आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिकतेचा मोकळा अवकाश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लैंगिकता हा नुसता शरीर किंवा भावनिक असा मुद्दा नाही, तर आपल्या अस्तित्वाला आकार देणारा आणि आपणही आपल्या क्षमतेने ज्या विषयाला निदान आपल्यापुरते संपूर्णपणे बदलवून टाकू शकू आणि कदाचित त्यामागच्या तात्त्विक विचारांमध्येही परिवर्तन घडवू शकू, असा मोकळा अवकाश आहे...
मागच्या काळातल्या टीन-एजर्सना आसपासच्या जगाबद्दल, लैंगिकतेबद्दल कळायचे त्यापेक्षा आजच्या पिढीला थोडे जास्त कळते ही गोष्ट आता मान्य करायलाच हवी. एक तर इंटरनेट, सोशल नेटवर्किंग वगैरे व्यवस्था त्यांच्या हाताशी असतात. विविध दृक्श्राव्य माध्यमे साथीला असतात. त्यामुळे आधीच्या पिढीला या वयात माहीत असायचे त्याहून या मुलामुलींना खूपच माहीत असते. त्यामुळे ‘ही नवी पिढी आधीच्या पिढ्यांपेक्षा जास्त बुद्धिमान आहे,’ असेही घराघरातले पालक म्हणतात. कुठलाही प्रश्न पडला तर त्याचे उत्तर शोधायच्या ‘गुगल’सारख्या किल्ल्या आता मुलामुलींच्या हातात असतात. टीन-एजर्सना तर त्या विशेष प्रावीण्यासह वापरताही येतात. मनात स्वाभाविकपणे येणा प्रश्नांना इथे उत्तरे मिळतातच. एकेकाळी शाळांमध्ये लैंगिकता-शिक्षण म्हणजे ‘मुलींना मासिक पाळीबद्दलची माहिती देणे’ एवढाच अर्थ असे. मुलग्यांनाही लैंगिकता शिक्षणाची काही गरज असते, हे तर कुणाच्या गावीही नसायचे. आता सातवी-आठवीच्या मुलीदेखील ‘समलिंगी विवाहाला कायद्याची मान्यता अद्याप मिळालेली नाही आणि तशी मिळेपर्यंत ‘समलिंगी संबंधांची कुचेष्टा होणे’ कमी व्हायचे नाही’ अशा विषयावर बिनधास्तपणे आणि नीट चर्चा करू शकतात. बोलताना त्यांची मान ताठ असू शकते, इतकेच नाही तर नजरेतही आत्मविश्वास असू शकतो. पूर्वी शाळेत लैंगिकता शिक्षणाचा तास घ्यायला आधी कुणी जात नसे, पण जर कुणी गेलेच तर ते शिकवत असताना मुली खाली माना घालून जमिनीवर किंवा बाकावर तांदूळ निवडत बसण्याची अ‍ॅक्शन करत बसत. काही प्रश्न आहेत का, असे त्या शिक्षिकेने विचारले तर शाळेची लाज राखण्यापुरत्या वर्गातल्या ‘एच अँड सी’ (हुशार व चुणचुणीत) मुली ठरावीक एक-दोन प्रश्न विचारत. मुलग्यांच्या वर्गात मागे बसणारी तीन-चार मुले आधी हस्तमैथुनाबद्दल, नंतर गुदमैथुनाबद्दल प्रश्न विचारत, आणि मग असे प्रश्न आपण वर्गात विचारल्याबद्दल इकडेतिकडे गर्वाने बघत. पण म्हणून त्यांना काही विशेष समज असल्याचे जाणवे का, तर नाहीच.
आज हवी असलेली माहिती सहज उपलब्ध होते हे खरेच, पण तीही खोटी असायची शक्यता आहेच. इंटरनेटसारख्या माध्यमांचा सगळा आर्थिक व्यवहारच मुख्यत: जाहिरातींवर चालत असल्याने बघणाला गळाला लावण्याच्या मिषाने अपलोड केलेल्या ओंगळ चित्रफिती मुलांच्या हाताला सहज लागू शकतील, अशा उपलब्ध असतातच. कुणी काय बघावे किंवा बघू नये हा तर वैयक्तिक प्रश्न आहे, पण आपल्याला आपले एकंदर जगणे सामाजिक-मानसिक दृष्टीने समृद्ध असावे असे वाटत असेल तर आपण सतर्क राहणे हाच सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. गुगल किंवा कुठल्याही माहितीच्या कोठारात आपण बघत गेलो, तरी यातले काय भले, काय खरे आणि काय खोटे ते जाणत्या व्यक्तीला अचूकपणे कळतेच. अगदी क्वचितच गफलत होऊ शकते, नाही असे नाही, पण तेव्हाही ‘आपल्याला शंका आलेली होतीच, पण आपणच थोडे दुर्लक्ष केले’, असेच आपल्याला नंतर जाणवते.
