आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटदुखीचे योग्य कारण शोधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटदुखी वारंवार होत असेल तर निदान करणारी व्यक्ती अनुभवी आणि तज्ज्ञ असावी लागते. निर्णय घेण्यातील दिरंगाई किंवा चूक एखादेवेळी जीवघेणी ठरू शकते. प्रत्येक वेळी पोटदुखीचा होणारा त्रास हा नेमका कशामुळे होतो आहे, याचे निश्चित निदान करता आले तरच त्यावरील उपायाबद्दल खात्री देता येते. अंदाजावर आधारित उपाय योग्य ठरले तर ठीक, परंतु योग्य निदानाच्या अभावी केलेल्या उपचारात धोका संभवतो.
एखादे वेळेस निदान योग्य झालेले नसताना रुग्णाला बरे वाटावे या हेतूने केलेले उपचार फसवे ठरू शकतात. यामुळे रुग्णाला काही काळ बरे वाटेल पण मूळ विकार तसाच राहतो. तो वाढत जातो आणि गंभीर स्वरुप धारण करतो. उदा. रुग्ण डॉक्टरला उलटी झाल्याचे सांगतो, त्याला उलटी थांबवण्याचे औषध सुचवले जाते. त्यामुळ रुग्णाला बरे वाटते. पण पोटात अपेंडिसायटिससारखा आजार आत राहतो. काही तासानी अपेंडिक्स फुटले तर जीवघेणे दुखणे सुरू होते. प्रथम पोट तपासूनच नीट निदान करून मगच उपचार करावे लागतात.
पोटदुखीची रुग्णांची तक्रार असते. त्याची अनेक कारणे असू शकतात. कोणत्याही उपचाराचा पाया शास्त्रशुद्ध निदान हाच असला पाहिजे, असे निदान झाल्याशिवाय उपचार करणे चुकीचे आहे. अगदी तात्पुरते बरे वाटण्यासाठी जुजबी उपचार कधी - कधी क्षम्यही असतात. परंतु तत्काळ बरे वाटण्यासाठी केलेल्या निदानाचा पाठपुरावा न करणे घातक ठरते. रुग्णाला बरे वाटणे ही स्थिती रुग्णाला आणि उपचार करणार्‍यालाही फसवी असू शकते.
पोट नेमके दुखते कोठे? पोट कोणत्या अवयवाच्या कामातील बिघाडाने हे समजणे ही निदानाची पहिली पायरी आहे. बहुतेकवेळा पोटातील एखादा अवयव पोटदुखीला जबाबदार असतो. जठर, लहान आतडे, आंत्रपुच्छ (अपेंडिक्स), मोठे आतडे, लिव्हर(यकृत), प्लिहा (स्पलिन), स्वादूपिंड(पॅनक्रियास), पित्ताशय (गॉलब्लायडर), मूत्रपिंड (किडनी), मूत्रवाहिन्या (युरेटर), मूत्राशय (युरिनर ब्लॅडर), पुरस्त ग्रंथी (प्रोटेस्ट) असे अनेक अवयव आपल्या पोटात असतात. या प्रत्येक अवयवाची पोटातील जागा ठरलेली असते. दुखण्याच्या जागेवरून अवयवयाचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांना येतो. उदा. पोटाच्या उजवीकडे खाली दुखले तर आंत्रपुच्छाचा दाह (अपेंडिसायटिस), ची शंका येईल. उजवीकडे वर बरगड्याखाली दुखल्यास जठराचा आणि बेंबीच्या आसपास दुखल्यास लहान आतड्याचा विचार करावा लागतो. कमरेच्या वरच्या भागात दुखल्यास एका बाजूचे दुखणे असल्यास मूत्रपिंडाचा, पाठीला पट्टयासारखे दुखले तर स्वादुपिंडांचा विचार करावा. जेव्हा डॉक्टर नेमके दुखते कोठे हे विचारतात तेव्हा नेमके दुखणे कोठे आहे हे सांगणे महत्त्वाचे असते.