आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूढाची उकल...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीवरील सजीवांची उत्क्रांती समजावून सांगण्यासाठी दोन कालखंड मानले जातात. पृथ्वीवर पहिला सजीव बिंदू तयार झाल्यापासून पहिल्या सजीव पेशीची निर्मिती होईपर्यंतचा पहिला कालखंड. आदिम पेशीपासून पुढे झाडे-पाने, जलचर, वनचर, अगदी माणसापर्यंतचा दुसरा कालखंड. ‘इव्होल्युशन’ या इंग्लिश शब्दाचा एक अर्थ वाहत्या काळाबरोबर होत जाणारा बदल, असाही आहे. या काळातील पहिला कालखंड अगदी धूसर. सजीव बिंदू कसा तयार झाला याबद्दल धर्माने, तत्त्वज्ञानाने, तसेच वैज्ञानिकांनी अंदाज बांधलेले आहेत. वैज्ञानिकांनी ‘प्रायमॉर्डियल सूप’ आदिम काढ्यासारखे प्रयोगही केले आहेत. हा सगळा ‘स्पेक्युलेशनचा’ मामला. अटकळ, अंदाज, कयास वगैरे. मग याबद्दल ‘लोकविज्ञानात’- ‘पॉप्युलर सायन्स’मध्ये काही लिहू नये का? असे नाही. पण हे सगळे अंदाज असल्यामुळे फारसे काही हाती लागत नाही. ‘पॉप्युलर सायन्स’ याचा अर्थ लोकांसाठीचे विज्ञान-लोकविज्ञान. या लोकविज्ञानाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे, समाजात ‘सायंटिफिक टेंपर’-‘वैज्ञानिक वृत्ती’ निर्माण करणे. पहिल्या कालखंडाबद्दलचे लेखन अंदाजे असल्यामुळे तसा ‘सायंटिफिक टेंपर’ निर्माण करत नाही. पुढचा कालखंड आदिम पेशी ते माणूस या उत्क्रांतीचा. या कालखंडाबद्दलचे पुरावे मिळाले. सूक्ष्म सजीवांबद्दलची सूक्ष्म माहिती हाती आली. याला जोड मिळाली, रसायन विज्ञानापासून भौतिकी विज्ञानातील प्रगतीची. हळूहळू धूसरपणा कमी झाला. विज्ञानविचार धिम्या पावलाने घट्ट पाय रोवून जमिनीवर उभा राहू लागला. थिअरीला प्रयोगाची जोड मिळाली. पुरावा- ‘एव्हिडन्स’ हा परवलीचा शब्द झाला. येथे विज्ञान व धर्म यातील फरक सुस्पष्ट झाला. ‘सायंटिफिक टेंपर’ची सुरुवात झाली. लोकविज्ञानाने हा ‘सायंटिफिक टेंपर’ निर्माण करून त्याचा प्रसार करण्यास मदत केली. ‘गोफ जन्मांतरीचे’ यासारख्या लोकविज्ञानावर आधारित पुस्तकाचे महत्त्व यासाठी आहे.
उत्क्रांती म्हणजे स्पर्धा, संघर्ष, ‘कॉम्पिटिशन’. या स्पर्धेत जो तगेल तो यशस्वी. हा भाग साधारणपणे सर्वांवर ठसलेला असतो. पण उत्क्रांतीचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, ‘को-ऑपरेशन’, सहकार. ही बाब ठसवून सांगण्याची गरज असते. ते या पुस्तकात चांगले उतरले आहे. एकपेशीय प्राण्यांपासून अनेकपेशीय प्राणी तयार झाले, ते सहकारामुळे. ‘मायटोकाँड्रिया’ या पेशींच्या बॅटर्‍या. या तयार झाल्या सहकारामुळे. सहकाराची अशी अनेक उदाहरणे देता येतील. हातात काटेरी दांडू घेतलेला राठ केसांचा माणूस उत्क्रांत झाला सहकारामुळे. आज आपण सगळ्यात प्रगत प्राणी असा माणसाचा समज झाला आहे. सागरतळातील खाचेतून अति गरम पाण्याचे झरे वाहतात. त्यात इतर कोणताही प्राणी जगू शकत नाही. पण एक विशिष्ट जीवाणू त्यात जगतो, वाढतो. माणूस या पाण्यात जगू शकेल? मग माणूस प्रगत का हा जीवाणू? त्या पर्यावरणात तोच जीवाणू प्रगत. म्हणजे सर्व प्राणी आपापल्या पर्यावरणात प्रगत असतात. उत्क्रांती हे सांगते. ‘गोफ जन्मांतरीचे’ या पुस्तकाचे तीन विभाग. जीवसृष्टीचे रहस्य, उत्क्रांती, मानवी जग. या तिन्ही भागात माहिती भरपूर. येथे शेक्सपिअर ते बोरकर असे जगभरचे कवी, तत्त्वज्ञ वगैरे सारे जण भेटतात. विज्ञान सुलभ करण्यासाठी रूपके आहेत. पण ही लोकविज्ञानाच्या पुस्तकाची बलस्थाने होत नाहीत. विज्ञान हेच सुरस आणि बुद्धीला चालना देणारे असते, हे लोकविज्ञानात दाखवणे महत्त्वाचे. काय दाखवायचे आणि काय लपवायचे, याची तारेवरची कसरत करत वाचकाला विचार करायला लावायचे, हे लोकविज्ञानाकडून अपेक्षित असते. लेखिकेने मेहनतीने माहितीचा खजिनाच वाचकांपुढे खुला केला आहे. विज्ञानाची फारशी जवळीक नसलेल्या वाचकाला ही माहिती पेलणे कठीण. मराठीतून विज्ञान शिकणार्‍या विद्यार्थ्यांना पूरक म्हणून या पुस्तकाचा निश्चितच उपयोग आहे.

dranand5@yhoo.co.in
गोफ जन्मांतरीचे, डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर राजहंस प्रकाशन