आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आजूबाजूची मोठी माणसं कशी वागतात, काय काय कामे करतात त्याप्रमाणे आपणही सर्व करून पाहावे असे कोजागिरीला वाटत होते. बाजारात गेल्यावर भाजीवाल्याची तागडी आपणही उचलून भाजी मापावी असे तिला वाटायचे. ती तागडी हातात पेलण्याचे तिचे वय नव्हते. मग घरीच आपण तागडी करूया असे ठरले. हिंगाच्या रिकाम्या डब्याची झाकणं म्हणजे पारडी झाली. एक लाकडाची आडवी दांडी घेऊन झाकणांना तीन ठिकाणी भोक पडून दो-यांनी पारडी तागडीच्या दांडीला अडकवली. वजनासाठी रस्त्यातून गोळा केलेले जुने नट्स जमा केले होते. झालं. वस्तूंचं दुकान टाकलं. कोजागिरीच्या दुकानात पानं, फुलं, सागरगोटे, बांगडीच्या काचा अशा असंख्य वस्तू होत्या. प्रत्येकाच वजन करणे, दोन्ही पारडी समान वजन टाकून कशी तोलता येतात, मग एका पारड्यात थोडेसे वजन आणि दुसरीकडे मोठे नट ठेवल्यावर काय काय होते हा एक-दोन दिवसांचा मस्त खेळ झाला. वजन एकसारखे होणे हे सीसॉवर बसल्यावरही कसे आवश्यक असते हेही बाबा कोजागिरीला समजावून सांगत होता. पारडी वर-खाली होत असतील तर समतोलात कशी आणायची यात कोजागिरी तरबेज झाली होती. असेच एकदा त्या तिघांनी मिळून टाइपरायटरच्या रिबनच्या बॉबिन वापरून गाडीची चाके बनवली. गाडी थर्माकोल, पुठ्ठा, पारदर्शक प्लास्टिक वापरून केली होती.

या गाडीचा ड्रायव्हर कोजागिरीच्या खोडरबरच्या डबीचा पिगी होता. हे छोटे प्राणी असेच साठायचे. ते कधी गाडीचे ड्रायव्हर तर कधी घरीच तयार केलेल्या झूमध्ये असायचे. ही चारचाकी गाडी मजबूत असल्याने कोजागिरी ती दोरीने बांधून घरभर फिरवत असे. त्यातील ड्रायव्हरच्या जागी आपणच आहोत असे कोजागिरीला वाटायचे. ही गाडी, तागडी आणि अशी कितीतरी खेळणी तयार होता होता कोजागिरीही मोठी होत होती.

एका सुटीत कोजागिरी तिच्या खेड्यातील आजोबांच्याकडे गेली होती. शांते, शेतचा कापूस आहे, मुलांसाठी काहीतरी करायला हरकत नाही, आजोबांनी म्हणायचा अवकाश की शांता सर्व मुलांना घेऊन कामाला लागली. जुन्या बनियनचे कापड वापरून एक टेडीबेअरची निर्मिती झाली. तो मुलांना गुबगुबीत केसवाला वाटेना. मग त्याला केसांची कातडी येण्यासाठी काय करता येईल, असं मुलांनाच तिनं विचारलं. कोजागिरीला तिचा मऊ मऊ टर्किश टॉवेल आठवला. याचा कोट केला तर.... तिचे डोळे चमकले.

तपकिरी रंगाचा टॉवेल घेऊन टेडीला छान कोट शिवला. टेडीला कोट व पँट घालणे व काढणे हाच एक मजेदार खेळ झाला. कोजागिरीचा टेडी कोट व पँट काढू-घालू शकतो ही अद्भुत बातमी पसरायला वेळ लागला नाही. शेजारच्या सर्व मित्र-मैत्रिणींमध्ये हा टेडी जाम प्रसिद्ध झाला.

आजोबांच्या गोठ्यामध्ये गुरं असायची. त्यांना खायला धाटांचा चारा टाकलेला असायचा. गोठ्यात जाऊन गुरांचे चारा खाणे तासन्तास पाहत राहायला कोजागिरीला व तिच्या भावंडांना फार आवडायचे. धाटांची वेगवेगळी खेळणी करायला कोजागिरी तिथेच शिकली. कित्येक वेळा तर मुलं धाटांच्या ढिगावरच कोप-या त बसलेली असायची. धाटांच्या वरच्या चोया सोलून मधल्या मऊ भागात खोचून शांताने त्यांना रवी, चष्मा, चाकांची बैलगाडी, बैल अशी खेळणी तयार करायला शिकवले होते. कोजागिरीने या चोया विणून चटई तयार केली. धाटांचा हा खेळ खूप दिवस लक्षात राहिला. घरी शहरात आल्यावर धाटं नव्हती. पण जुन्या केरसुण्यांच्या दांड्या वापरून एक छान दागिन्यांचा डबा कोजागिरीने तयार केला होता. त्या डब्याकडे पाहून कोजागिरीला चारा खाणारे गोठ्यातील गाय व वासरू आठवायचे.

aruna.burte@gmail.com