आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सेंज ऑफर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या फेव्हरिट मॉडेलचं बोलणं ऐकून रूहीचे डोळे उघडले होते. आयुष्यात आता स्वत:चं वागणं बदलण्याचा तिने निश्चय केला. विशेष म्हणजे नुसता निश्चयच केला नाही, तर तो प्रयत्नपूर्वक अमलातही आणला. जंक फूडऐवजी घरच्या ताज्या जेवणाला ती पसंती देऊ लागली. ती आता क्वचितच जंक फूड घ्यायची. फिटनेससाठी योगासनांचा क्लासही लावला. जुनी जीवनशैली बदलणं अवघड असलं तरी अशक्य नाही हे तिला समजलं होतं. खेरीज ती अधिक सकारात्मक जगायला शिकली होती.
तिच्या मित्रमैत्रिणींनाही रूहीच्या वागण्यातल्या बदलाचं आश्चर्य वाटायचं. तिच्या या बदलाचं रहस्य ते तिला विचारायचे. तुम्हीही आता माझ्यासारखं जगायला शिका, असं ती हसून सांगायची. माणूस स्वत:च्या मनाला-शरीराला किती गृहीत धरतो नाही! म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले नवनवीन बदल, नवीन उपकरणांसंदर्भातली माहिती, जागतिक घडामोडींसह सर्वच जाणून घेण्याची माणसाला कायम उत्सुकता असते. मात्र आपलं शरीर, त्याचं महत्त्व अणि त्याचं चालणारं कार्य, या सर्वांचा आपल्या भविष्यावर होणारा परिणाम याविषयी जाणून घेण्यास फारच कमी लोक उत्सुक असतात. अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सुदृढ शरीर आणि मनाची नितांत आवश्यकता असते. हे माहीत असूनही त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. जिथं मोठी माणसंच याबाबतीत अज्ञानी असतात तिथं तरुण मुलांबाबत विचारच नको.
खरं तर कुमारवयातल्या मुलामुलींनी स्वत:च्या शरीराविषयी किमान कुतूहल म्हणून तरी सर्व जाणून घेणं अपेक्षित आहे. मात्र केवळ बाह्य रूपाला, दिसण्याला प्राधान्य देणारी ही पिढी स्वत:च्या शरीराबाबत खूप अज्ञानी असते. चांगलं दिसणं, सर्वांकडून कौतुक व्हावं म्हणून व्यवस्थित राहण्यात गैर काहीच नाही. मात्र केवळ बाह्य रूप खुलूून दिसणं हे शरीर सुदृढ असण्याचं लक्षण नाही. आणि म्हणूनच निदान स्वत:च्या शरीररचनेबाबत तरी प्रत्येकानं जाणून घेतलं पाहिजे.
सतत जंक फूडवर राहणं, वेळी-अवेळी जेवण, अति झोप किंवा अति जागरण, स्वत:च्या भविष्याबद्दलची गोंधळलेली अवस्था ही जवळपास सर्वच कुमारवयीन मुलांची लक्षणं. पौष्टिक आणि वेळच्या वेळी आहार घेणं, व्यायाम करणं आणि आयुष्याचं व्यवस्थित नियोजन करून शिस्तबद्ध रीतीने जगण्याचा वाडवडलांचा सल्ला उडवून लावणारी ही पिढी, असं वागून केवळ स्वत:च्याच आयुष्याचं नुकसान करून घेत नाही तर देशाचं भविष्यही असुरक्षित बनवत आहे.
मानवी शरीराचं महत्त्व, त्याचं कार्य आणि ते कार्य सुरळीत चालण्यासाठी शिस्तबद्ध आयुष्य जगण्याची आवश्यकता या वयातल्या मुलांना समजावण्याची नितांत आवश्यकता आहे. दुर्दैवाने अनेक पालक हे करू शकत नाहीत. शिवाय या वयातली अनेक मुलंही याबाबतीत घरच्यांचे ऐकत नाहीत. कुठलेच निर्बंध नसलेले आयुष्य जगताना त्याचा शरीरावरही परिणाम होतच असतो, पण शरीरावर होणारे याचे दुष्परिणाम लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कारण दुर्दैवाने इतर सर्व वस्तूंच्या एक्स्चेंज ऑफरप्रमाणे शरीर एक्स्चेंज करण्याची कोणतीच ऑफर उपलब्ध नाही. म्हणून शरीरावर दुष्परिणाम करणार्‍या एखाद्या गोष्टीचं व्यसन माणसाचं शरीर पोखरून टाकतं. अगदी आयुष्याचा शेवट करेपर्यंत. म्हणूनच स्वत:चा आणि देशाचा भविष्यकाळ उज्‍जवल हवा असे वाटत असेल तर आयुष्यावर प्रेम करा, त्याचा सन्मान करा अणि इतरांनाही करायला शिकवा. अर्थपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे नक्कीच जमेल. हो ना?
gnosis@rediffmail.com