आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी काळजी करू नकोस !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुकेताच्या मुलीची म्हणजेच मिनूची बातमी कळल्यावर शांताच्या पायाखालची जमीन सरकली. ऑफिसमधील चार-पाच जणी मिळून सुकेताला भेटायला गेल्या ख-या, पण सुकेताला कसे सामोरे जावे, तिची समजूत कशी काढावी, या भावनेनं शांताच्या गळ्यात आवंढा दाटून येत होता. ‘हे बघ पत्र. कसे लिहिले आहे. म्हणे माझी काळजी करू नकोस...’ सुकेताने मिठी मारून भडभडून रडत पत्र पुढ्यात धरले. सुरेख अक्षरात इंग्रजीतून पत्र लिहिले होते. मिनूने लिहिलेले शेवटचे पत्र! फक्त एकोणीस वर्षांची मिनू. गेल्या वर्षी बारावीत मार्क कमी पडल्याने मेडिकलचा प्रवेश हुकल्याने नाराज झालेली. या वर्षी मायक्रोबायॉलॉजी घेऊन पदवीचे पहिले वर्ष करणारी. कुठे काय बिनसले? हातातून काय निसटले? का जगणे नकोसे वाटले? शांताला पत्रातील अक्षरे दिसेनाशी झाली. पुढ्यातील सुकेता, मिनूची आई कशी समजूत काढणार तिची?


सुकेता सारखी बोलत होती, ‘नेहमीसारखे ऑफिस संपवून घरी आले. दोन-चारदा बेल केल्यावरही मुलीने दार उघडले नाही. बहुधा कुंभकर्णासारखी झोपली असणार असे वाटून खिडक्यातून डोकवावे म्हणून तळमजल्यावरील घराच्या तिन्ही बाजूंनी फिरले. सर्व खिडक्या बंद होत्या. घरातील टॉमी आणि पोपट दोघांचा आवाज नव्हता. काहीच सुचेना. शेजारी गोळा झाले होते. आतून कड्या असल्याने चावीवाल्याकडून दार उघडेचना. दार शेवटी तोडावे लागले. आतील दृश्य बघून कोसळलेच. तिने गळफास लावून घेतला होता.’


सुकेता स्वत:शीच बोलत होती. ‘बारावीनंतर मागचे वर्षभर ती छान कॉलेजमधे जात होती. आमचा काही वादविवादही होत नव्हता. पण नाही म्हणायला दोन दिवसांपूर्वी राष्‍ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचे पत्र आले होते. त्या पत्राकडे माझे फारसे लक्षही गेले नव्हते. नवीन कोर्ससाठी कॉलेज सुरू झाल्याने मुलगी त्यात रमली असेल असे वाटत होते. अचानक असा स्वत:चा घात केला मुलीने.’


शांताला आठवले, चार महिन्यांपूर्वी सुकेता म्हणाली होती, ‘हल्ली मिनूचे लक्ष नसते. सारखे तिचे फोनवर हळू आवाजात संभाषण सुरू असते. मग मी स्पष्ट विषयाला तोंड फोडले. ख्रिश्चन मुलाच्या ती प्रेमात पडली आहे. वडिलांच्या पश्चात मी या दोघांना मोठे केले. याआधीही मी तिला समजावून सांगितले होते. मला हे अजिबात पसंत नाही. त्यावरून आमचा वाद झाला. एकदा मिनूशी तू बोलशील का?’ ऑफिसमधे अनेक जण शांतासमोर आपले मन मोकळे करत.


सहज भेटायला गेलेल्या वेळी शांताने संवाद साधल्यावर मिनू म्हणाली होती, ‘मावशी, माझ्या दादाचा तो मित्र आहे. माझी आई मला साधे त्याच्याबरोबर बोलूसुद्धा देत नाही. आमची मैत्री आहे. दादा शिक्षणासाठी बाहेरगावी गेला. तर याला घरी यायची बंदी का? मलाही शिक्षणासाठी बाहेरगावी जायचे आहे. मी पत्राची वाट पाहत आहे. आईला कसे सांगावे तेच समजत नाही.’


शांता विचार करत राहिली. मुलीचे घरात वावरणे, तिचे शब्दाविना चाललेले संवाद, तिचा नेहमीचा दिनक्रम, त्यामधे खास तिला वेळ देणे या आणि अशासारख्या गोष्टी छोट्या वाटतात. पण त्यातूनच जोडलेपण टिकून राहण्याच्या शक्यता तयार होतात आणि वाढतात. आईच्या भूमिकेतून नेमके हातून काय निसटले असेल? मूल पाहता पाहता तारुण्यसुलभ आकर्षण आणि मैत्री या वळणावर येते. त्या वेळी संवादाचे पूल जोडलेले ठेवणे किती अवघड असते याची शांताला कल्पना होती. त्या दिवशी ती मिनूला म्हणाली होती, ‘आईला काळजी वाटणे स्वाभाविक आहे. आता तू मोठी झालीस. तू विचारी आहेस. मेडिकलला प्रवेश मिळाला असता तर तुला आवडले असते. आयुष्यात अनेक शक्यता असतात. असे स्वत:ला बंद करून घेऊ नकोस. तुला आईचा राग येणे मी समजू शकते. कधी खूप राग आला तर माझ्याशी बोल.’ मिनूचा चेहरा शांताच्या मनातून हलत नव्हता. बहुधा बाहेरगावी शिक्षणासाठी जाण्याची आस हा शेवटचा तंतू तुटला आणि तिचा तोल गेला. त्या क्षणी शांतामावशीला फोन करण्याचा अवधी तिला मिळाला असता तर... विचारांची आवर्तने सुरू होती. शांता घरी पोहोचली. मिनूला मनात घेऊनच. कोजागिरीचा बाबा घरी आल्यावर शांता बोलत होती. कोजागिरी शेजारच्या तिच्या खोलीत अभ्यास करत होती. बोलणे ऐकणे बरोबर नाही असे वाटून कोजागिरी आईबाबाजवळ गेली. म्हणाली, ‘मी ऐकले आहे तुमचे बोलणे.’ कोजागिरीला म्हणायचे होते, ‘हे काहीतरीच. मेडिकल, इंजिनिअर इकडे जायला मिळाले नाही म्हणून स्वत:ला मारून टाकायचे? ती मुलगी अशी कशी? मैत्रिणी नव्हत्या का तिला? आई तू माझी काळजी करू नकोस. मलाही बारावीला चांगले मार्क हवे आहेत. पण पडले नाहीत, पाहिजे तिथे प्रवेश मिळाला नाही तर मी काही असे करणार नाही.’


आईच्या चेह-याकडे पाहून कोजागिरी यापैकी काहीच म्हणाली नाही. आईला खूप वाईट वाटत आहे हे तिच्या लक्षात आले होते. जवळ जाऊन हात हातात घेत शब्दाविणा संवाद करत राहिली. ब-याच वेळाने गळ्यात पडत म्हणाली, ‘माझी तू बिलकुल काळजी करू नकोस गं!’