आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दातांना ‘गृहीत’ धरू नका...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीदात हे निरोगीच राहणार हे आपण जणू गृहीतच धरून चालत असल्याने आपण दिवसभरात काहीही अतिथंड,अतिगरम, मसालेदार खातच असतो, तेही वर्षानुवर्षे. मग निष्काळजीपणामुळे दाढदुखी सुरू झाली की त्यांच्या ज्या वेदना संपूर्ण शरीरात पसरतात, त्या किती दु:खदायक असतात ते आपण सर्वजण अनुभवतोच. याबाबत बोलताना सोलापूरचे दंतरोगतज्ज्ञ डॉ.संदीप करमाळकर म्हणाले की, शरीराच्या कोणत्याही भागात सेप्टिक झाले की, ते बाहेर येण्यासाठी जागा तरी असते, पण दातांबाबत ही स्थिती नाही. एकतर दात घट्ट असतात, त्यांच्या खालची हाडेही घट्ट असतात. त्यामुळे झालेले सेप्टिक बाहेर येण्यासाठी जागाच शिल्लक राहात नाही. त्यामुळे वेदना टाळण्यासाठी आपण दातांची वेळचेवेळी काळजी घेतो का हे महत्त्वाचे आहे.


ज्या गोष्टींमुळे दात प्रामुख्याने बिघडतात याला आपल्याच सवयी कारणीभूत आहेत. त्याच जोडीला गुटखा, तंबाकू तोंड व पर्यायाने दातांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडवतात. डॉ.करमाळकर पुढे म्हणाले की, पाश्चिमात्य लोकांच्या आहारशास्त्राची आपण नक्कल करतो, पण ते जसे दातांची न विसरता दंतवैद्यकाकडून तपासणी करून घेतात, जसे न विसरता दोन वेळा ब्रश करतात, तसे भारतीय करतात का? आपल्याला प्रत्येक ठिकाणी एकच बाजू पाहण्याची सवय असते. दात साफ क रतानाही मिश्रीपेक्षा कोणतीही फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट आणि ब्रश महत्त्वाचा आहे. तो ब्रशही योग्य पद्धतीने वापरला तरच दातांचे आरोग्य टिकून राहते. अन्यथा दात किडणे ही आता एक कॉमन तक्रार आहे. आता दंतवैद्यकशास्त्रात बरीच प्रगती झालेली आहे, कोणत्याही कारणाने दात काढावा लागला तर डेंटल इम्प्लांट म्हणजे दंतरोपण ही एक आधुनिक सोय आहे. सिरॅमिक आणि मेटल फ्री सिरॅमिक वापरून कृत्रिम दात तयार होतात. उपचार खर्चीक असले तरी मोठ्या शहरात दंतरोपणाचे प्रमाण वाढत आहे. कारण, दातांच्या आरोग्याबाबत एकूणच लोकांमध्ये जागरूकता आली आहे. माऊथवॉश याचा रोज वापर नको. यातही आता प्रगती झालेली आहे. सीबीसीटी एक्स रे प्रकारात दातांची त्रिमिती इमेज म्हणजे डेंटल स्कॅन करता येते.त्याद्वारे दातांचे रोगाचे मूळ कोठे आहे ते कळते. डिजिटल रेडिओग्राफीमध्ये दातांच्या घेतलेल्या एक्स रेची इमेज काँम्प्युटरवर लगेच दिसते. ओपीजी तपासणीत संपूर्ण दाताचा नकाशा,जबडा दिसतो. डेंटल ऑपरेटिंग मायक्रोस्कोपद्वारे दातांचा आकार मोठा दिसतो. अ‍ॅपेक्स ऑपरेटरद्वारे दातांची लांबी समजते. कोणत्याही डेंटिस्टच्या वापरातील ही उपकरणे आहेत. दातांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी रुग्ण किती काळजी घेतो हे महत्त्वाचे आहे.


दाढ जोवर दुखत नाही,तोवर आपण त्याकडे लक्ष देत नाही. दाढ किडून संपूर्ण काढून टाकण्याची वेळ येण्याअगोदर आपण वर्षातून नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे, यावर त्यांनी पुन्हा भर दिला.


शब्दांकन : अमोल अंकुलकर