आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगड की माती ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आहाराचे गुणधर्म आहार तयार करावयाच्या पद्धतीवर अवलंबून असतात, तसेच कोणत्या धातूच्या पात्रात आहार तयार करतो यावरसुद्धा अवलंबून असतात. वेद किंवा पुराणकाळात विविध धातंूच्या पात्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यापूर्वीच्या काळाचा अभ्यास केल्यास लक्षात येते की अश्मयुगात दगडाच्या भांड्यांचा उपयोग करण्यात येत असे.
(मृत्तिकापात्र) ज्या पात्रांमध्ये अन्न शिजवतो त्याचे गुणधर्म अन्नामध्ये येत असतात, इतका सूक्ष्म विचार 2000 वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञांनी केलेला होता. ‘संस्काराहो गुणान्नरधानम।ते गुणाक्ष्ण तोटा अग्नि संन्निकर्ष देशकालभ्राजनवासन’ या सूत्राप्रमाणे अन्न शिजवत असताना ते कुठल्या धातूच्या पात्रात शिजवले जाते त्याचे संस्कार अन्नावर होत असतात व परिणामी गुणधर्म बदलत असतात.
पुराणकाळापासून 21व्या शतकापर्यंत सुवर्णापासून प्लास्टिकच्या भांड्यांपर्यंत प्रवास चालत आला आहे. या धातूंच्या पात्रांपैकी कुठले धातूचे भांडे कुठल्या पदार्थासाठी वापरावे हे ठरलेले आहे. मध्यंतरीच्या काळात हिंडालियमच्या पात्रांचा वापर स्वयंपाकासाठी खूप होत होता. त्याचे काय परिणाम, दुष्परिणाम होतात हे बघणे गरजेचे आहे. भांड्यांचा विचार करताना ती कशासाठी वापरायची आहेत याचा विचार होणे गरजेचे असते. भांडी साधारणपणे तीन कारणांसाठी वापरली जातात.
स्वयंपाक करण्यासाठी.
तयार स्वयंपाक वाढण्यासाठी.
अन्न ठेवण्यासाठी.
मध्यंतरीच्या काळात अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्याचा उपयोग खूप प्रमाणात वाढला. ही भांडी वजनाला हलकी, लवकर स्वच्छ होणारी व स्वस्त असल्याकारणाने जास्त प्रमाणात वापरात येऊ लागली. अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकासाठी करणे तेवढे सयुक्तिक नाही. कारण अ‍ॅल्युमिनियम वातावरणातील आॅक्सिजनच्या संपर्कात येऊन अ‍ॅल्युमिनियम आॅक्साइड तयार होते. ते अन्नामध्ये मिसळले जाते. हे अन्नात मिसळलेले अ‍ॅल्युमिनियम आॅक्साइड आपल्या मेंदूमध्ये किंवा पेशींमध्ये जमा होते व विस्मरणासारखे आजार उद््भवतात. त्याचप्रमाणे ते किडनीमध्ये जमा होत जाते व किडनीसंबंधीचे आजार निर्माण होतात. साधारणपणे चहा, मीठयुक्त पदार्थ, पालेभाज्या, लिंबू, चिंच व टोमॅटोयुक्त पदार्थ अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये तयार करू नयेत.
अलीकडच्या काळात नॉनस्टिक भांड्यांचा वापर खूप वाढला आहे. या प्रकारच्या भांड्यांमध्ये धातूवर टेफलॉनचे आवरण लावलेले असते. अशी भांडीसुद्धा जपून वापरणे गरजेचे असते. टेफलॉनचा स्तर निघून गेलेला असल्यास किंवा अर्धवट निघालेला असल्यास ती वापरू नयेत. कारण अशा भांड्यात अन्न शिजवल्यास टेफलॉन अन्नामध्ये मिसळू शकते, जे आरोग्यास घातक असते.
सध्याचे युग हे प्लास्टिक युग आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये प्लास्टिकचा वापर अन्न शिजवण्याच्या भांड्यांसाठीसुद्धा केला जातो. मायक्रोवेव्हमध्ये काचेऐवजी प्लास्टिकची भांडी वापरली जाऊ लागली आहेत. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी व शीतपेये आता सर्रास ठेवली जातात. प्लास्टिक विघटित होत नसल्याने त्याचा वापर टाळावा. शक्यतो पॉलिकार्बोनेट प्लास्टिकची भांडी गरम करू नयेत. त्यात गरम वस्तू ठेवू नये. पॉलिइथिलीन किंवा पॉलिप्रोपिलीनपासून तयार झालेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचा स्वयंपाकात वापर करणे योग्य ठरते. काही प्लास्टिकच्या बाटल्यांमधून बिसफिनॉल वा थायलेट्ससारखे घातक रसायन अन्नामध्ये येऊ शकते. ज्यांमुळे काही अंत:स्रावी ग्रंथींवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो गरम दूध, गरम चहा मुलांना प्लास्टिक बाटल्यांमध्ये देऊ नये. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ठेवलेल्या पाण्यात जंतूंचा प्रादुर्भाव खूप लवकर होतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर अन्न शिजवण्यासाठी टाळलेला बरा.
कोणती भांडी वापरणे योग्य? आपण कोणता पदार्थ तयार करणार आहोत? तो आंबट आहे का? तो आपण किती गरम करणार आहोत? तो टिकवून ठेवणार आहोत का लगेच संपवणार आहोत? त्यात मिठाचे प्रमाण जास्त आहे का ? यासारख्या गोष्टींवर कोणती भांडी वापरावी हे ठरते. ज्यामध्ये जंतूंची वाढ लवकर होत नाही, जो धातू अन्नामध्ये उतरत नाही, जो धातू जास्त उष्णता दिल्यावर अन्नासोबत प्रक्रिया करत नाही व जो जास्त उष्णता सहन करू शकतो त्या धातूंची भांडी वापरावी. दैनंदिन व्यवहारात स्टेनलेस स्टीलची भांडी वापरणे जास्त सयुक्तिक ठरते. लोणचे, साखरांबा किंवा तत्सम पदार्थ साठवण्यासाठी काचेची किंवा मातीची भांडी वापरावी. दही, ताक, लोणी ठेवण्यासाठी मातीची भांडी योग्य ठरतात. मद्य तयार करण्यासाठी लाकडाची भांडी वापरावीत. पाणी साठवण्यासाठी मातीची भांडी योग्य ठरतात. ज्या व्यक्तींना यकृताचा काही त्रास नाही त्यांनी तांब्याच्या भांड्यांमधले पाणी वापरावे. या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात जंतूंची वाढ लवकर होत नाही. स्वयंपाक करताना भांडी स्वच्छ करून घेणे आवश्यक असते. भांडी धुताना वापरलेला साबण भांड्यांना राहिलेला नाही, हे पाहणे अत्यावश्यक आहे.
sangitahdesh@rediffmail.com