मंडळाने काढलेली पुस्तके दर्जेदार असत, पण आता हे मंडळ पगारापुरते कागदावरच राहिले आहे, अशी टीका पठारे यांनी केली.
युनेस्कोने तयार केलेल्या ‘वर्ल्ड हेरिटेज ऑफ बुक्स’मध्ये मराठीतील केवळ दोन पुस्तकांचा समावेश आहे. त्यात एक आहे ज्ञानेश्वरी आणि दुसरा ग्रंथ आहे तुकोबाची गाथा. तुकाराम हा ख-या अर्थाने महाकवी होते. जगातील अनेक भाषांमध्ये पोहोचलेल्या तुकारामामुळे मराठीला वैश्विक ओळख प्राप्त झाल्याचं सांगत प्रत्येक मराठी माणसाच्या घरात ज्ञानेश्वर-तुकाराम वाचला जायला हवा, असे पठारे म्हणाले. आज भौतिक समृद्धीची अक्राळविक्राळ वाढ होत असताना नैतिक अंगे त्याखाली दडपून जाऊ लागली आहेत. आपले सगळे प्रश्न नैतिक अंगाच्या दडपण्यामुळे निर्माण झाले आहेत. हे सगळे समजून घ्यायचं असेल, तर वाचन फार आवश्यक आहे. काहीएक प्रमाणात सुसंस्कृत होण्यासाठी वाचन गरजेचेच आहे. त्यासाठी अशा प्रकारचा ग्रंथजागर पुन्हा पुन्हा व्हायला हवा, असे पठारे यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.