आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकात्मक, समीक्षात्मक आणि आस्वादात्मक लेखनाचा संगम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समीक्षक आणि साहित्यिक या दोन्ही लेखनप्रकारांमधील अत्यंत मान्यवर नाव असणा-या डॉ. विजया राजाध्यक्ष यांना नुकताच कुलकर्णी प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक प्रतिभासंपन्न लेखिका म्हणून त्या वाचकांना परिचित आहेत, त्याचप्रमाणे टीकात्मक, समीक्षात्मक आणि आस्वादात्मक अशा लेखनाचा त्रिवेणी संगम विजयांच्या लेखनातून प्रत्ययास येतो. त्यांनी संपादित केलेली ग्रंथसंपदाही मोठी आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी लेखनविश्वात डॉ. विजया राजाध्यक्ष हे अत्यंत उल्लेखनीय नाव आहे. दर्जेदार कथालेखनाच्या जोडीने विलक्षण दृष्टीने त्यांनी केलेली समीक्षात्मक साहित्यसंपदाही त्यांच्या स्वतंत्र लेखनाइतकीच महत्त्वपूर्ण आहे. अध्यापनाचा दीर्घ अनुभव, साहित्य आणि साहित्यिकांचा सहवास, उत्तमोत्तम गुरूंकडून मिळालेले संस्कार, प्रतिभेचे वरदान आणि प्रतिभेला स्वत:च्या दीर्घ आणि सूक्ष्म अभ्यासातून त्यांनी दिलेली वैचारिक, तर्कसंगत बैठक, यांच्या मेळातून त्यांचे साहित्यिक कर्तृत्व बहरले आहे. त्यांच्या या कर्तृत्वावर अनेक सन्मान, पुरस्कार यांची राजमान्य मोहोरही अनेकदा उमटली आहे. त्यांच्या मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ या ग्रंथाला 1993 मध्ये साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. 2001 मध्ये इंदूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. त्यांना पहिल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा मागोवा घेताना त्यातील वैविध्य प्रकर्षाने जाणवते. कथा, कादंबरी, समीक्षा, संपादने, निबंध-लघुनिबंध, नाटक, बालसाहित्य आणि स्फुटलेखन असा त्यांच्या लेखनाचा परीघ विस्तारलेला आहे, तरीही कथालेखन आणि समीक्षालेखन हे विजयांच्या विशेष आवडीचे आणि सूक्ष्म परिशीलनाचे विषय बनलेले दिसतात. जास्वंद, दोनच रंग, अनोळखी, हुंकार, पांगारा, चैतन्याचे ऊन, समांतर कथा, अन्वयार्थ, कमान, आधी-नंतर आदी अनेक संग्रहातून त्यांचे कथाविश्व समर्थपणे वाचकांसमोर आले आहे आणि त्यांना उदंड प्रतिसादही मिळाला आहे. समीक्षात्मक लेखन हाही त्यांच्या लेखनाचा विशेष पैलू आहे. मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ या गाजलेल्या समीक्षात्मक ग्रंथाप्रमाणेच त्यांचे पुन्हा मर्ढेकर, प्रभाकर पाध्ये - वाङ्मयदर्शन, मराठी कादंबरी आस्वाद यात्रा, वेचक - विजया राजाध्यक्ष, वेध कवितेचा, वाङ्मयीन पत्रव्यवहार, बहुपेडी विंदा (चरित्र-आत्मचरित्र-समीक्षा), किती वाटा किती वळणं (कादंबरी समीक्षा), काही वाटा काही वळणं (ललित लेखन समीक्षा), आहे मनोहर तरी ...(वाचन आणि विवेचन - विजया आणि श्री. पु. भागवत) ही नावे सहज आठवतात.
याशिवाय अनुबंध, तळ्यात..मळ्यात हे लेखसंग्रहांचे संकलन, उत्तरार्ध ही कादंबरी, जानकी देसाईचे प्रश्न हे नाटक, कदंब हे बालवाचकांसाठीचे लेखन, आदिमाया (मराठी कवींच्या निवडक कवितांचे रसग्रहणात्मक संकलन), प्रबंधसार, मराठी वाङ्मयकोशासाठी लेखन (खंड चार), साहित्य : अध्यापन आणि प्रकार हे त्यांचे ग्रंथही प्रसिद्ध आहेत. आज वयाच्या ऐंशीच्या उंबरठ्यावरही विजया
लिहीत आहेत. त्यांचे हे लिहितेपण कायम राहावे आणि वाचकांना समृद्ध करत राहावे, या शुभेच्छा.