आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर,पण गुरांची

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अरे, गुरांची डॉक्टर का तू ? त्यापेक्षा कोणत्या वैद्यकीय शाखेला प्रवेश नाही मिळाला का?’ अशा प्रश्नांना पशुवैद्यकाला सामोरे जावे लागते. या सगळ्यांवर मात करत डॉ. शुभांगी देवकर या युवतीने वेगळी वाट चोखाळली आहे. डॉ. शुभांगी सोलापूर जिल्ह्यातील करकंब-भोसे (ता. पंढरपूर) येथील. आई गृहिणी व वडील जलसंपदा विभागात सेवेत असून त्यांच्या पाठबळावर त्यांनी ही वेगळी वाट निवडली. डॉक्टर होण्याचे ध्येय त्यांना लहानपणापासून खुणावत होते. एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशाची संधी अवघ्या पाच गुणांनी हुकल्याने त्यांनी पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

लहानपणापासून असलेल्या संशोधक व चिकित्सक वृत्तीमुळे त्यांनी प्राण्यांमधील रोग, त्याची कारणे, उपचार याबाबत संशोधन सुरू केले. कुत्रे व मांजरांमध्ये पसरणा-या ‘पारोव्हायरस’ या रोगाच्या संशोधनासाठी अनेक नवनवीन तंत्रांचा वापर केला. त्याचा फायदा पशुवैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतोय. सध्या त्या सांगोला पंचायत समितीमध्ये पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ‘युवतींनी धाडस अन् वेगळे काम करण्याची जिद्द बाळगल्यास या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी दार ठोठावत आहेत,’ असे त्या म्हणतात.

माणसांवर उपचार करण्याइतकेच प्राण्यांवर उपचार करणे जोखमीचे असते. मुक्या जनावरांना जीवनदान देण्याचे काम डॉ. स्वाती आवारे करतात. माळशिरस येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे माहेर उस्मानाबादेत असून लहानपणापासून त्यांना पाळीव प्राण्यांची आवड होती. परभणी येथे त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण सुरू असताना त्या एका क्लिनिकमध्ये सरावासाठी जात होत्या. आपल्याकडे आलेल्या पेशंटला कुत्रा, मांजर असे म्हणायचे नाही हा पेट प्रॅक्टिसचा नियम त्या या क्लिनिकमध्ये शिकल्या. पेशंटला तपासण्यासाठी झोपवणे, तोंड बांधणे, कान साफ करणे, जखमांवर ड्रेसिंग करणे प्राण्यांना दिल्या जाणा-या लस, या गोष्टी डॉ. स्वाती यांनी अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच शिकून घेतल्या.

त्यांचे पती डॉ. कैलास आवताडे पशुवैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत असून त्यांचे मार्गदर्शन असल्यामुळेच, आपण पशुवैद्यकीय क्षेत्रात धाडसाने कार्यरत असल्याचे त्या म्हणाल्या. पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना रेबीज या आजाराबाबत जनसामान्यांत अपूर्ण माहिती रुजल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी येणा-या रुणांच्या मालकांना लसीचे महत्त्व व लस न टोचल्यास होणा-या दुष्परिणामांविषयी माहिती सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्या दवाखान्यात लसीची मागणी करत लोक येऊ लागले, तेव्हा त्यांना समाधान वाटले. ग्रामीण भागात अत्यल्प सुविधांमध्ये त्यांनी अवघडलेल्या गायी व म्हशींची प्रसूती केलेली आहे.

डॉ. नीलाक्षी जगताप सोलापूरच्या पॉलिक्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. ‘प्राण्यांचे डोळे अतिशय बोलके असतात, त्याद्वारे ते आपल्याशी संवाद साधतात, फक्त ती भाषा आपणाला समजली की त्यांच्याशी आपली गट्टी जमते. आजार किंवा एखाद्या व्याधीने त्रासलेल्या जनावराची प्रकृती सुधारल्याचे त्यांच्या डोळ्यातील भाव पाहून समजते,’ असे डॉ. जगताप यांनी सांगितले. खेड्यामध्ये एक महिला पशुवैद्यक म्हणून कुतूहलाने लोक त्यांच्याकडे बघत. खेड्यांमध्ये प्राण्यांवर उपचार करून घेण्यासाठी पशुपालकांचे जत्थेच्या जत्थे त्यांच्याकडे येत.

सुचित्रा गडद जखमी पाळीव प्राणी व गाढवांवर उपचार करतात. डॉन्की सेंच्युरी इंडियाच्या माध्यमातून त्यांनी पशुवैद्यकीय कार्याला सुरुवात केली. रस्त्याच्या कडेला जखमेने विव्हळत पडलेले एखादे गाढव दिसताच, सुचित्रांना मोबाइलवरून त्याची माहिती मिळते. क्षणार्धात त्यांचे पथक उपचारांसाठी घटनास्थळी रवाना होते. ‘अस्वच्छ ठिकाणी कशी जाऊ, त्या जखमांवर उपचार कशी करू,’ अशा कोणत्याही शंका त्यांच्या मनात कधीच निर्माण झाल्या नाहीत. केवळ एकच ध्यास की तो पेशंट बरा झाला पाहिजे. गाढव या प्राण्याबाबत बोलताना डॉ. सुचित्रा म्हणतात, ‘हा प्राणी अत्यंत प्रामाणिक अन् मेहनती आहे. त्याच्यावर कितीही भार लादला तरी ते बिचारे कधीच मालकाला कोणत्याही पद्धतीचा फटका देत नाही. गाढवाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा प्राणी कधीच घाण किंवा साठवलेल्या डबक्यातील पाणी पीत नाही. हा गुण त्यांच्याकडून माणसानेदेखील घेण्यासारखा आहे.’