लैंगिकता ही आपल्या सगळ्यांच्या जगण्याला वेढून राहणारी बाब आहे. आपल्या शरीराशी, मनाशी, उत्कटतेशी, प्रेरणांशी, उत्साहाशी, नातेसंबंधांशी, संवादाच्या विविध शक्यतांशी, खरे सांगायचे तर आपल्या जीवनातल्या प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीशी, निदान त्याकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनाशी लैंगिकतेचा संबंध आहे. असे असूनही आपल्याकडच्या सांस्कृतिक वातावरणात (त्यात आता बराच फरक पडलाय पण तरीसुद्धा) लैंगिकतेबद्दल साजरा विचार करण्याला एक प्रकारची अलिखित अमान्यताच आहे. या सांस्कृतिक दडपलेपणाचा परिणाम मुलींवर आणि मुलांवर काहीसा वेगवेगळा होताना दिसतो. मुलांचा विचार अधिकतर शारीर मुद्द्यापुरताच मर्यादित राहिलेला बहुतेक वेळा जाणवतो, तर मुली अधिकांशाने भावनिक. अर्थात कुणासाठीच ख अर्थाने तो मोकळेपणाने बोलण्याचा विषय अजूनही नाही. आजही लैंगिक विषयाबद्दलचे मत निडरपणे सांगत असल्याच्या फार फार तर आविर्भावापर्यंतच आपण जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करतो. लैंगिकता हा नुसता शारीर किंवा भावनिक असा मुद्दा नाही, तर आपल्या अस्तित्वाला आकार देणारा आणि आपणही आपल्या क्षमतेने ज्या विषयाला निदान आपल्यापुरते संपूर्णपणे बदलवून टाकू शकू आणि कदाचित त्यामागच्या तात्त्विक विचारांमध्येही परिवर्तन घडवू शकू, असा मोकळा अवकाश आहे. गेल्या निदान दोन-तीन पिढ्या आपल्या लैंगिकतेची आखणी चित्रपटांवरून करण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. जाहिराती आणि मालिका किंवा पांचट चित्रपटांमध्ये दाखवलेल्या तद्दन बाजारू नाचगाणी, नटवे रुसवेफुगवे, वगैरे वगैरेवरून आपली जीवनदृष्टी आखू नयेच. आपल्याला त्यातले काय आवडतेय, मानवतेय हे पाहावे. काही चित्रपटांनी, विशेषत: त्यातल्या अफलातून गाण्यांनी लैंगिकतेचे अनेक पदर फार तरलपणे उलगडण्याचा प्रयत्न जरूर केला, पण त्याच्याकडे नीट बघता न आल्याने असेल कदाचित, त्याचा परिणाम ‘लैंगिकता म्हणजे जीवनातला स्वप्नाळूपणा’ असा होऊन बसला. लैंगिकतेबद्दल आपल्या समजुतींची दारे आपण आपलीच उघडायला बघावे म्हणूनच हा सगळा खटाटोप आहे. या लेखमालेत एरवी लैंगिकतेवरच्या लेखात असते तशी शरीरातल्या पुनरुत्पादन संस्थेच्या कामकाजाची माहिती अजिबात नसेल. कुणाला त्याची आवश्यकता वाटत असेल तर फार तर ही सगळी माहिती व्यवस्थितपणे सांगणा संकेतस्थळांचा पत्ता देता येईल. या लेखमालेत आसपासच्या अनेक राजकीय, सामाजिक घटनांबद्दल आपण बोलू. मुख्य म्हणजे, लैंगिकतेच्या वाटेने त्या गोष्टींचा काय अर्थ लागतो हे तपासून पाहू. छोट्या-मोठ्या पडद्यावरून येणा काही गोष्टीही आपल्या मनमोकळ्या निरभ्र चर्चेत येतील. वाचकांच्या प्रतिसादाची नेहमीप्रमाणे मी नक्कीच वाट पाहत आहे.