आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट विज्ञानातील बंडखोरीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘द सायंटिस्ट अ‍ॅज अ रिबेल’ नावाचे पुस्तक हे या लेखाचे निमित्त आहे. वैज्ञानिक आणि तोसुद्धा बंडखोर, काय आहे हा प्रकार? वैज्ञानिक म्हणजे शामळू, सूक्ष्मदर्शकात डोकावणारा, असा सर्वसाधारण समज असतो. पण बंड करून उठणारा, लढण्यास सज्ज असा हा वैज्ञानिक कोण? मराठी मनाला लढाई, सेना या शब्दांचे व कल्पनांचे आकर्षण आहे. त्यामुळे त्याला हा बंडखोर वैज्ञानिक आवडेल. पुस्तक परिचयाआधी या पुस्तकाचे लेखक फ्रिमन डायसन यांची तोंडओळख करून घ्यायला हवी. हे काही बेस्ट सेलिंग सेलेब्रिटी लेखक नव्हेत. प्रिन्सटन विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’ या संस्थेत भौतिकी विज्ञानाचे ते जीवनभर प्राध्यापक होते. म्हणजे आइन्स्टाइन वगैरे याच संस्थेत होते. हे मला कळले म्हणून माझी ट्यूब पेटली. यांची सात-आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विचारजीवी वैज्ञानिक म्हणून बौद्धिक जगतात रॉयल सोसायटीचे फेलो असलेले 89 वर्षे वयाचे डायसन म्हणजे बाप माणूस.
केंब्रिज विद्यापीठात 1992मध्ये वैज्ञानिकांची परिषद भरली होती. फ्रिमन डायसन यांना व्याख्यानासाठी बोलावले होते. त्यांनी
‘द सायंटिस्ट अ‍ॅज अ रिबेल’ हाच व्याख्यानाचा विषय घेतला होता. त्यांनी हे व्याख्यान लॉर्ड जेम्स रशोम यांना अर्पण केले होते. त्याला कारणही तसेच होते. लॉर्ड रशोम यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. फ्रिमन डायसन मँचेस्टर ग्रामर स्कूलमध्ये शिकत असताना रशोम त्यांचे रसायन विज्ञानाचे शिक्षक होते. 1941 साल म्हणजे ‘छडी लागे छमछम’चा काळ. पण रशोम हे बंडखोर शिक्षक. रोजच्या व्यवहारातील छोट्यामोठ्या गोष्टींतून ते रसायनविज्ञान शिकवायचे. मुलांबरोबर कविता वाचायचे, शिकवायचेही. ब्रिटनमधील शिक्षणासाठी त्यांनी खूप योगदान दिले. आॅक्सफर्ड, केंब्रिजला तोडीस तोड म्हणून त्यांनी यॉर्क विद्यापीठ स्थापण्यात सिंहाचा वाटा उचलला. ते यॉर्कचे चॅन्सलर झाले व पुढे लॉर्ड वगैरे. त्यांच्या बंडखोरीला (चांगल्या अर्थाने) फ्रिमन डायसन यांनी अभिवादन केले. आता वैज्ञानिकांची बंडखोरी म्हणजे काय, ते पाहू. ज्यांचे विचार पटले नाहीत त्यांच्या तोंडाला काळे फासणे, त्यांच्यावर गावबंदी घालणे, हे प्रकार आपल्या परिचयाचे आहेत. विज्ञानात अशी बंडखोरी नसते. ती वैचारिक असते. विज्ञानात कोणीही कोणाला प्रश्न विचारू शकते. एखाद्या वैज्ञानिकाने एक थिअरी मांडली, ती योग्य आहे हे दाखवण्यासाठी प्रयोग केले; दुसरा वैज्ञानिक त्या प्रयोगातील न्यून दाखवतो, नवीन प्रयोग करतो आणि ती थिअरी कशी चुकीची आहे, हे सांगतो. त्यावर वैज्ञानिकांच्यात चर्चा होते; योग्य ते घेतले जाते, अयोग्य ते सोडून दिले जाते. अशा तर्‍हेने विज्ञान पुढे जाते. फ्रिमन डायसन यांनी उदाहरणे देत हे दाखवले आहे. विज्ञान ही कोणा एका देशाची मक्तेदारी नाही. अमेरिकी, जपानी, चिनी असे विज्ञानाचे भाग नाहीत. विज्ञान ही सबंध मानवजातीची विचारदृष्टी. यात पूर्वेच्या तसेच पश्चिमेच्या संस्कृतींनी भर घातली. प्रज्ञा, प्रतिभा व प्रयोगशीलता हे या विचारदृष्टीचे तीन महत्त्वाचे कोन. प्रज्ञा ही उत्तम शिक्षणाने तयार होते. प्रतिभा म्हणजे चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता किंवा कल्पनाशक्ती. यासाठी विचारांचे, उलट प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य शिक्षणात असावे लागते. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळत नाही. तेथे बंडखोरी लागते. ज्या समाजात अशा बंडखोरीला वाव मिळतो तेथे वैज्ञानिक तयार होतात व प्रयोगशीलतेने नवीन ज्ञानाची निर्मिती करतात.
फ्रिमन डायसन यांनी पाडलेल्या विचार प्रकाशात भारतातील स्थिती पाहू. चंद्रशेखर, हरगोविंद खुराना, 2008मध्ये नोबेल मिळालेले व्यंकटरामन रामकृष्णन हे सर्व भारतीय वंशाचे. पण यांनी अमेरिका, इंग्लंडमध्ये वास्तव्य केले. तिथेच संशोधन करून नोबेल मिळवले. त्यांनी भारतात राहून का नाही संशोधन केले? त्यांना इथे तशी वैज्ञानिक भूमी मिळाली नाही की काय? रामन हे भारतात राहून संशोधन केलेले व नोबेल मिळवलेले पहिले वैज्ञानिक. त्यानंतर अजून तरी कोणी नाही. रामन, बोस आणि सहा या तीन भारतीय भौतिकी तज्ज्ञांनी ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध तसेच ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ या हिंदू दैववादी मानसिकतेविरुद्ध वैचारिक बंडखोरी केली, असे डायसन यांनी नमूद केले आहे. आज अशी बंडखोरी दिसत नाही आणि जर कोणी केली तर समाजाकडून त्याला काय ‘प्रसाद’ मिळतो, ते आपण रोज पाहत आहोत.
भारतात खूप ‘टॅलेंट’ आहे, असे मानले जाते; पण हे ‘टॅलेंट’ फुलण्यासाठी जे शैक्षणिक व सामाजिक वातावरण लागते ते येथे नाही, असे फ्रिमन डायसन यांचे हे पुस्तक वाचून वाटू लागते.
वैज्ञानिक हा सत्य शोधण्याच्या महाप्रवासासाठी निघालेला असतो. हा प्रवास काही आज सुरू झालेला नाही, हा न संपणारा प्रवास आहे. तत्त्वज्ञान, विज्ञान अशा बहुविध ज्ञानशाखा निर्माण होण्याआधीच लाखो वर्षांपूर्वी मानव जातीने हा प्रवास सुरू केला आहे. त्याच्यावर सर्व मानव जातीचा हक्क आहे.
गरिबी, कुरूपता, लष्करशाही, आर्थिक अन्याय, या विरुद्ध विज्ञानाची ही बंडखोरी आहे. याचा विसर पडता कामा नये, असे फ्रिमन डायसन यांनी या पुस्तकात नमूद केले आहे.